आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

धन्वंतरी रथ : अहमदाबादमध्ये लोकांच्या दारी बिगर-कोविड आरोग्य सेवा

Posted On: 04 JUL 2020 4:39PM by PIB Mumbai

 

सध्या सुरु असलेल्या कोविड-19 साथीच्या रोगाच्या काळात, सर्व राज्य/केंद्र शासित प्रदेशांमध्ये प्राधान्याने कोविड आरोग्य सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले असतानाच, बिगर-कोविड अत्यावश्यक सेवांकडे देखील तितकेच लक्ष दिले जात आहे. अहमदाबाद महानगरपालिकेने (एएमसी) धन्वंतरी रथाच्या माध्यमातून शहरातील लोकांच्या दारात बिगर-कोविड अत्यावश्यक आरोग्यसेवा सेवा उपलब्ध करून एक अनोखे आणि नाविन्यपूर्ण उदाहरण स्थापन केले आहे. शहरातील बरीच मोठी रुग्णालये कोविड -19 उपचारासाठी समर्पित आहेत, त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग इत्यादी बिगर-कोविड अत्यावश्यक सेवांशी निगडीत आवश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात, हे सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत तसेच बऱ्याच रुग्णालयांमध्ये ओपीडी सेवा बंद असल्यामुळे रुग्णालयात जाऊ न शकणाऱ्या लोकांसाठी देखील ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एएमसीने स्वीकारलेल्या जबाबदाऱ्यापैकी एक म्हणजे 'धन्वंतरी रथ' नावाच्या मोबाइल वैद्यकीय वाहनांची मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे. या वैद्यकीय वाहनामध्ये एएमसीच्या शहरी आरोग्यसेवा केंद्राचे स्थानिक वैद्यकीय अधिकारी व आयुष डॉक्टर, पॅरामेडिकल आणि परिचारिका कर्मचारी आहेत. हे वाहन विविध भागात जाऊन तेथील बिगर-कोविड रुग्णांना अत्यावश्यक सेवा पुरविते आणि अहमदाबाद शहरातील लोकांना त्यांच्या घराजवळ वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देत आहे. मोबाइल वैद्यकीय वाहनांमध्ये आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक औषधे, व्हिटॅमिनच्या गोळ्या, नाडी ऑक्सीमीटरसह मूलभूत चाचणी उपकरणांसह सर्व आवश्यक औषधे आहेत. आरोग्य सेवांव्यतिरिक्त विविध कारणास्तव रुग्णालयाच्या ओपीडी पर्यंत पोहोचू न शकणाऱ्या लोकांपर्यंत ही सेवा उपलब्ध करून दिली जात आहे; तसेच ज्या लोकांना पुढील नैदानिक उपचारांची किंवा आयपीडी मध्ये दाखल करण्याची आवश्यकता आहे, अशा लोकांची ओळख पटवून ते वेळेवर रुग्णालयात पोहोचतील हे देखील धन्वंतरी रथ सुनिश्चित करते.   

एएमसीने संपूर्ण शहरात 120 धन्वंतरी रथ तैनात केले आहेत. धन्वंतरी रथांनी आतापर्यंत 4.27 लाख ओपीडी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. या हस्तक्षेपाने ताप असलेल्या 20,143 पेक्षा जास्त रुग्ण, खोकला, सर्दी आणि पडसे असलेल्या 74,048 पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात मदत केली आहे, श्वसनमार्गाचे गंभीर संसर्ग असलेल्या 462 पेक्षा जास्त रुग्णांना शहरी आरोग्य केंद्र आणि रुग्णालयात क्लिनिकल उपचारांसाठी पाठविण्यात आले आणि उच्च-रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजार असणाऱ्या इतर 826 रुग्णांना उपचारासाठी जवळील शहरी आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयात पाठविण्यात आले. धन्वंतरि रथांचा कोविड-19 व्यवस्थापनावरही मोठा परिणाम झाला आहे, कारण वेळेत अनेक कोविड रुग्ण ओळखणे शक्य झाले.

पावसाची सुरुवात आणि संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची संभाव्यता लक्षात घेता 15 जून 2020 पासून मलेरिया आणि डेंग्यू चाचण्यांचा समावेश करण्यासाठी मोबाईल वैद्यकीय वाहनाच्या आरोग्य सेवांचा विस्तार करण्यात आला आहे.

 

*****

S.Pophale/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1636416) Visitor Counter : 261