सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
उच्च शिक्षणसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याचे अत्यंत महत्वाचे –नितीन गडकरी
वाहने भंगारात काढण्याचे धोरण वाहनउद्योग क्षेत्राला मोठे पाठबळ देईल-गडकरी
Posted On:
21 MAY 2020 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मे 2020
उच्च शिक्षणसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे अत्यंत महत्वाचे आहे, असे मत, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. या संस्थांनी आपल्या गुणवत्तेत काहीही तडजोड न करता, त्यांचा परिचालन खर्च कमी करायला हवा, अशी सूचना त्यांनी केली.
MIT ADT विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘उच्च शिक्षणसंस्थांचे भवितव्य’ या विषयावर त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
विद्यापीठांनी आधुनिक आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे आणि मूल्याधारित शिक्षण हीच समाजाची खरी ताकद आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. युवकांनी आपली बलस्थाने आणि कमकुवत बाजू ओळखाव्यात आणि त्यानुसार आपल्यासमोर असलेल्या आव्हाने आणि समस्यांचे संधीत रुपांतर करावे, असा सल्ला गडकरी यांनी दिला. सध्या देश ज्या स्थितीतून जात आहे, अशा स्थितीत युवकांची क्षमता वाढवणे अतिशय महत्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिक्षणक्षेत्राशी संबंधित सर्व हितसंबंधी गटांमध्ये एकात्मिक दृष्टीकोन, प्रभावी समन्वय आणि एकसंघभावना असणे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला आणि सध्याच्या आव्हानात्मक काळातून आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टीकोन ठेवून बाहेर पडावे, असे आव्हान उद्योगजगताला केले.
उद्योगक्षेत्राने संशोधन, स्वयंउद्योजकता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन कौशल्ये आणि ज्ञानाचे संपत्तीत ररुपांतर करण्याच्या अनुभवांवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.
जपान चीनमधून आपली गुंतवणूक काढून घेत इतरत्र वळवण्याचा विचार करत असून, जपानी उद्योगांनी भारतात यावे यासाठी, केंद्र सरकारने त्यांना अनेक विशेष प्रस्ताव दिले आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. ही भारताच्या दृष्टीने मोठी संधी असून तिचा लाभ घ्यायला हवा, असे ते म्हणाले.
उद्योगक्षेत्रांचे विकेंद्रीकरण करुन हे उद्योग देशाच्या ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागापर्यंत नेणे काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. कृषी-सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा विस्तार करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.
केंद्र सरकार वाहन भंगारात टाकण्याविषयीचे धोरण लवकरच आणणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भंगार वाहनांवर पुनर्प्रक्रिया करण्याची संकुले बंदरांजवळ उभारली जावी जेणेकरुन देशातील वाहनउद्योगाला पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी विचारलेल्या प्रश्नांचीही गडकरी यांनी उत्तरे दिली आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.
M.Jaitly/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1625871)
Visitor Counter : 236