इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

जी-20 डिजिटल मंत्र्यांच्या शिखर परिषदेत साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी समन्वित जागतिक डिजिटल प्रतिसादाचे आवाहन


भारताने सर्वसमावेशक आणि शाश्वत अर्थव्यवस्था आणि समाज निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जी-20 देशांच्या जबाबदारीवर जोर दिला

Posted On: 30 APR 2020 10:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020

 

जी-20 डिजिटल अर्थव्यवस्था कृती दल कोविड-19 मंत्रीस्तरीय बैठकीत साथीच्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी, दूरसंचार पायाभूत सुविधा आणि नेटवर्क कनेक्टीव्हिटी मजबूत करण्यासाठी उपाययोजनांची अवलंब, सुरक्षित पद्धतीने नॉन-वैयक्तिक डेटा देवाणघेवाण, आरोग्यसेवेसाठी डिजिटल उपाययोजना, सायबर सुरक्षित जग आणि व्यवसायांची लवचिकता वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी एक समन्वित जागतिक डिजिटल प्रतिसादाचे आवाहन करण्यात आले. कोविड-19 साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या आव्हानांवर चर्चा करण्यासाठी आणि डिजिटल तंत्रज्ञानाला जागतिक स्तरावर एकत्रित प्रतिसाद मिळावा यासाठी जी -20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्र्यांची आभासी बैठक आज आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय कायदा आणि सुव्यवस्था, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. या बैठकीत 19 अन्य जी -20 सदस्य, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे डिजिटल मंत्रीही उपस्थित होते.

या बैठकीत, जी-20 डिजिटल मंत्र्यांनी साथीचा आजर रोखण्यासाठी आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी डिजिटल माध्यमांच्या सर्व संभाव्य शक्यतांचा फायदा घेण्यावर सहमती दर्शवली. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी यावेळी जोर देऊन सांगितले की, आपण या संकटाच्या काळात आणि नंतर जे काही करू ते सध्या सुरु असलेल्या साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी अधिक लवचिक अशी समान,सर्वसमावेशक आणि शाश्वत अर्थव्यवस्था आणि समाज निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित ठेऊन करणे ही जी-20 देशाची जबाबदारी आहे. साथीच्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत सरकारने उचललेल्या उपाययोजना अधोरेखित करताना त्यांनी जगासाठी अनुकरणीय अशी योजना देखील सादर केली. त्याचबरोबरच त्यांनी कोविड-19 विरूद्धचा लढा सुरू ठेवत अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याच्या महत्त्वावर जोर दिला.

ते म्हणाले की डिजिटायझेशनचा पुढील टप्पा म्हणजे अशा अनुप्रयोगांविषयी आहे जे उदरनिर्वाहावर परिणाम करतील, विविध क्षेत्रांना गती देतील, पुरवठा साखळी मजबूत करतील आणि सायबर सुरक्षित जग तयार करतील. जी -20 मंत्र्यांना त्यांनी जोर देऊन सांगितले की सध्याच्या परिस्थितीत शारीरिक अंतर, वितरित कार्यबल आणि जागतिक पुरवठा शृंखलाचे प्रश्न सोडविण्यासाठी भागधारकांमध्ये अधिक सहकार्य आवश्यक आहे. जागतिक साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी ठोस डिजिटल कृती योजना तयार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी जी-20 देशांना केले. जागतिक व्यवसायाचे सातत्य राखण्यासाठी भारतीय आयटी-आयटीएस उद्योगाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर त्यांनी प्रकाश टाकला आणि विस्थापित जागतिक पुरवठा साखळ्यांसाठी भारताला एक महत्वाचे ठिकाण असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. 

 

* * *

M.Jaitly/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1619927) Visitor Counter : 165