विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीचे बळकटीकरण, कोविड-19 चा सामना करण्यासाठी भारतीय कार्यक्रमपद्धती


कोविड-19 चा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने  प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व कोविड-19 रुग्णांच्या जलद रोगमुक्तीसाठी प्रतिकारशक्तीत बदल घडवणारे सेप्सिव्हॅक® विकसित करण्याचा CSIR चा निर्णय,

नव्या वैद्यकप्रयोग चाचण्यांना DCGI अर्थात भारतीय औषध महानियंत्रकांची संमती

Posted On: 23 APR 2020 6:35PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 एप्रिल 2020

 

कोविड-19 आणि अन्य रोगांचा  सामना करण्यासाठी शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कोविड -19 आणि अन्य रोग ओळखून त्यांचा नायनाट करण्यासाठी प्रतिकारक्षमतेचा हा जलद आणि पहिला प्रतिसाद होय. आंतरिक प्रतिकारशक्ती पुरेशी असण्यामुळेच, कोविड -19 किंवा इतर विषाणूंच्या संपर्कात आलेल्या बहुसंख्य व्यक्तींना हा आजार एकतर होतच नाही, किंवा मग त्याचा एखादा सौम्य प्रकार होतो. अशा प्रकारचे संरक्षण, मानवी रोगप्रतिकार प्रणालीच्या महाभक्षी कोशिका (Macrophages) तसेच नैसर्गिक मारक पेशी पुरवितात. कोविड-19 च्या मुकाबल्यासाठी जगभर लस आणि विषाणू-विरोधके तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भारतात मात्र, CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने एक संमत असे प्रतिकारशक्तीत सुधारणा करणारे सेप्सिव्हॅक® विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शरीराची आंतरिक प्रतिकारशक्ती वाढविणे, तसेच कोविड -19 रुग्णांना रोगमुक्त करण्याचा वेग वाढविणे असा याचा उद्देश आहे. CSIR च्या ‘नव सहस्रक भारतीय तंत्रज्ञान नेतृत्व कार्यक्रमान्तर्गत (NMITLI)’ हे काम करण्यात येत आहे.

 

सेप्सिव्हॅक® द्वारे पुढील परिणाम अपेक्षित आहेत -

१- कोविड-19 रुग्णांच्या जवळच्या व्यक्ती व आरोग्य कर्मचारी - यांची आंतरिक प्रतिकारशक्ती वाढवून त्यांचे संरक्षण करणे, व या रोगाला बळी पडण्यापासून त्यांना वाचविणे

२- रुग्णालयात दाखल झालेल्या व गंभीर आजारी नसलेल्या कोविड-19 रुग्णांना वेगाने बरे करणे, ICU ची गरज पडण्यापासून म्हणजे बळावत जाण्यापासून या आजाराला रोखणे.

या दोन्ही नवीन वैद्यकप्रयोग चाचण्यांना आता DCGI म्हणजेच भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. त्या यादृच्छिक पद्धतीने केल्या जातील. त्या दुतर्फा अज्ञात पद्धतीने, म्हणजे प्रयोग करणारे व ज्यांच्यावर प्रयोग होत आहे असे, एकमेकांना माहित नसतील अशा पद्धतीने होतील. तसेच त्या दुहेरी व नियंत्रित वातावरणात होतील. कोविड -19 ने अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांची मर्त्यता कमी करण्याकामी सदर औषधाची कार्यक्षमता तपासण्यासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या प्रायोगिक चाचण्यांखेरीज याही  दोन चाचण्या होणार आहेत.

सेप्सिव्हॅक® मध्ये उष्णतेच्या साहाय्याने मारलेले सूक्ष्मजीव 'मायक्रोबॅक्टरीअम-w (Mw)' आहेत. हे रुग्णांसाठी अतिशय सुरक्षित असून, याच्या वापरामुळे शरीरावर कोणतेही अन्य दुष्परिणाम होत नाहीत. सेप्सिव्हॅक® हे औषध CSIR च्या NMITLI कार्यक्रमांतर्गत अहमदाबादमध्ये कॅडीला फार्मास्युटिकल्स कंपनीने तयार केले आहे.

 

G.Chippalkatti/J.Waishampayan/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1617533) Visitor Counter : 288