रेल्वे मंत्रालय
1 जून 2020 पासून सुरु होणाऱ्या रेल्वे सेवांसाठी मार्गदर्शक तत्त्वे
रेल्वे सेवांची श्रेणीबद्ध पुनःस्थापना
स्थलांतरितांसाठी तसेच श्रमिक गाड्यांव्यतिरिक्त इच्छुक प्रवाशांसाठी उचलेले पाऊल
हे नियम श्रमिक गाड्यांव्यतिरिक्त इतर मोठ्या संख्येने धावणाऱ्या गाड्यांसाठी आहेत
गाड्यांच्या 100 जोड्या सूचीबद्ध
तिकिट आरक्षण व वेळापत्रक, राखीव जागा, सवलती, रद्दबातल व परतावा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा, पांघरुणे इत्यादी गोष्टींसाठीचे निकष
या सर्व गाड्यांचे आरक्षण 21/05/20 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल
सर्व मेल / एक्स्प्रेस, प्रवासी व उपनगरी सेवांसह इतर नियमित प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत रद्द असतील
रेल्वेचा कोणताही डबा अनारक्षित राहणार नाही
सर्वसाधारण डब्यातील आरक्षणानुसार तिकीट दर सामान्य असतील तसेच सर्व प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्था असेल व त्याचे भाडे आकारले जाईल
आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाद्वारे किंवा मोबाइल ॲपद्वारे केवळ ऑनलाईन ई-तिकीट आरक्षण केले जाईल; कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीवरून तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत
एआरपी (आगाऊ आरक्षण कालावधी) जास्तीत जास्त 30 दिवस असेल
केवळ पुष्टीकृत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल
गाडीत चढण्यापूर्वी स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे व फक्त रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करण्याची परवानगी आहे
या विशेष गाड्यांमध्ये चार प्रकारांच्या दिव्यांगजन सवलती व 11 प्रकारच्या रुग्ण सवलतींना परवानगी आहे
गंतव्यस्थानावर आगमनानंतर प्रवाशांना तेथील राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे लागेल
गाडीमध्ये पांघरूण, चादरी व पडदे दिले जाणार नाहीत
Posted On:
20 MAY 2020 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मे 2020
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (एमओएचएफडब्ल्यू) व गृह मंत्रालय (एमएचए) यांच्याशी सल्लामसलत करून आरोग्य मंत्रालयाने (एमओआर) 01 जून 2020 पासून भारतीय रेल्वेची रेल्वे सेवा अंशतः सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
खाली जोडलेल्या परिपत्रकानुसार भारतीय रेल्वे 200 प्रवासी गाड्या सुरु करणार आहे. या गाड्या 1 जून पासून धावतील व या सर्व गाड्यांचे आरक्षण 21 मे 2020 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होईल.
या विशेष सेवा 1 मे पासून चालविण्यात येणाऱ्या सध्याच्या श्रमिक विशेष गाड्यांव्यतिरिक्त आणि 12 मे 2020 पासून चालविण्यात येणाऱ्या विशेष वातानुकूलित (30 गाड्या) गाड्यांव्यतिरिक्त चालविल्या जातील.
सर्व मेल / एक्स्प्रेस, प्रवासी आणि उपनगरी सेवांसह इतर नियमित प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत रद्द असतील.
गाडीचा प्रकार: नियमित गाड्यांच्या धर्तीवर विशेष गाड्या
या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित या दोन्ही वर्गातील पूर्णपणे आरक्षित गाड्या असतील. सामान्य डब्यातही बसण्यासाठी आरक्षित जागा असेल. गाडीमध्ये कोणताही डबा अनारक्षित राहणार नाही.
सर्वसाधारण डब्यातील आरक्षणानुसार तिकीट दर सामान्य असतील आणि सर्व प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्था असेल आणि त्याचे भाडे आकारले जाईल.
तिकीट आरक्षण आणि प्रवासी तक्ता
i. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळाद्वारे किंवा मोबाइल अॅपद्वारे केवळ ऑनलाईन ई-तिकीट आरक्षण केले जाईल. कोणत्याही रेल्वे स्थानकावरील आरक्षण खिडकीवरून तिकिटे आरक्षित केली जाणार नाहीत. ‘दलाल’, (आयआरसीटीसी दलाल आणि रेल्वे दलाल दोघे) यांच्यामार्फत तिकिट आरक्षित करण्यास परवानगी नाही.
ii. एआरपी (आगाऊ आरक्षण कालावधी) जास्तीत जास्त 30 दिवस असेल.
iii. अस्तित्त्वात असलेल्या नियमांनुसार आरएसी आणि प्रतिक्षा यादी तयार केली जाईल, परंतु प्रतिक्षा यादी तिकीट धारकांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाणार नाही.
iv. कोणतीही आरक्षित नसलेली (यूटीएस) तिकिटे दिली जाणार नाहीत आणि कोणत्याही प्रवाशाला गाडीत चढल्यावर प्रवासादरम्यान तिकिट दिले जाणार नाही.
v. या गाड्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तात्काळ आणि प्रीमियम तात्काळ आरक्षण करण्यास परवानगी नाही.
vi. गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेआधी कमीतकमी 4 तास पहिला प्रवासी तक्ता तयार केला जाईल व दुसरा तक्ता गाडी सुटण्यापूर्वी किमान 2 तास (सध्याच्या 30 मिनिटांऐवजी) तयार केला जाईल. पहिल्या आणि दुसर्या तक्त्याच्या तयारी दरम्यान फक्त तात्काळ ऑनलाइन आरक्षणाला परवानगी असेल.
vii. गाडीत चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग होईल आणि फक्त रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.
viii. या विशेष सेवांनी प्रवास करणारे प्रवासी खालील खबरदारीचे पालन करतीलः
1. केवळ पुष्टीकृत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.
2. गाडीत चढताना आणि प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी चेहऱ्यावर मास्क घातला पाहिजे.
3. स्थानकावर थर्मल स्क्रिनिंग सुलभ करण्यासाठी प्रवासी कमीतकमी 90 मिनिटे आधी स्थानकावर पोहोचेल. रोगाची लक्षणे न आढळणाऱ्या प्रवाशांनाच केवळ प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल.
4. प्रवाशांनी स्थानकावर आणि रेल्वेमध्ये सुरक्षित अंतराचे पालन केले पाहिजे.
5. त्यांच्या गंतव्यस्थानावर आगमन झाल्यानंतर प्रवाशांना तेथील राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी सूचित केलेल्या आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे लागेल.
राखीव जागा परवानगी: नियमित गाड्यांप्रमाणे या विशेष गाड्यांमध्ये सर्व राखीव जागांना परवानगी देण्यात येईल. यासाठी मर्यादित संख्येत आरक्षण (पीआरएस) खिडकी सुरु ठेवल्या जातील. तथापि, या खिडकीवर सामान्य तिकिट आरक्षण करता येणार नाही.
सवलती: या विशेष गाड्यांमध्ये चार प्रकारांच्या दिव्यांगजन सवलती आणि 11 प्रकारच्या रुग्ण सवलतींना परवानगी आहे.
तिकीट रद्द करणे आणि परतावा नियमः रेल्वे प्रवासी (तिकीट रद्द करणे आणि भाडे परत देणे) नियम 2015 लागू असेल.
याव्यतिरिक्त, कोरोनाच्या लक्षणांमुळे प्रवासी प्रवास करण्यास योग्य नसल्यास भाड्याच्या परताव्यासंदर्भात आधीच जारी केलेल्या सूचना लागू असतील.
गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गाडीत चढण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग होईल आणि फक्त रोगाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच गाडीत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल.
तपासणी दरम्यान एखाद्या प्रवाशाला खूप ताप आणि कोविड -19 इत्यादी लक्षणे आढळल्यास तिकीटाची पुष्टी केलेली असूनसुद्धा त्याला प्रवास करण्यास परवानगी दिली जाणार नाही. अशा परिस्थितीत प्रवाशांना संपूर्ण परतावा खालीलप्रमाणे दिला जाईल: -
(i) प्रवासी नाव आरक्षणावर (पीएनआरवर) एकल प्रवासी
(ii) तिकिटावर जर एखादा प्रवासी प्रवास करण्यास अयोग्य आढळला असेल आणि त्याच पीएनआरवरील इतर सर्व प्रवाशांना त्यावेळी प्रवास करण्याची इच्छा नसेल तर सर्व प्रवाशांना संपूर्ण परतावा देण्यात येईल.
(iii) तिकिटावर जर एखादा प्रवासी प्रवास करण्यास अयोग्य वाटला असेल आणि पीएनआरवरील इतर प्रवाशांना त्या प्रवासाची इच्छा असेल तर प्रवासाची परवानगी नसलेल्या प्रवाशाला संपूर्ण परतावा देण्यात येईल.
वरील सर्व प्रकरणांसाठी, प्रचलित प्रथेनुसार टीटीई प्रमाणपत्र प्रवाशाला प्रवेशद्वारात / तपासणी ठिकाणी / स्क्रीनिंगच्या ठिकाणी दिले जाईल ज्यात उल्लेख केलेला असेल की “एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रवाश्यांमध्ये कोविड 19 च्या लक्षणांमुळे प्रवास करत नसलेल्या प्रवाशांची संख्या”
टीटीई प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रवास न केलेल्या प्रवाशांच्या परताव्यासाठी प्रवासाच्या तारखेपासून 10 दिवसांच्या आत ऑनलाईन टीडीआर दाखल करावा लागेल.
जारी केलेले टीटीई प्रमाणपत्र प्रवाशांद्वारे विद्यमान तरतुदीनुसार आयआरसीटीसीला पाठविले जाईल आणि एका तिकिटावर प्रवास न केलेल्या प्रवाशांचे / किंवा तिकिटावरील सर्वानीच प्रवास केला नसल्यास त्या सर्व प्रवाशांचे संपूर्ण भाडे त्यांच्या खात्यात परत केले जाईल.
वरील उद्देशाने कोविड -19 च्या लक्षणांमुळे प्रवास करत नसलेल्या प्रवाशांसाठी तिकिटाचे पैसे भरल्याची पावती दाखल करण्यासाठी सीआरआयएस आणि आयआरसीटीसी आवश्यक ते बदल करतील. कोविड -19 च्या लक्षणांमुळे /उच्च तापमानामुळे रेल्वेने प्रवास करण्यास परवानगी नसलेली एक व्यक्ती किंवा त्या तिकिटावरील सर्व प्रवाशांचे पैसे परत करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
भोजन सेवा:
भाड्यात कोणतेही भोजन शुल्क समाविष्ट केले जाणार नाही. जेवण मागविण्याची आगाऊ आरक्षण तरतूद, ‘ई-खानपान’ हे उपलब्ध नसेल. तथापि, ज्या गाड्यांमध्ये भोजनाचा डबा जोडलेला आहे, त्या मर्यादित गाड्यांमध्येच पैसे आकारून आयआरसीटीसी, मर्यादित भोजन व सीलबंद पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देईल. या संदर्भातील माहिती तिकिट आरक्षणाच्या वेळी प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यात येईल.
प्रवाशांना त्यांचे स्वतःचे खाद्यपदार्थ व प्यायचे पाणी नेण्यास प्रोत्साहन देण्यात येईल.
रेल्वे स्थानकांवरील सर्व स्थिर उपहार स्टॉल व व्हेंडिंग युनिट्स (बहुउद्देशीय स्टॉल्स, पुस्तकांचे स्टॉल्स, औषधांचे स्टॉल्स इत्यादी) खुले राहतील. फूड प्लाझा आणि विश्रामगृहात शिजवलेले पदार्थ बसून खाता येणार नाहीत फक्त पार्सल बरोबर घेऊन जाऊ शकतात.
अंथरूण- पांघरूण:
गाडीमध्ये अंथरूण-पांघरूण, पडदे दिले जाणार नाहीत. प्रवाशांना प्रवासासाठी स्वतःचे पांघरूण घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या उद्देशाने वातानुकूलित डब्यातील तापमान योग्य प्रकारे नियमित केले जाईल.
प्रवासी समोरासमोर येऊ नयेत म्हणून रेल्वे स्थानकांवर शक्य तितक्या वेगवेगळ्या प्रवेश आणि गंतव्य द्वाराची सोय करण्याच्या सूचना विभागीय रेल्वेला देण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वेत पाळावयाचे सुरक्षित मानक अंतराचे नियम विभागीय रेल्वेला कळविले जातील तसेच सुरक्षा व स्वच्छता नियमांचे पालन केले जाईल.
सर्व प्रवाशांनी आरोग्य सेतू अॅप्लिकेशन डाऊनलोड करुन वापरणे आवश्यक आहे. प्रवाशांना कमी वजनाच्या सामानासह प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.
गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रवाशांना तसेच रेल्वे स्थानकात प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहन चालकास ई-तिकीटाच्या आधारे परवानगी असेल.
जोडपत्राची लिंक:
S.Pophale/V.Joshi/P.Malandkar
(Release ID: 1625749)
Visitor Counter : 456