रसायन आणि खते मंत्रालय

मनसुख मांडवीय यांनी केले भारतातील सर्वात मोठ्या पहिल्या आभासी आरोग्यसेवा आणि वैयक्तिक स्वच्छता प्रदर्शन 2020 चे उद्घाटन


पाच दिवसीय प्रदर्शनात आयुष आणि निरोगीपणा, वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत वस्त्रे आणि उपकरणे, औषधे आणि वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित

Posted On: 22 JUN 2020 8:00PM by PIB Mumbai

 

केंद्रीय नौवहन राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार), रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज भारताच्या सर्वात मोठ्या पहिल्या आभासी आरोग्यसेवा आणि वैयक्तिक स्वच्छता प्रदर्शन 2020 चे उद्घाटन केले. फिक्कीने या प्रदर्शनानचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आभासी पद्धतीने करण्यात आले. 22 ते 26 जून 2020 या कालावधीत दररोज याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. झाशीचे खासदार अनुराग शर्मा आणि फिक्की, आयुष समितीचे अध्यक्ष, फिक्कीच्या अध्यक्ष संगीता रेड्डी, प्रसिद्ध क्रीडापटू पी. व्ही. सिंधू, फिक्की वैद्यकीय उपकरण मंचाचे अध्यक्ष बद्री अय्यंगार आणि उद्योग क्षेत्रातील अन्य प्रतिनिधी या आभासी प्रदर्शनात सहभागी झाले होते.

हे भारतातील पहिले सर्वात मोठे आभासी प्रदर्शन आहे, जी एक नवी सुरुवात आहे. हे एक नवीन मानक आहे, जिथे आभासी पद्धतीने व्यापार होईल कारण डिजिटल इंडिया आता आपला मार्ग प्रशस्त करत आहे.

उद्घाटनप्रसंगी मंत्री म्हणाले की, स्वावलंबी भारतासाठी एक परिसंस्था तयार केली जात आहे, जी औषधोत्पादन क्षेत्र आणि आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छता क्षेत्रातील देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यास सहाय्य करेल. कोविड-19 साथीच्या आजाराविरोधातील आपल्या लढाईत आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छता, वैद्यकीय वस्त्रोद्योग आणि उपकरणे, आयुष आणि निरोगीपणा या सगळ्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. 2014 पासून पंतप्रधानांनी या दिशेने जाहीर केलेल्या विविध उपक्रमांवर त्यांनी प्रकाश टाकला जसे की प्रत्येक घरात शौचालयाची व्यवस्था करणे, 10 कोटी कुटुंबांना आरोग्यसेवा प्रदान करणारी “आयुष्मान भारत”, “स्वच्छ भारत अभियान”, “सुविधा सॅनिटरी” नॅपकिन इ. उपक्रम. सर्वांना परवडणाऱ्या किंमतीमध्ये दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणाऱ्या जनऔषधी दुकानांबद्दल देखील ते यावेळी बोलले. हे सर्व उपक्रम नरेंद्र मोदी सरकारच्या दृढ दृष्टिकोनामुळे कशाप्रकारे शक्य झाले हे देखील मांडविया यांनी यावेळी सांगितले.

महिलांच्या उत्तम आरोग्याच्या महत्वावर जोर देऊन त्यांनी सांगितले की हे एक असे क्षेत्र आहे जिथे आपण सगळ्यांनी लक्ष केंद्रित करून त्यादिशेने काम केले पाहिजे. त्यांनी जनऔषधी दुकानांमध्ये एक रुपया प्रती पॅड किंमतीने विकलेल्या “सुविधा सॅनिटरी” नॅपकिनचे उदाहरण दिले. असे उपक्रम देशातील महिलांच्या आरोग्याची स्वच्छता सुनिश्चित करण्याचा एक अनोखा मार्ग आहेत. तंदुरुस्ती आणि वैयक्तिक स्वच्छता हे आरोग्यसेवा क्षेत्राचे अविभाज्य भाग असल्याच्या पी. व्ही. सिंधू हिच्या मताला त्यांनी दुजोरा दिला. “व्यक्तीला निरोगी राहण्यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि व्यायामाची नियमित दिनचर्या जोपासली पाहिजे” असे ते म्हणाले.

मांडवीय यांनी यावेळी सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या मोठ्याप्रमाणात औषधी पार्क आणि वैद्यकीय उपकरणे पार्क स्थापनेस प्रोत्साहन देणाऱ्या धोरणात्मक घोषणेबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, समान भागीदारीने खासगी क्षेत्राला अशी पार्क उभारण्याची इच्छा असेल तर सरकार त्यांना मदत करण्यास तयार आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या #आत्मनिर्भर भारत अभियानाच्या हे सहाय्यभूत ठरेल हे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्र्यांनी सर्व नागरिकांच्या प्रयत्नांचे आणि विशेषतः आघाडीचे कामगार, डॉक्टर, परिचारिका, पोलीस यांचे कौतुक केले. आव्हानांचे रुपांतर संधीमध्ये करणाऱ्या उत्पादन समुदायाचे त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी करण्यापासून, बेड तयार करण्यापासून, पीपीई कीट्स, मास्क, व्हेंटीलेटर आणि उपकरणे तयार करण्यापर्यंत या समुदायाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ते म्हणाले की, भारतीय उद्योग क्षेत्राने भारत सरकारच्या खांद्याला खांदा लावून मदत केली आहे.

मांडवीय यांनी आयुषच्या लाभांबद्दल आणि आयुषची तयारी रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवते याबद्दल सांगितले. ते म्हणाले, "कोरोना संकटावर मात करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी पारंपारिक औषधे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत."

******

S.Thakur/S.Mhatre/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1633416) Visitor Counter : 312