नौवहन मंत्रालय

भारतामध्ये दीपगृह पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी परिसर विकसित करण्याचे मनसुख मांडवीय यांचे आवाहन

Posted On: 07 JUL 2020 2:55PM by PIB Mumbai

 

केंद्रीय नौवहन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) मनसुख मांडवीय यांनी आज देशभरामध्ये असलेल्या जवळपास 194 दीपगृहांचा परिसर विकसित करण्यासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली. भारतामध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी, दीपगृह पर्यटकांना आकर्षून घेणारी केंद्र कशी बनवता येतीलयाविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. दीपगृहांचा समृद्ध इतिहास पर्यटकांना जाणून घेण्याची संधी यामुळे मिळू शकणार आहे, असे मांडवीय यावेळी म्हणाले.

देशातल्या दीपगृहांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अधिकारी वर्गाने सविस्तर कृती आराखडा यावेळी सादर केला. आपल्या देशात जी दीपगृहे 100 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत, अशा दीपगृहांच्या इतिहासाची माहिती देणारे संग्रहालय त्यांच्या परिसरामध्ये तयार करण्याचा सल्ला मांडवीय यांनी यावेळी दिला. तसेच दीपगृहाचे चालणारे काम, त्यामध्‍ये वापरण्यात येणारी उपकरणे यांची माहिती पर्यटकांना देण्यावर भर दिला जावा, असेही सांगितले.

दीपगृह परिसर विकास आराखड्यामध्ये संग्रहालय, मत्स्यालय तसेच मुलांसाठी खेळण्याची सुविधा आणि बाग-बगिचा यांचा समावेश असावा, तसेच जलाशय तयार करण्यात यावा, असे मांडवीय यांनी सांगितले.

या बैठकीत मनसुख मांडवीय यांनी गुजरातमधल्या गोपनाथ, व्दारका आणि वेरावल याठिकाणच्या दीपगृह परिसरामध्ये पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी सुरू असलेल्या विकास कामाचा आढावा घेतला.

दीपगृह विकास प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्याचे निर्देशही मांडवीय यांनी दिले. या बैठकीला जहाजबांधणी मंत्रालयाचे सचिवआणि दीपगृह महासंचालक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1636966) Visitor Counter : 267