श्रम आणि रोजगार मंत्रालय

निवृत्ती वेतनधारकांसाठीच्या जीवन प्रमाण करिता ईपीएफओने सीएससी नेटवर्कशी घातली सांगड

Posted On: 11 JUN 2020 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जून 2020

 

ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या घराजवळ सेवा प्रदान करण्याची विशेषतः कोविड-19 महामारीच्या आव्हानात्मक काळातली याविषयीची आवश्यकता लक्षात घेऊन ईपीएफओ, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने, ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल जीवन प्रमाण सादर करण्यासाठीची सुविधा देण्यासाठी सामायिक सेवा केंद्र, सीएससी समवेत तत्पर  भागीदारी केली आहे.  दूर-दूर पर्यंत पोहोचलेल्या सुमारे 3.65 लाख सीएससीच्या जाळ्याशी सांगड घालत ईपीएफओ आपल्या 65 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी, त्यांच्या घराजवळ डिजिटल जीवन प्रमाण सादर करण्याची सुविधा पुरवत आहे. ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना, निवृत्तीवेतन काढणे सुरु  ठेवण्यासाठी दर वर्षी जीवन प्रमाण/हयातीचा दाखला सादर करावा लागतो.

सीएससी केंद्राशिवाय, ईपीएस निवृत्तीवेतनधारक 135 प्रादेशिक कार्यालये,117 जिल्हा कार्यालये आणि निवृत्तीवेतन वितरण बँकाकडेही जीवन प्रमाण सादर करू शकतात. ईपीएफओने स्वीकार केलेल्या बहु एजन्सी मॉंडेल मुळे, ईपीएस निवृत्ती वेतनधारकाना त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या पसंतीच्या  सेवा प्रदान करणाऱ्या एजन्सीची निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे.

धोरणातला  महत्वाचा बदल म्हणजे ईपीएस निवृत्तीवेतनधारकाना, त्यांच्या सोयीनुसार वर्षातून  कोणत्याही वेळेला डिजिटल जीवन प्रमाण सादर करण्याची परवानगी. सादर केलेल्या तारखेपासून एक वर्षासाठी हा हयातीचा दाखला वैध राहील.याआधी निवृत्तीवेतनधारकाना, नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाण सादर करावे लागत असे. यामुळे निवृत्तीवेतनधारकाना, मोठ्या प्रमाणात अडचणीना तोंड द्यावे लागत असे, परिणामी निवृत्तीवेतन थांबल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत असत. हयातीचा दाखला उशिराने सादर केल्यास तो नोव्हेंबरपर्यंतच   केवळ काही महिने वैध राहत असे. ईपीएस निवृत्तीवेतनधारकांना विनासायास सामाजिक सुरक्षा कवच पुरवण्याच्या दृष्टीने निवृत्तीवेतनधारकाना उपयुक्त ठरणारे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

ईपीएफओ, आपल्या 65 लाख ईपीएस निवृत्तीवेतनधारकाना आर्थिक स्वातंत्र्य सुलभ राहावे यासाठी  वेळेवर विशेष करून या संकटाच्या काळात वेळेवर निवृत्तीवेतन वितरण सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1630940) Visitor Counter : 727