सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

स्थानिक प्रदेशात उपलब्ध कच्च्या मालाचा वापर करून कृषी, मत्स्य आणि वनक्षेत्रांशी संबंधित एमएसएमईसाठी उत्पादन करण्यावर नीतीन गडकरी यांचा भर

Posted On: 12 MAY 2020 10:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  12 मे 2020

स्थानिक प्रदेशात उपलब्ध कच्च्या मालाचा वापर करून कृषी , मत्स्य आणि वनक्षेत्रांशी संबंधित एमएसएमई अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी उत्पादन करण्यावर केंद्रीय एमएसएमई आणि रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी भर दिला आहे. ते आज भारतीय एमएसएमई चेंबर आणि इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकाउंन्टच्या प्रतिनिधींशी कोविड-19च्या भारतावरील प्रभावासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करत होते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी सुसज्ज असलेले औद्योगिक समूह, लॉजिस्टिक्स पार्क्स यामध्ये भविष्यातील गुंतवणूक करण्यासाठी नवे हरित द्रुतगती मार्ग उद्योगांना संधी उपलब्ध करून देत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. उद्योगांचे विकेंद्रीकरण करण्याच्या आणि देशाच्या ग्रामीण, आदिवासी आणि मागास भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

केंद्रीय मंत्र्यांनी निर्यातीमध्ये वाढ करण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आणि उर्जा, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन यावरील खर्चात कपात करण्यासाठी आवश्यक पद्धतींचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.

भारतामध्ये होणारी परदेशी मालाच्या आयातीला स्थानिक उत्पादनांच्या माध्यमातून पर्याय निर्माण करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांनी नवनिर्मिती, उद्योजकता, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य आणि अनुभव यावर जास्तीत जास्त भर देऊन ज्ञानाचे रुपांतर संपत्तीमध्ये केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

पारदर्शकता आणण्यासाठी आणि कालबद्ध आणि परिणाम दाखवणाऱ्या प्रक्रियांसाठी एमएसएमईंचे मानांकन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित मूल्यमापन प्रणाली तयार करण्यासाठी नव्या कल्पनांना पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याशिवाय, भारतातील एमएसएमई अवकाशाला बळकट करण्यासाठी जगातील सर्वोत्तम पद्धतींच्या अध्ययनाला पाठबळ द्यावे अशी मागणी त्यांनी केली.

कोविड-19 च्या फैलावाला प्रतिबंध करण्यासाठी उद्योगांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. वैयक्तिक आयुष्यात आणि  उद्योगांमध्ये कामकाज करताना पीपीई( मास्क, सॅनिटायजर इत्यादी)चा वापर करण्यावर आणि वैयक्तिक सुरक्षित अंतर राखण्यावर  त्यांनी भर दिला. सर्व संबंधितांनी या आपत्तीवर मात करण्यासाठी आणि जनतेचे जीवन आणि चरितार्थ यांचे रक्षण करण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोनाचा स्वीकार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

या आपत्तीला तोंड देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन राखण्याचे देखील त्यांनी आवाहन केले. कोविड-19 सोबत जगण्याची कला आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जपानी कंपन्यांना चीनमधून आपली गुंतवणूक काढून घेण्यासाठी आणि इतरत्र उद्योग सुरु करण्यासाठी जपान सरकारने विशेष  पॅकेज देऊ केले आहे याची त्यांनी आठवण करून दिली.भारतासाठी ही एक मोठी संधी आहे आणि भारताने ती चटकन स्वीकारली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या संवादाच्या वेळी उपस्थित प्रतिनिधींनी कोविड-19 महामारीच्या काळात भेडसावणाऱ्या विविध आव्हानांबाबत चिंता व्यक्त केली आणि काही सूचना केल्या आणि या क्षेत्राचे अस्तित्व टिकवण्यासाठी सरकारकडून पाठबळ देण्याची मागणी केली. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांपैकी काही प्रमुख मुद्दे आणि सूचना खालीलप्रमाणे आहेतः

एमएसएमई प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी विशेष न्यायाधिकरणांची स्थापना, एक वर्षाच्या कालावधीसाठी SARFAESI कायदा स्थगित करावा, अर्थसाहाय्याचे पुरेसे पर्याय निर्माण करावे आणि त्याचा योग्य वापर होत असल्याची खातरजमा करणाऱ्या यंत्रणांची निर्मिती करावी, मजुरांच्या स्थलांतरामुळे निर्माण झालेले मनुष्यबळाच्या कमतरतेच्या आव्हानाला तोंड देण्याची योजना तयार करावी, स्वस्त आयातीचा धोका ओळखून एमएसएमईंसाठी तरतूद करावी, थकित कर्जाच्या खात्यांची पुनर्रचना,बँकेकडून कर्जासाठी सिबिल स्कोर आणि बाह्य पत मानांकनाच्या आवश्यकतेची अट काढून टाकावी, एखाद्या एमएसएमईच्या बाजूने निकाल लागला असेल तर त्याविरोधात आव्हान देण्याचा पर्याय तात्पुरता स्थगित करावा, उत्पादन प्रकिया पूर्ण झालेल्या उत्पादनांसाठी पुरवठा साखळी, मिळणाऱ्या मालावर जीएसटी आकारणी, ग्रामीण भागात उद्योग सुरू करणयासाठी कागदपत्रांची व्यवस्था(भूमी वापराची परवानगी, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र इ.),बँक हमीसाठी मार्जिन शुल्काची आकारणी नसावी, खर्चाचा आढावा घेण्यासाठी प्रशिक्षण, एमएसएमईमध्ये सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब इ.

गडकरी यांनी सर्व प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे दिली आणि सरकारकडून सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर संबंधित विभागांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. उद्योगांनी सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा आणि कोविड-19 आपत्ती संपुष्टात आल्यावर निर्माण होणाऱ्या संधींचा पुरेपूर वापर करावा यावर गडकरी यांनी भर दिला.

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623428) Visitor Counter : 202