सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
केव्हीआयसी वाराणसीतील 80 कुंभारांच्या कुटुंबांना सक्षम बनवते, हे "केवळ स्वदेशी"चे नवीन ध्वजवाहक आहेत
Posted On:
27 JUN 2020 8:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील कुंभार समाज यंदा सणासुदीच्या हंगामात “केवळ स्वदेशी” उत्पादनांसह देशाचे नेतृत्व करणार आहे. “आत्मनिर्भर भारत अभियाना” चा भाग म्हणून खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) वाराणसीतील कुंभारांना मातीचे दिवे, देवतांची शिल्प आणि अन्य मातीच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देत आहे.
खादी आणि ग्रामोद्योग आयोगचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी आज इटहाराडीह, अहराउरादिह, अर्जुनपूर आणि चक सहजनगीगंज या चार गावांमधील 80 कुंभारांच्या कुटुंबांना इलेक्ट्रिक कुंभार चाकांचे वाटप केले. या प्रत्येक गावात सुमारे 150 ते 200 कुंभार कुटूंब आहेत, जे अनेक पिढ्यांपासून कुंभारकामात गुंतले आहेत. मात्र चिकणमाती बनविण्यामध्ये हातांनी चालवायच्या चाकाच्या जुन्या तंत्रामुळे, आणि मेहनतीमुळे तसेच विपणनाच्या कमतरतेमुळे ते गेल्या काही वर्षांत उदरनिर्वाहाच्या पर्यायी स्त्रोतांकडे वळले. केव्हीआयसीने पुढील 3 महिन्यांत वाराणसीत मातीच्या वस्तू बनवण्याच्या 1500 चाकांचे वितरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
कोविड-19 लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या इतर राज्यांमधून परत आलेल्या वाराणसीमधील सेवापुरी येथील 300 स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबांना केव्हीआयसी मातीच्या वस्तू बनवण्याची 300 इलेक्ट्रिक चाके आणि इतर उपकरणे वितरित करणार आहे. केव्हीआयसीने आत्तापर्यंत 60 स्थलांतरित कामगारांच्या कुटुंबांना प्रशिक्षण दिले आहे आणि पुढल्या महिन्यात 300 कुटुंबांना पॉटरी टूल किटचे वितरण करण्यात येणार आहे. यामुळे एकट्या वाराणसीत स्थलांतरित मजुरांसाठी जवळपास 1200 रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे. त्रासलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी स्थानिक रोजगार निर्माण करणे जेणेकरुन त्यांना उदरनिर्वाहाच्या शोधात इतर शहरांमध्ये स्थलांतर करण्याची गरज भासू नये हे यामागील उद्दिष्ट आहे.
यावेळी उपस्थित कुम्हार सशक्तीकरण योजनेच्या जुन्या लाभार्थ्यांनी केव्हीआयसीच्या अध्यक्षांशी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. किशन प्रजापती या कुंभाराने सांगितले की, कुम्हार सशक्तीकरण योजनेंतर्गत केव्हीआयसीकडून इलेक्ट्रिक चाक मिळाल्यापासून तो दररोज वाराणसी कॅन्ट रेल्वे स्थानकात सुमारे 3000 कुल्हड विकतो. या योजनेचा आणखी एक लाभार्थी अक्षय कुमार प्रजापती यांनी सांगितले की मिर्झापूर जिल्ह्यातील स्थानिक चुना मार्केटमध्ये जवळपास 4000 कुल्हड आणि प्लेट्स विकण्यास तो सक्षम बनला असून आता तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे. आणखी एक कुंभार दयाशंकर प्रजापती यांनी सांगितले कि वाराणसीच्या मंडुआडीह रेल्वे स्थानकात दूध देण्यासाठी वापरल्या जाणार्रे सुमारे 3500 मातीचे ग्लास विकून तो चांगली कमाई करीत आहे. मातीची भांडी विकून महिन्याला सुमारे २० हजार रुपये कमवत असल्याचे कुंभारांनी सांगितले.
वाराणसीच्या या खेड्यांमधील कुंभार आगामी दसरा आणि दीपावली सणांच्या पार्श्वभूमीवर मातीचे जादूचे दिवे, पारंपारिक दिवे (दीया) आणि लक्ष्मी आणि गणेश यांची शिल्पे प्रामुख्याने तयार करीत आहेत. सणाच्या काळात लोकांना चिनी दिवे आणि अन्य वस्तू खरेदी करण्यापासून परावृत्त करणे हा यामागचा विचार आहे.
केव्हीआयसीचे अध्यक्ष म्हणाले की वाराणसी कुंभारकाम क्षेत्रातील अमाप संधींसाठी ओळखले जाते. कुंभार सशक्तीकरण योजनेअंतर्गत वाराणसीतील अनेक गावांना याचा लाभ झाला आहे. केव्हीआयसी लवकरच वाराणसीत एमएसएमई मंत्रालयाच्या स्फूर्ती योजने अंतर्गत एक क्लस्टर स्थापित करणार आहे. हे क्लस्टर सुमारे 500 कारागीरांना सुसज्ज ठिकाणी एकत्र काम करण्याची सुविधा पुरवेल ” असे सक्सेना म्हणाले.
विशेष म्हणजे वाराणसी हा निती अयोगाने निवडलेला एक महत्वाकांक्षी जिल्हा आहे आणि खादी आणि ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी आणि कारागिरांना प्रशिक्षण देऊन कुंभारकामाला प्रोत्साहन देण्यासाठी केव्हीआयसीने सेवापुरीला प्राधान्य दिले आहे. केव्हीआयसीने आतापर्यंत देशभरात 17,000 हून अधिक इलेक्ट्रिक कुंभार चाकांचे वितरण केले आहे.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634852)
Visitor Counter : 230