आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 सद्यस्थिती
ओदिशामध्ये लोकसहभाग आणि डिजिटल उपक्रमाद्वारे कोविड-19 चा मुकाबला
Posted On:
23 JUN 2020 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2020
कोविड -19 विरुद्धचा लढा म्हणजे केंद्र सरकारच्या नेतृत्वात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सक्रिय सहभागाने लढले जाणारे एक सामूहिक युद्ध आहे. केंद्राने दिलेल्या सूचना, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांच्या विस्तृत चौकटीत बऱ्याच राज्यांनी सानुकूलित धोरणे विकसित केली आहेत.
माहिती तंत्रज्ञानाचा सक्रिय वापर, स्थानिक सरपंचांना अधिकारप्राप्त बनवून, लोकसहभागाने कुशल आरोग्यसेवा तयार करणे आणि असुरक्षित गटांचे संरक्षण यासारख्या कोविड विरोधी सक्रिय उपाययोजनांवर ओदिशा सरकारने लक्ष केंद्रित केले आहेत. यामुळे कमी मृत्यू दरासह रोग प्रसाराचा धोका कमी झाला आहे. काही महत्त्वाच्या उपाययोजना पुढीलप्रमाणे आहेत:-
गंभीर आजार झालेल्या व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना सचेतक अॅपद्वारे सहाय्य
भुवनेश्वर महानगरपालिकेने शहरातील गंभीर आजार झालेल्या व्यक्ती आणि वृद्ध नागरिकांच्या पूर्ण देखरेखीसाठी सचेतक हे मोबाईल अॅप विकसित केले आहे. कुटुंबातील एक सदस्य काळजी घेण्यासाठी नोंदणीकृत आहे. एकटे राहणाऱ्या वृद्ध लोकांसाठी प्रभाग स्तरीय सचेतक समितीमधील एका स्वयंसेवकांची देखभालकर्ता म्हणून निवड केली जाते. ते असुरक्षित लोकांसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करतात. या अॅपच्या माध्यमातून नागरिक कोविडपासून संरक्षण करणारी संसाधने शोधू शकतात, डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात, कोविड विलगीकरण विषयक तसेच सक्रिय लोकांची अद्ययावत माहिती पाहू शकतात. या अॅपमधील माहिती नागरी संस्थाना लक्ष्यित आरोग्य सेवा शिबिरांच्या योजनेस मदत करते.
प्रभावी देखरेखीसाठी सरपंचांना अधिकारप्राप्त बनविणे
राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या कलम 51 अंतर्गत तसेच साथ रोग कायदा 1897 च्या ओदिशा कोविड -19 नियम 2020 नुसार ग्रामपंचायतीच्या सरपंचांना त्यांच्या अधिकार क्षेत्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार सोपविले आहेत. याचा फायदा परतणाऱ्या स्थलांतरितांच्या 14- दिवसाच्या विलगीकरणावर देखरेख ठेवण्यात होईल.
टेलिमेडिसिन सेवा तैनात करणे
104 हेल्पलाईन व्यतिरिक्त एक नि: शुल्क टेलिमेडिसिन हेल्पलाइन सेवा (14410) कार्यान्वित केली गेली आहे. इंटरएक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स (आयव्हीआर) प्रणाली -आधारित मॉड्यूलसह हे सुसज्ज, वैद्यकीय सल्ला प्रदान करते आणि 300 हून अधिक पात्र वैद्यकीय व्यावसायिकांच्या मदतीने लोकांना विविध कोविड-19 संबंधित स्त्रोतांविषयी माहिती देते. यामुळे लोकांमध्ये भीती व धास्ती कमी होण्यास मदत झाली आहे.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविणे
ओदिशा सरकारने कोविड-रूग्णांना आरोग्य सेवा देण्यासाठी 1.72 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. एक नाविन्यपूर्ण पाऊल म्हणून, गंजम जिल्हा प्रशासन हजारो स्थलांतरितांना विलगीकरण केंद्रामध्ये स्वच्छताविषयक उपायांसारख्या भागात सामुदायिक आरोग्य कर्मचारी म्हणून प्रशिक्षण देत आहे. ही उपाययोजना अन्य जिल्ह्यांमध्येही राबविण्यात येत आहे.
M.Chopade/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633722)