ऊर्जा मंत्रालय

केंद्रीय उर्जा मंत्र्यांनी संपूर्ण देशभरात वीज खरेदी-विक्रीसाठी रियल टाईम व्यवहार मंचाची केली सुरुवात


भारतीय उर्जा क्षेत्राची रियल टाईम व्यवहारांच्या दिशेने वाटचाल

Posted On: 03 JUN 2020 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2020


केंद्रीय विद्युत तसेच नवीकरणीय आणि पुनर्नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री आर.के.सिंग यांनी 3 जून रोजी नवी दिल्ली येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात वीज खरेदी-विक्री व्यवहार करण्यासाठी रियल टाईम व्यवहार मंचाची सुरुवात केली. या मंचामुळे आता भारत, रियल टाईम व्यवहार करणाऱ्या जगभरातील काही निवडक देशांच्या उर्जा बाजारांमध्ये समाविष्ट झाला आहे.

देशातील उर्जा क्षेत्रात होणारे रियल टाईम व्यवहार करण्यासाठी आता हा सुसंघटीत बाजार उपलब्ध झाला असून त्याद्वारे वीज खरेदी विक्री करणाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार देशभरात कुठेही रियल टाईम व्यवहार करता येणार आहेत, असे सिंग यांनी याप्रसंगी सांगितले. रियल टाईम व्यवहार मंचाची सरुवात झाल्यामुळे उर्जा बाजारातील व्यवहारांमध्ये आवश्यक लवचिकता आली आहे; आता ग्राहकांची विजेची मागणी पूर्ण करून  वीजनिर्मितीची अतिरिक्त क्षमता शिल्लक राहिली असेल तर तिचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल, असे मत त्यांनी नोंदविले. विजेच्या मागणीत असलेली विविधता लक्षात घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुविहित व्यवहारांद्वारे ती पूर्ण करता येईल. 

रियल टाईम व्यवहार मंचाद्वारे वीज खरेदी विक्रीचे व्यवहार करताना दिवसभरात दर 30 मिनिटांच्या ठराविक मुदतीत एकाच किमतीसाठी दोन्ही बाजूंनी बोली लावता येईल. खरेदी-विक्रीकर्त्यांना दर 15 मिनिटांच्या ब्लॉकमध्ये बोली लावता येईल. रियल टाईम व्यवहार मंचामुळे व्यवहारकर्त्यांना डिस्कॉमसाठी मोठ्या बाजारांमध्ये देखील स्पर्धात्मक बोली लावता येईल. तर दुसऱ्या बाजूला, वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना देखील या मंचामुळे फायदा होणार आहे. या कंपन्यांना मागणी नसलेल्या विजेच्या विक्रीसाठी या लिलावात भाग घेता येईल. डिस्कॉमशी दीर्घ मुदतीचे करार केलेल्या आणि रियल टाईम व्यवहारांमध्ये भाग घेणाऱ्या वीज निर्मिती कंपन्यांना व्यवहारातून होणाऱ्या फायद्यात सहभागी करून घेण्याची यंत्रणा देखील या मंचात उपलब्ध करून दिली आहे.

भारत सरकारने 2022 सालापर्यंत 175 गिगावॅट पुनर्नवीकरणीय उर्जा निर्मितीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी देशभरात पुनर्नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. रियल टाईम व्यवहार मंचामुळे पुनर्नवीकरणीय उर्जा निर्मितीच्या कमीजास्त आणि बदलत्या स्वरूपामुळे ग्रीड व्यवस्थापनासमोर असलेली आव्हाने पेलण्यासाठी आणि पुनर्नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्राकडून ग्रीडमध्ये जास्त प्रमाणात वीज मिळवता येण्यासाठी मदत होणार आहे.

बोली लावण्याचा कमी कालावधी, व्यवहारांसाठी जलद वेळापत्रक आणि सुनिश्चित पद्धतीमुळे रियल टाईम व्यवहार मंच सहभागी कंपन्यांना संपूर्ण देशातील वीज निर्मिती स्त्रोतांपर्यंत पोहचणे सहज शक्य होईल आणि निकोप स्पर्धेला वाव मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 


* * *

S.Pophale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1629055) Visitor Counter : 378