रसायन आणि खते मंत्रालय

कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी उद्योग क्षेत्राकरिता त्रिमितीय सूक्ष्मजीवरोधी मुख-आवरणाचे मोठ्या स्तरावर उत्पादन व व्यावसायिकरण करण्याबाबत NIPER गुवाहाटी आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड दरम्यान सामंजस्य करार


NIPER -G कडून त्रिमिती प्रिंट असलेल्या तीनपदरी सूक्ष्मजीव रोधी माक्स व हाताचा वापर करावा न लागणाऱ्या उपकरणांचीही निर्मिती

कोविड-19 वर नियंत्रण ठेवण्यासाठी विकसित आणि डिझाईन केलेल्या त्रिमिती उत्पादनांच्या पेटंटसाठी NIPERचा अर्ज

Posted On: 08 JUN 2020 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जून 2020

 

केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील औषधनिर्माण विभागाअंतर्गत असलेली, गुवाहाटीमधील राष्ट्रीय औषध निर्माण शिक्षण आणि संशोधन संस्था- NIPER, ही औषधनिर्माण क्षेत्रातील एक अग्रणी संस्था आहे; या संस्थेने कोविड-19 चे संक्रमण रोखण्यासाठी PPE किट म्हणजेच वैयक्तिक संरक्षण उपकरणे, विकसित करुन मोठे योगदान दिले आहे.

या संस्थेने विकसित केलेल्या थ्री-डी प्रिंटेड म्हणजेच त्रिमितीय सूक्ष्मजीवरोधी फेस शिल्डचे मोठ्या प्रमाणत उत्पादन आणि व्यावसायिकरण करण्यासंदर्भात या संस्थेने आणि पुण्याजवळच्या, पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड या औषधनिर्माण क्षेत्रातील सरकारी कंपनीशी सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती या संस्थेचे संचालक, डॉ यु. एस. एन. मूर्ती यांनी दिली.

NIPER-गुवाहाटीने या त्रिमिती फेस शिल्डचे डिझाईन आणि निर्मितीसाठी भारतीय पेटंट कार्यालयात, पेंटट मिळण्यासाठी अर्जही केला आहे.

NIPER-गुवाहाटीने, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे थ्री-डी फेस शिल्ड म्हणजेच मुख-आवरणचे रेखाटन करुन ते विकसित केले आहेत; तसेच त्यांची उपयुक्तता प्रमाणित करुन घेतली आहे. या विषाणूचे संक्रमण कोणकोणत्या पद्धतीने आणि मार्गाने होऊ शकेल, याचा सखोल व काळजीपूर्वक अभ्यास करुन, त्याचे विश्लेषण करुन त्या निष्कर्षांच्या आधारे हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. या थ्री-डी सूक्ष्मजीवरोधी फेस-शिल्डची वैशिष्ट्ये म्हणजे, कुठलेही संक्रमण रोखू शकण्याची क्षमता, पारदर्शी, तयार करण्यास सुलभ, कमी खर्चिक, वापरण्यास सोपा आणि सूक्ष्मजीवरोधी क्षमता असलेलाअसून त्यात उत्तम दर्जाचे रासायनिक स्थैर्य आणि मजबूत बांधणी तसेच स्वच्छ करण्यास सोपे असे आहे.

याशिवाय, NIPER-गुवाहाटीने थ्री-डी प्रिंट असलेला बहुपदरी सूक्ष्मजीवरोधी फेस मास्क देखील तयार केला आहे. या मास्कच्या पहिल्या पदरावर जीवाणू-रोधी आवरण आहे, दुसऱ्या पदरावर निर्जंतुक करणाऱ्या पदार्थाचे आवरण, ज्यातून हवेतून होणारा संसर्गही टाळता येईल आणि तिसरा पदर हा औषधाचा स्तर असून त्याद्वारे सूक्ष्मजीवांचा हल्ला थोपवता येऊ शकेल.

NIPER-गुवाहाटीने थ्री-डी प्रिंट असलेली हाताचा वापर करावा लागणार नाही अशी उपकरणेही विकसित केली आहेत, ज्यामुळे दारे-खिडक्यांची उघडझाप करतांना किंवा कपाटे, फ्रीज, लिफ्टचे बटन, लॅपटॉप-डेक्सटॉप कीबोर्ड हाताळण्यासाठी हातांचा वापर करावा लागणार नाही. हे उपकरण अत्यंत छोटे आणि वापरण्यास सूटसुटीत असे आहे, तसेच त्याची स्वच्छता करणेही अतिशय सोपे आहे. 

S.Pophale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1630269) Visitor Counter : 241