पंतप्रधान कार्यालय
भारताच्या कोविड-19 विरुद्धच्या लढ्याचा पंतप्रधानांनी घेतला आढावा
Posted On:
13 JUN 2020 7:45PM by PIB Mumbai
कोविड -19 महामारीविरोधात भारताच्या प्रतिसादाबद्दल आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर बैठक घेतली. या बैठकीत महामारीच्या अनुषंगाने राष्ट्रीय स्तरावरील स्थिती व तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत दिल्लीसह विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस गृहमंत्री, आरोग्यमंत्री, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, कॅबिनेट सचिव, आरोग्य सचिव, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरचे महासंचालक आणि अधिकारप्राप्त गटांचे अन्य संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
नीती आयोगाचे सदस्य आणि वैद्यकीय आपत्कालीन व्यवस्थापन योजनेच्या अधिकारप्राप्त गटाचे संयोजक डॉ. विनोद पॉल यांनी मध्यम मुदतीत कोविड -19 प्रकरणांची सद्यस्थिती व संभाव्य परिस्थिती याबद्दल सविस्तर सादरीकरण केले. असे आढळून आले आहे की एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश हे पाच राज्यांमधील असून मोठ्या शहरांमधील रुग्णांचे प्रमाण प्रचंड आहे. विशेषत: मोठ्या शहरांद्वारे येत असलेल्या आव्हानांचा विचार करता, दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी चाचणी तसेच खाटांची संख्या आणि सेवा यावर चर्चा झाली.
पंतप्रधानांनी शहर आणि जिल्हावार आवश्यकता असलेल्या रुग्णालयामधील आवश्यक खाटा/ अलगीकरण खाटा याविषयी अधिकारप्राप्त समूहाच्या शिफारशींची दखल घेतली आणि राज्ये / केंद्रशासित प्रदेशांशी सल्लामसलत करून आपत्कालीन नियोजन करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या तयारीची खात्री करण्याचा सल्लाही त्यांनी मंत्रालयाला दिला.
राजधानीतील कोविड -19 साथीच्या सद्य आणि उदयोन्मुख परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली आणि पुढील 2 महिन्यांतील संभाव्य स्थितीवर विचारविनिमय करण्यात आला. पंतप्रधानांनी सुचवले की कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाचे आव्हान पेलण्यासाठी समन्वित आणि सर्वसमावेशक योजना आखण्यासाठी भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, दिल्ली सरकार आणि दिल्ली महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ; गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री यांच्याशी समन्वय साधण्यासाठी तातडीची बैठक बोलवावी.
या महामारीच्या प्रादुर्भावाचा यशस्विरीत्या प्रतिबंध करून तो नियंत्रित करण्यात अनेक राज्ये, जिल्हे आणि शहरे यांनी उत्कृष्ट काम केल्याची बरीच उदाहरणे असल्याचे नमूद करून पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. इतरांना प्रेरणा आणि नाविन्यपूर्ण कल्पना देण्यासाठी या यशोगाथा आणि उत्तम पद्धतींचा व्यापकपणे प्रसार केला गेला पाहिजे असे ते म्हणाले.
*****
B.Gokhale/V.Joshi/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1631424)
Visitor Counter : 283
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam