सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधानांच्या आवाहनानुसार संकल्प पर्व साजरे करण्यासाठी संस्कृती मंत्रालय 28 जूनपासून 12 जुलै 2020 पर्यंत करणार वृक्षारोपण
देशात निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी संकल्प पर्वात सहभागी होण्याचे आणि झाडे लावण्याचे संस्कृती मंत्र्यांचे आवाहन
Posted On:
27 JUN 2020 8:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2020
देशात स्वच्छ आणि निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी नागरिकांनी आपल्या कार्यालयाच्या संकुलात किंवा जिथे शक्य असेल त्या ठिकाणी किमान पाच झाडे लावावीत असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज पंतप्रधानांनी केलेल्या वृक्षारोपणाच्या आवाहनानुसार संकल्प पर्वाचे यशस्वी आयोजन करावे, असे सांगितले आहे.
28 जून ते 12 जुलै 2020 या काळात संकल्प पर्व साजरे करण्यात येणार असून, संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाची सर्व संलग्न कार्यालये, शिक्षण संस्था, संलग्न संस्था, संबंधित संस्था यांच्या संकुलात किंवा सभोवतालच्या परिसरात जिथे शक्य असेल तिथे वृक्षारोपण करण्यात यावे अशी मंत्रालयाची अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी जी झाडे सुचवली आहेत त्या पाच झाडांची आणि देशाच्या वनौषधी वारशांचे दर्शन घडवणाऱ्या झाडांची लागवड करण्यात यावी, अशी शिफारस संस्कृती मंत्रालयाने केली आहे. या झाडांमध्ये 1) वड 2) आवळा 3) पिंपळ 4) अशोक 5) बेल या झाडांचा समावेश आहे. जर झाड़ांची रोपे उपलब्ध नसतील तर लोकांनी त्यांच्या आवडीच्या झाडांच्या रोपांची लागवड करावी असे पटेल यांनी सांगितले आहे.
आपल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पसंतीच्या किमान एका तरी झाडाची लागवड करावी आणि पंतप्रधानांच्या आवाहनानुसार एकंदर पाच झाडांची लागवड केली जावी, यासाठी संस्थांनी खातरजमा केलीच पाहिजे, असे पटेल म्हणाले. लावलेले रोपे जगावीत आणि त्यांची जोमाने वाढ व्हावी, यासाठी कर्मचारी या रोपांची काळजी घेतील, याची देखील संस्थांनी खातरजमा केलीच पाहिजे, असे पटेल यांनी सांगितले.
संकल्प पर्वात सर्वांनी सहभागी व्हावे आणि रोपांची लागवड करतानाचे आपले छायाचित्र #संकल्पपर्व वर संस्कृती मंत्रालयाकडे पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले. मान्सूनचा हंगाम सुरू झाला आहे आणि रोपांच्या लागवडीसाठी हा अतिशय योग्य काळ आहे, असे ते म्हणाले. या महामारीच्या काळात आपण स्वच्छ आणि निरोगी वातावरणाचे महत्त्व पाहिले आहे आणि या महामारीच्या काळात आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या आणि त्यातून बाहेर काढणाऱ्या आपल्या वनसंपदेचा आपल्याला अभिमान आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने या संकल्प पर्वात सहभागी व्हावे आणि किमान एका तरी रोपाची काळजी घ्यावी असे आपण आवाहन करत आहोत जेणेकरून आपल्याला निरोगी पर्यावरण आणि समृद्ध भारताची निर्मिती करता येईल, असे त्यांनी सांगितले.
* * *
B.Gokhale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1634849)
Visitor Counter : 299