रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने 27 मे 2020 पर्यंत संपूर्ण देशभरामध्ये 3543 ‘‘श्रमिक विशेष’’ गाड्या चालविल्या आणि 26 दिवसांमध्ये 48 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना त्यांच्या गृहराज्यांमध्ये पोहोचवले
स्थलांतर करणाऱ्या प्रवाशांना 78 लाखांपेक्षा जास्त भोजनाची पाकिटे आणि 1.10 कोटी पेयजलाच्या बाटल्या वितरित केल्या
26 मे, 2020 रोजी 255 श्रमिक विशेष गाड्या सोडण्यात आल्या
श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त रेल्वेने 12 मे पासून नवी दिल्लीला जोडणाऱ्या 15 विशेष गाड्यांच्या जोड्या सोडल्या; तसेच 1 जूनपासून आणखी 200 गाड्या सोडण्याची योजना तयार
Posted On:
27 MAY 2020 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2020
देशभरामध्ये ठिकठिकाणी अडकून पडलेल्या लोकांना त्यांच्या गृहराज्यांमध्ये सुरक्षित पोहोचवण्यासाठी गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार दि. 1 मे, 2020 पासून ‘‘श्रमिक विशेष’’ गाड्या रेल्वेच्यावतीने सोडण्यात येत आहेत. या गाड्यांमधून ठिकठिकाणच्या श्रमिक, स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर अडकून पडलेल्या लोकांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
या योजनेनुसार भारतीय रेल्वेने दि. 27 मे 2020 पर्यंत संपूर्ण देशभरामध्ये एकूण 3543 ‘‘श्रमिक विशेष’’ गाड्या चालविल्या. दि. 26 मे, 2020 रोजी एकूण 255 ‘‘श्रमिक विशेष’’ गाड्या सोडण्यात आल्या. गेल्या 26 दिवसांमध्ये 48 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांना त्यांच्या गृहराज्यांमध्ये पोहोचवण्याचे कार्य भारतीय रेल्वेने केले आहे.
या 3543 गाड्या मूळ वेगवेगळ्या राज्यांच्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त गाड्या असलेली पाच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुढील प्रमाणे आहेत. गुजरात (946 गाड्या), महाराष्ट्र (677 गाड्या), पंजाब (377 गाड्या), उत्तर प्रदेश (247 गाड्या) आणि बिहार (215 गाड्या)
या श्रमिक विशेष गाड्या संपूर्ण देशभरामध्ये पाठवण्यात आल्या. त्यामध्ये सर्वात जास्त गाड्या ज्या राज्यात पाठवण्यात आल्या, त्यांची नावे आणि गाड्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. उत्तर प्रदेश (1392 गाड्या), बिहार (1123 गाड्या), झारखंड (156 गाड्या), मध्य प्रदेश (119 गाड्या), ओडिशा (123 गाड्या).
आयआरसीटीसीच्यावतीने स्थलांतरित प्रवाशांसाठी 78 लाखांपेक्षा जास्त भोजनाची पाकिटे आणि 1.10 कोटी पेयजलाच्या बाटल्या वितरित करण्यात आल्या आहेत.
आज ज्या गाड्या धावत आहेत, त्यापैकी कोणत्याही गाडीमध्ये गर्दी नाही, असे रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त रेल्वेने 12 मे पासून नवी दिल्लीला जोडणाऱ्या 15 विशेष गाड्यांच्या जोड्या सोडण्यात येत आहेत तसेच 1 जूनपासून आणखी 200 गाड्या सोडण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627278)
Visitor Counter : 348