गृह मंत्रालय

मोदी सरकारचा विश्वास - शेतकऱ्यांच्या कल्याणामध्येच भारताचेही कल्याण, शेतकरी सशक्त झाला, तर देश आत्मनिर्भर: अमित शहा


संकटाच्या काळामध्ये शेतकरी बांधवांविषयी पंतप्रधान मोदी यांची संवेदनशीलता संपूर्ण विश्वासाठी अनुकरणीय: गृहमंत्री

आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत मोदी सरकारच्यावतीने घेतलेल्या निर्णयांमुळे संबंधित क्षेत्रांचा अभूतपूर्व विकास होईल; यामुळे या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होवून उत्पन्न वाढेल: अमित शहा

Posted On: 15 MAY 2020 11:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2020

 

आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज  शेती आणि कृषी संबंधित क्षेत्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री सीतारमण यांचे अभिनंदन करून गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, ‘‘बळीराजाच्या कल्याणामध्येच भारताचेही कल्याण आहे, असा मोदी सरकारचा विश्वास आहे. आज शेतकरी वर्गासाठी तसेच कृषी क्षेत्रासाठी दिलेली भरघोस मदत पाहता, शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्टीने सशक्त बनवून देशाला स्वावलंबी बनवण्याची सरकारची दूरदृष्टी दर्शवते.’’ 

संपूर्ण देशभरात लॉकडाउन असतानाही शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने जी महत्वपूर्ण पावले उचलली त्याविषयी बोलताना गृहमंत्री म्हणाले, ‘‘ मोदी सरकारने लॉकडाउनच्या काळात शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. यासाठी 74,300 कोटी रुपयांचे अन्नधान्य  किमान आधारभूत मूल्य देवून खरेदी करण्यात आले. ‘पीएम किसान’ अंतर्गत 18,700  कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या थेट बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. तसेच पीक विमा योजनेअंतर्गत 6,400 कोटी रुपये देण्यात आले.’’ सध्या अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे, अशा संकटकाळामध्ये पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी बांधवांविषयी जी संवेदनशीलता दाखवली आहे, ती संपूर्ण विश्वासाठी अनुकरणीय आहे, असंही अमित शहा यावेळी म्हणाले. 

पशुसंवर्धन क्षेत्राशी निगडित घोषित करण्यात आलेल्या पॅकेजविषयी गृहमंत्री शहा म्हणाले, ‘‘कोविड-19 महामारीच्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये दुधाचा वापर 20 ते 25 टक्के कमी झाला आहे. परंतु मोदी सरकारने 111 कोटी लीटर दूध खरेदी करून त्याचे 4,100 कोटी रुपये दूध उत्पादक शेतकरी बांधवांना दिले आहेत.’’ आज पशुपालन क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या 2  कोटी शेतकरी बांधवांसाठी 5,000 कोटी रुपये मदत म्हणून देण्याचे जाहीर केले आहे. यासाठी शहा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. 

आज ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ची घोषणा करण्यात आली. यासाठी एक लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याविषयी गृहमंत्री शहा म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या सरकारला या निधीमुळे कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करता येतील आणि त्यामुळे एक नवी दिशा मिळेल, या निधीमुळे भारतातल्या शेतकरी वर्गाचे कल्याण होईल, असा माझा विश्वास आहे.’’ 

क्लस्टरआधारित दृष्टिकोन स्वीकारून मायक्रो फूड एंटरप्रायजेससाठी 10,000कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आंबा, केशर, मिरची आणि बांबू यासारख्या पिकांशी निगडीत लहान-लहान उद्योगांना चांगले प्रोत्साहन मिळणार आहे. यामुळे या लहान उद्योजकांचे केवळ उत्पन्नच वाढेल असे नाही, तर त्यांना उत्तम बाजारपेठ उपलब्ध होवू शकेल, असं शहा यावेळी म्हणाले. 

मत्स्योद्योग क्षेत्रासाठी पॅकेज जाहीर केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘पंतप्रधानांनी मत्स्य पालन क्षेत्रासाठी 20,000 कोटी रुपये प्रदान केले आहेत. यामुळे मत्स्यपालन क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांबरोबरच आधुनिकीकरण करता येईल. ही मदत ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’(पीएमएमएसवाय) या अंतर्गत दिली आहे. मत्स्यपालन क्षेत्रामध्ये उत्पादकता आणि गुणवत्ता आणण्यास मदत मिळेल तसेच या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.’’ 

पशुसंवर्धन क्षेत्रासाठी ‘पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी’ म्हणून 15,000 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर औषधी वनस्पतींची शेती करण्यासाठी  प्रोत्साहन मिळावे म्हणून 4,000 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. तसेच मधुमक्षिका पालन क्षेत्रासाठी 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होवून विकास साध्य होणार आहे, असं अमित शहा यावेळी म्हणाले. 

कृषी पणन क्षेत्रामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर गृहमंत्री शहा म्हणाले, शेतकरी बांधवांना आपल्या उत्पादनाला चांगली किंमत मिळावी आणि त्यांना आपले पिक विकण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध व्हावेत, यासाठी मोदी सरकार एक केंद्रीय कायदा आणणार आहे. या नवीन कायद्यामुळे शेतकरी बांधवांना कोणत्याही राज्यांमध्ये विना-अडथळा, मुक्त व्यापार करणे शक्य होईल. त्याचबरोबर ई-व्यापार व्यवहारांमुळे शेतकरी बांधवांना आपले उत्पादन देशाच्या कोणत्याही भागात, कानाकोप-यात पोहोचवणे शक्य होणार आहे. 


* * *

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1624461) Visitor Counter : 143