Posted On:
26 APR 2020 11:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या( एम्स) जय प्रकाश नारायण ऍपेक्स ट्रॉमा सेंटरला भेट देऊन कोविड-19वर मात करण्यासाठी असलेल्या सज्जतेचा आणि कोविड-19 च्या रुग्णांवर होणारे सुरुवातीचे उपचार आणि त्यांना दिली जात असलेली मदत यांचा या आढावा घेतला. एम्सचे हे ट्रॉमा सेंटर समर्पित कोविड-19 रुग्णालय म्हणून काम करत असून त्यामध्ये 250 खाटांचा अलगीकरण कक्ष असल्याने कोविड-19 ची पुष्टी झालेल्या अलगीकरण केलेल्या आणि जास्त वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची योग्य ती काळजी घेणे शक्य होत आहे, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. तसेच या सेंटरच्या बर्न अँड प्लॅस्टिक सर्जरी ब्लॉकचे रुपांतर कोविड-19च्या रुग्णांची तपासणी आणि उपचार निश्चिती विभागामध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आकस्मिक कक्ष, डम्पिंग एरिया, खाजगी कक्ष, अतिदक्षता विभाग, एचडीयू, सारी आणि आएलआय कक्षाची पाहणी केली. त्यांनी या रुग्णालयातील स्वच्छतागृहात केल्या जाणाऱ्या निर्जंतुकीकरणाची देखील पाहणी केली.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही रुग्णांची देखील फोनवरून व्हिडिओ कॉलिंगच्या मदतीने विचारपूस केली. रुग्णांना यंत्रमानवाद्वारे ही सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी त्यांनी या रुग्णांना मिळणाऱ्या सुविधांबाबत त्यांचे अभिप्राय जाणून घेतले आणि आवश्यक असलेल्या सुधारणांची माहिती घेतली.
विविध कक्ष आणि रुग्णालयातील सुविधांची सखोल पाहणी केल्यानंतर डॉ. हर्षवर्धन यांनी येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. कोविड-19 चे लागण झालेले रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्यावर 24 तास देखरेख करण्यासाठी दक्ष राहात असल्याबद्दल त्यांनी एम्सच्या या ट्रॉमा सेंटरची प्रशंसा केली. कोविड रुग्णांच्या तब्येतीवर 24 तास लक्ष ठेवण्यासाठी एम्सकडून अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याबद्दल आपल्याला आनंद झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसात आपण झाज्जर येथील एम्स रुग्णालय, लोकनायक जय प्रकाश नारायण रुग्णालय, डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, सफदरजंग रुग्णालय, राजीव गांधी सुपर स्पेशालिटी रुग्णालय या रुग्णालयांना भेट देत असून आणि आज एम्स- जेपीएनएटीसी या रुग्णालयाला भेट दिली असे ते म्हणाले.
सध्या भारतातील कोविड रुग्णांचा मृत्यूदर जागतिक 7 टक्के मृत्युदराच्या तुलनेत 3.1 टक्के इतका आहे, असे त्यांनी देशातील कोविड-19 च्या स्थितीबाबत बोलताना सांगितले. आतापर्यंत 5913 रुग्ण बरे झाले आहे. बरे होण्याचा दर 22 टक्के असून हा दर देखील बऱ्याच देशांच्या तुलनेत चांगला असल्याची त्यांनी माहिती दिली. रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या कालावधीत देखील सातत्याने सुधारणा होत आहे आणि गेल्या तीन दिवसांच्या काळात हा दर 10.5 दिवस झाला आहे. त्यापूर्वीच्या सात दिवसात तो 9.3 आणि 14 दिवसात 8.1 होता. देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनसोबत समूह व्यवस्थापन आणि प्रतिबंध विषयक धोरण यांचा हा सकारात्मक प्रभाव म्हणून या निर्देशांकांकडे पाहाता येईल, असे ते म्हणाले.
आतापर्यंत 283 जिल्ह्यांमध्ये एकही कोविड रुग्ण आढळलेला नाही, तर गेल्या 7 दिवसात 64 जिल्ह्यांमध्ये , 14 दिवसात 48 जिल्ह्यात , 21 दिवसात 33 जिल्ह्यांमध्ये आणि 28 दिवसांत 18 जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
राज्यांना आतापर्यंत पुरेशा प्रमाणात पीपीई किट्स उपलब्ध करून दिले असून देशातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या उत्पादनाची क्षमता असलेले 106 उद्योग देशभरात असल्याने संपूर्ण देशभरातील मागणी ते पूर्ण करू शकतील असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय एन-95 मास्कचे उत्पादन करणारे 10 उद्योग आहेत, असे ते म्हणाले.
सरकारचे प्रयत्न आणि आमच्या विविध संशोधन प्रयोगशाळांच्या प्रयत्नांमुळे स्थानिक उत्पादकांकडूनही व्हेंटिलेटर्सचे उत्पादन सुरू झाले असून 9 उत्पादकांकडे सुमारे 59,000 उपकरणांची मागणी नोंदवली असल्याची माहिती त्यांनी व्हेंटिलेटर्सच्या उपलब्धतेबाबत दिली.
व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सप्लायर आणि अतिदक्षता कक्ष यांची केंद्र आणि राज्यांकडे पुरेशी उपलब्धता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या देशभरात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा विचार करता केवळ 2.17 टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात असून, 1.29 टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत असल्याचे आणि केवळ 0.36 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवले असल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.
कोविड-19 च्या विरोधातील या लढाईत आपली विजयाकडे वाटचाल सुरू असून अंतिम विजय आपलाच होईल कारण आपल्याला आपल्या शत्रूची, त्याच्या संख्येची आणि त्याच्या ठिकाणाची अचूक माहिती आहे आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सज्ज आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या अतिशय कठीण प्रसंगामध्ये आपल्या आरोग्य योद्ध्यांचे उच्च मनोधैर्य आणि आंनदी राहण्याची वृत्ती भारावून टाकणारी आहे अशा शब्दात त्यांनी कोरोना योद्ध्यांची प्रशंसा केली. या रुग्णालयांनी या महामारीला प्रभावी पद्धतीने तोंड देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल आपण समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड-19 ला तोंड देताना परिचारिका, डॉक्टर, तंत्रज्ञ आणि इतर आरोग्य कर्मचारी करत असलेले कष्ट, त्यांची समर्पित वृत्ती आणि वचनबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली.
B.Gokhale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com