आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 साठी आयुष आधारित आंतरशाखा अभ्यास आणि 'आयुष संजीवनी' ऐपचे डॉ हर्ष वर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
तंत्रज्ञान संबंधितांशी सहकार्यामुळे आयुषचे पारंपरिक ज्ञान जगभरात मोठ्या प्रमाणात पोहोचण्यासाठी मदत होईल
Posted On:
07 MAY 2020 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 मे 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीत ‘आयुष संजीवनी’ या ऐपचे आणि कोविड-19 परिस्थितीशी संबंधित आयुष आधारित दोन अभ्यासांचा प्रारंभ केला. आयुष राज्य मंत्री श्रीपाद नाईक गोव्याहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अधोरेखित करत आज सुरु करण्यात आलेल्या 'आयुष संजीवनी' ऐपमुळे, आयुष उपाययोजना आणि सूचनांचा जनतेने केलेला स्वीकार आणि उपयोग तसेच कोविड-19 ला प्रतिबंध घालण्यासाठी त्याचा प्रभाव याविषयी माहिती उपलब्ध होण्यासाठी मदत होणार आहे असे आरोग्य मंत्र्यांनी सांगितले. आयुष, इलेक्ट्रोनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे ऐप विकसित केले असून 50 लाख लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कोविड-19 व्यवस्थापनामुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आयुष मंत्रालय तसेच सीएसआयआर, आयसीएमआर यासारख्या तंत्रज्ञान संस्था आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांना एकत्र येण्यासाठी प्रबळ मंच पुरवण्याबरोबरच जागतिक समुदायाच्या हितासाठी आयुष ज्ञान पोहोचवण्यासाठी मदतही होत असल्याचे डॉ हर्ष वर्धन म्हणाले. या संस्था एकत्र येऊन आयुर्वेदाच्या प्राचीन औषध विषयक ज्ञानामुळे आरोग्याला होणाऱ्या लाभाचा प्रसार करत आहेत.
डॉ हर्ष वर्धन यांनी दोन अभ्यास सुरु केले. एकात कोविड-19 साठी घ्यायची काळजी आणि रोगप्रतिबंधक औषध यासाठी आयुर्वेदाचे सहाय्य याविषयी संयुक्त वैद्यकीय संशोधन अभ्यास आहे. आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, सीएसआयआर द्वारे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी आयसीएमआरचे तांत्रिक सहकार्यही लाभणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष आणि डॉ भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखालच्या आंतरशाखा आयुष संशोधन आणि विकास कृती दलाने देशातल्या विविध संस्थांच्या तज्ञांशी चर्चा करून आणि आढावा घेऊन अभ्यासक्रमासाठी आराखडा निश्चित केला आहे. अश्वगंधा, यष्टीमधु, गुडूची आणि पिपळी यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. प्रामुख्याने दोन क्षेत्रात हे काम करण्यात येणार आहे-
- कोविड-19 महामारीच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिबंधक म्हणून अश्वगंधा
- कोविड-19 ची सौम्य ते मध्यम लक्षणे असणाऱ्यासाठीच्या उपचाराकरिता प्रमाणित काळजीच्या बरोबरीने आयुर्वेद घटकांचा प्रभाव
दाट लोकवस्तीत कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी आयुष आधारित रोग प्रतिबंधक औषधाचा प्रभाव या लोकसंख्येवर आधारित अभ्यासाचा डॉ हर्ष वर्धन यांनी प्रारंभ केला. कोविड-19 साठी आयुष घटकांचा प्रतिबंधात्मक क्षमतेचे आणि अति धोका असलेल्या भागात जीवनमान सुधारण्यासाठी मुल्यांकन करणे हा याचा मुख्य हेतू आहे. आयुष मंत्रालयाअंतर्गत चार संशोधन परिषदा आणि 25 राज्यातल्या राष्ट्रीय संस्था मार्फत 5 लाख लोकसंख्येचा यासंदर्भात अभ्यास करण्यात येईल. या अभ्यासामुळे कोविड-19 सारख्या महामारीत आयुषची प्रतिबंधात्मक क्षमता शास्त्रीय पुराव्यासह समजून घेण्याच्या दृष्टीने नवा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.
या अभ्यासामुळे सीएसआयआर, आयसीएमआर आणि डीसीजीआय यांच्या मदतीने आयुषचे महत्व पुन्हा प्रस्थापित व्हायला मदत होईल असे हर्ष वर्धन यांनी सांगितले. तंत्रज्ञानविषयक ही युती कोविड-19 नंतरही आपल्याला ज्ञानाधारीत उपाय पुरवण्यासाठी मौल्यवान संधी पुरवत आहे. वैद्यकीय आधुनिक शाखा आणि विज्ञान यांची आयुषशी स्पर्धा नाही तर ते परस्परांना अंगभूत मार्गाने दृढ करतात हे जाणून घेऊया असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, कोविड-19 महामारीच्या काळात रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आयुष सल्ल्याचा जगभरात स्वीकार झाल्याचे त्यांनी सांगितले.
* * *
M.Jaitly/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1621902)
Visitor Counter : 274