शिक्षण मंत्रालय
शालेय अभ्यासक्रमामध्ये योगाभ्यासाचा समावेश करण्यासाठी ‘एनसीईआरटी’च्यावतीने ऑनलाइन योग प्रश्नमंजूषा
या स्पर्धेमुळे मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी आणि जीवनशैली विकसित करण्यासाठी मदत होईल - रमेश पोखरियाल ‘निशंक’
देशभरातल्या इयत्ता 6 ते 12 च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली स्पर्धा
Posted On:
21 JUN 2020 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2020
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘एनसीईआरटी’म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रमामध्ये योग या विषयाचा समावेश करण्यासाठी बहुआयामी उपक्रम सुरू केले आहेत. यामध्ये ‘एनसीईआरटी’ने उच्च प्राथमिक ते माध्यमिक वर्गांतल्या मुलांमध्ये आरोग्यदायी सवयी आणि जीवनशैली विकसित करण्यासाठी योग या विषयाचे पाठ्य सामुग्री तयार केली आहे. त्याचबरोबर सन 2016 पासून ‘योग ऑलिंपियाड’चे आयोजनही करण्यात येत आहे. सध्याच्या कोविड-19 महामारी परिस्थितीमध्ये मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी घरामध्ये राहूनच कशा प्रकारे योगाभ्यासाचा सराव करावा, तसेच शारीरिक कसरत, व्यायाम करून आरोग्य सुदृढ ठेवावे, याचे मार्गदर्शन करीत आहेत. यासाठी शालेय शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर विकसित करण्यात आलेल्या वैकल्पिक शैक्षणिक दैनंदिनीप्रमाणे मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावर्षी कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे योग ऑलिंपियाडचे प्रत्यक्ष आयोजन करणे अवघड आहे, हे लक्षात घेवून ‘एनसीईआरटी’च्यावतीने ऑनलाइन योग प्रश्नमंजूषा घेण्यात येईल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी जाहीर केले.
याप्रसंगी बोलताना मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ म्हणाले, या प्रश्नमंजूषेचा उद्देश मुलांमध्ये जागरूकता निर्माण होवून शालेय वयामध्ये त्यांना योगविषयक योग्य स्त्रोतांकडून सर्वंकष माहिती मिळवण्यासाठी प्रवृत्त करणे हा आहे. मुलांनी स्पर्धेचा नेमका उद्देश जाणून या पद्धतीने जीवन जगण्यासाठी प्रेरणा देण्याची आज गरज आहे. या स्पर्धेमुळे मुलांना निरोगी ठेवणा-या सवयी आणि चांगली जीवनशैली विकसित करण्यासाठी भावनात्मक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होणार आहे.
योग प्रश्नमंजूषेचे आयोजन बहुआयामी असणार आहे, असे पोखरियाल यांनी सांगितले. योग या विषयाचे यम आणि नियम शतकर्म, क्रिया, आसने, प्राणायाम, ध्यान, बंध आणि मुद्रा या विषयांवर एनसीईआरटीने विकसित केलेल्या अभ्यासक्रमावर ही प्रश्नमंजूषा घेण्यात येणार आहे. देशभरातील इयत्ता 6 ते 12 च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असल्याचेही पोखरियाल यांनी सांगितले. स्पर्धेमध्ये मुलांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. त्याचबरोबर विशेष आवश्यकता असलेल्या मुलांसाठी लिखित प्रश्नांचे ध्वनिमध्ये रूपांतर करून ते विचारले जाण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. प्रश्नमंजूषेतल्या प्रश्नांच्या उत्तरांचे विविध पर्याय दिले जातील, त्यामधून मुलांनी योग्य उत्तर निवडायचे आहे. तसेच ही स्पर्धा हिंदी आणि इंग्लिश अशा दोन भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. मुलांना स्वतःला जी योग्य वाटेल, ती भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असणार आहे. स्पर्धेमध्ये सर्वात उच्च गुण प्राप्त करणा-या पहिल्या 100 मुलांना गुणवत्ता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या प्रश्नमंजूषेविषयीचा सर्व तपशील एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर (ncert.nic.in) यापूर्वीच देण्यात आला आहे.
दि.21 जून 2020 पासून सुरू होणारी ही स्पर्धा एक महिन्यासाठी खुली असणार आहे. दि. 20 जुलै2020 च्या मध्यरात्री स्पर्धा बंद होईल. या प्रश्नमंजूषेमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे आहे.
इंग्लिश प्रश्नमंजूषा -- https://bit.ly/EYQ_NEWS
हिंदी प्रश्नमंजूषा -- https://bit.ly/HYQ_NEWS
* * *
G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633255)
Visitor Counter : 210