वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
निर्यातदारांनी अधिक स्पर्धात्मक बनून जगाला दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून देण्याचे पियुष गोयल यांचे आवाहन
विद्यमान सामर्थ्याच्या क्षेत्रात विविधता, एकत्रीकरण आणि नवीन बाजारपेठेचा शोध हा यशाचा मंत्र आहे
प्रविष्टि तिथि:
28 MAY 2020 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 मे 2020
केंद्रीय वाणिज्य व उद्योग आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल आज व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भारतीय उद्योग परीसंघाने (सीआयआय) ने निर्यातीवर आयोजित केलेल्या डिजिटल परिषदेत सहभागी झाले. एक्सिम बँक ऑफ इंडिया ही या परिषदेची संस्थात्मक भागीदार होती.
या परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले, विकासाचे भवितव्य हे उद्योग आणि खाजगी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि सरकारची यात भूमिका खूपच कमी असेल. भारताची निर्यात वृद्धिंगत करण्यासाठी मंत्र्यांनी तीन महत्वपूर्ण मार्ग सांगितले : उत्पादन पुनरुज्जीवित करणे, निर्यातीमध्ये वैविध्यता आणणे आणि नवीन व स्वीकारार्ह बाजारपेठ शोधणे. आपल्या अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी निर्यातीच्या विविधीकरणा व्यतिरिक्त विद्यमान सामर्थ्यशील क्षेत्र एकत्रीकरणावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की, ऑटो कंपोनंट क्षेत्र, फर्निचर, एअर कंडिशनर आणि इतर क्षेत्रांमध्ये स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची भारताला मोठी संधी आहे. ते म्हणाले की इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनास प्रोत्साहन देत आहे, औषधनिर्मिती क्षेत्रात आम्ही एपीआय उत्पादनाला प्रोत्साहन देत आहोत आणि कृषी निर्यात क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत.ते म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान संबंधित सेवेमध्ये संपूर्ण जगाने भारताचे विशेषज्ञता आणि कौशल्य ओळखले आहे आणि म्हणूनच आम्ही नॅसकॉमला पुढील पाच वर्षांत या क्षेत्राला 500 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवण्यास सांगितले आहे.
ते म्हणाले की, आत्मनिर्भर भारत हे केवळ मोठ्या प्रमाणावर आत्मनिर्भर होण्यापर्यंत मर्यादित नसून आपल्या सामर्थ्याने जगाशी नेहमी निगडीत राहणे हे आहे आत्मनिर्भर. ते म्हणाले की, जागतिक बाजारात भारताला विश्वासार्ह भागीदार आणि विश्वासार्ह मित्र या नात्याने पाहिले जावे, विशेषतः जेव्हा जागतिक पुरवठा साखळी पुन्हा नव्याने सुरू होत आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाबद्दल गोयल म्हणाले की, आपण आपल्या सामर्थ्यशाली स्थानांबद्दल बोलले पाहिजे, स्पर्धात्मक झाले पाहिजे आणि जगाला दर्जेदार उत्पादने उपलब्ध करून दिली पाहिजेत. यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे तीव्र इच्छाशक्ती असली पाहिजे. जर कुठच्याही आव्हानांना सामोरे जाण्याची आपली तयारी असेल तर कोणतीही संकटे आपला रस्ता रोखू शकत नाहीत.
गोयल यांनी सीआयआयचे 125 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि जागतिक मूल्य शृंखलेत (जीव्हीसी) एकत्रिकरणाच्या माध्यामतून निर्यात वृद्धिंगत करण्यासाठी कृतिदल स्थापन केल्याबद्दल अभिनंदन केले. त्यांनी कृतीदलासोबत काम करण्याची आणि उद्योग व देशाच्या हितासाठी आवश्यक तेथे कार्य करण्याची वचनबद्धता व्यक्त केली. त्यांनी निर्यात करणाऱ्या समुदायाला आश्वासन दिले की सरकार, मग ते केंद्र असो वा राज्य सरकार असो, नेहमीच संपूर्ण पाठिंबा देतील, त्यांच्यासोबत भागीदारीत काम करण्यासाठी इच्छुक आहेत. ते म्हणाले की, देशात कुशल मनुष्यबळ असून विद्यापीठे आणि संशोधन प्रयोगशाळेसारख्या जागतिक स्तरीय संस्था आहेत आणि आपण भारताच्या 130 कोटी लोकांच्या हितासाठी काम करूया.
सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी म्हणाले की, आपल्या निर्यातीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुधारणा आपण पूर्ण केल्या पाहिजेत आणि हीच ती योग्य वेळ आहे. ते म्हणाले की व्यवसायातील लॉजिस्टिक्स, दर्जेदार मानदंडांचे पालन, जीव्हीसीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडणे आणि एफटीएचा लाभ घेण्यासाठी मजबूत धोरण महत्त्वाचे ठरेल.
* * *
B.Gokhale/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1627505)
आगंतुक पटल : 280