सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

कॉयर जिओ टेक्सटाईलला ग्रामीण रस्ता बांधकाम करण्यास मिळाली मान्यता


खासकरुन कोविड महामारीच्या काळात कॉयर उद्योगाला चालना देण्यासाठी हा निर्णय: गडकरी

Posted On: 20 MAY 2020 12:59PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 20 मे 2020

 

कॉयर जिओ टेक्स्टाईल हे एक अभेद्य (क्षरणक्षम) कापड असून ते नैसर्गिक, मजबूत, अत्यंत टिकाऊ असते तसेच ते कुजत नाही किंवा बुरशी आणि ओलावा प्रतिरोधक व सूक्ष्मजंतूंच्या हल्ल्यापासून मुक्त असते. म्हणूनच अंतिमतः ग्रामीण रस्ता बांधकामांसाठी एक चांगले साहित्य म्हणून स्वीकारले गेले आहे.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना -3 अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी कॉयर जिओ टेक्सटाईलचा उपयोग केला जाईल अशी माहिती भारत सरकारच्या केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पायाभूत सुविधा विकास संस्थेशी झालेल्या संवादानंतर देण्यात आली.

कॉयर फायबरचा पर्यायी वापर करून घेण्यात पुढाकार घेणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महत्वपूर्ण निर्णयाविषयी सांगितले कि, “रस्ते बांधकामात कॉयर जिओ टेक्सटाईलचा वापर करण्यात यशस्वी होणे हे विकासाच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. या निर्णयामुळे कॉयर उद्योगाला या महामारीच्या संकटकाळात खासकरून विशेष चालना मिळेल.

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नवीन रस्ते बांधणीच्या तंत्रज्ञानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्तावांच्या  प्रत्येक तुकडीतील 15 % काम हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून करावयाचे आहे. यापैकी 5 % रस्ते हे आयआरसी मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करायचे आहेत. आयआरसीने आता ग्रामीण रस्ते तयार करण्यासाठी कॉयर जिओ टेक्सटाईलला मान्यता दिली आहे.

या सूचनांनुसार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना -3 अंतर्गत ग्रामीण भागातील 5 % लांबीचे रस्ते कॉयर जिओ टेक्सटाईल वापरुन तयार केले जाणार आहेत. त्यानुसार आंध्र प्रदेशात कॉयर जिओ टेक्सटाईल वापरून 164 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले जातील, गुजरातमध्ये 151किलोमीटर, केरळमध्ये 71 कि.मी., महाराष्ट्रात 328 कि.मी., ओदिशामध्ये 470 किलोमीटर, तामिळनाडूत 369 किलोमीटर आणि तेलंगणामध्ये 121 किलोमीटरचे रस्ते तयार केले जातील. अशाप्रकारे 07 राज्यांत कॉयर जिओ टेक्सटाईलचा वापर करून एकूण 1674 कि.मी. लांबीचे रस्ते तयार केले जातील. त्यासाठी सुमारे 70 कोटीं रुपये किमतीचे एक कोटी चौरस मीटर कॉयर जिओ-टेक्सटाईल लागेल.

या निर्णयामुळे देशातील कॉयर जिओ-टेक्सटाईलसाठी बाजारपेठेची संभाव्यता खुली झाली आहे आणि कोविड -19 मुळे परिणाम झालेल्या कॉयर उद्योगाला हे वरदान ठरेल.

 

S.Pophale/V.Joshi/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1625511) Visitor Counter : 259