मंत्रिमंडळ

उज्ज्वला लाभार्थ्यांना "प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने" चा लाभ घेण्यासाठी कालमर्यादेत 01.07.2020 पासून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 08 JUL 2020 6:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जुलै 2020

उज्ज्वला लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी कालमर्यादेत 01.07.2020 पासून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या  पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रस्तावास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

महामारीचा सर्वाधिक परिणाम झालेल्या गरीब आणि असुरक्षित लोकांना सुरक्षा जाळे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकारने "प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना" हे मदत पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमध्ये गरीब कुटुंबांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत एलपीजी जोडणीचा लाभ मिळाला होता. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना -उज्ज्वला अंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना 01.04.2020 पासून 3 महिन्यांच्या कालावधीसाठी विनाशुल्क रिफिल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या योजनेंतर्गत एप्रिल ते जून 2020 दरम्यान उज्ज्वला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 9709.86 कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आणि 11.97 कोटी सिलिंडर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात आले. कोरोना विषाणू महामारीमुळे होणारा त्रास आणि व्यत्यय सुसह्य करण्यासाठी या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

योजनेचा आढावा घेताना असे निदर्शनास आले आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थींचा एक वर्ग अद्याप त्यांच्या खात्यात जमा झालेल्या आगाऊ रकमेचा उपयोग योजनेच्या कालावधीत सिलिंडर रिफिल खरेदी करण्यासाठी करीत नाही. त्यामुळे आगाऊ रकमेचा लाभ घेण्यासाठीची मुदत तीन महिन्यांपर्यंत वाढविण्यात यावी या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. याचा फायदा त्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना होईल ज्यांच्या खात्यात सिलिंडर खरेदीसाठी आगाऊ रक्कम जमा करण्यात आली आहे मात्र त्यांना रिफील सिलिंडर खरेदी करणे शक्य झाले नाही. अशा प्रकारे, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात आधीच आगाऊ रक्कम जमा करण्यात आली आहे ते आता 30 सप्टेंबरपर्यंत विनामूल्य रिफिल वितरणाचा लाभ घेऊ शकतात.

 

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1637309) Visitor Counter : 263