विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

राष्ट्रीय अवकाश संशोधन प्रयोगशाळेने विकसित केले वैयक्तिक संरक्षण देणारे संसर्गरोधी शरीराच्छादक पेहराव

प्रविष्टि तिथि: 18 APR 2020 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 एप्रिल 2020

सीएसआयआर अर्थात राष्ट्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाची उपसंस्था असलेल्या बेंगळूरू येथील एनएएल अर्थात राष्ट्रीय अवकाश संशोधन प्रयोगशाळेने एम. ए. एफ. क्लोदिंग या खासगी संस्थेच्या मदतीने वैयक्तिक संरक्षण देणारे नवे संसर्गरोधी शरीराच्छादक पेहराव विकसित केले आहेत. पॉलीप्रॉपीलीन द्रव्याचा थर दिलेल्या, अनेक स्तरांच्या, न विणता तयार केलेल्या विशेष प्रकारच्या कापडापासून हे पेहेराव तयार केले आहेत. कोविड-19 विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी चोवीस तास कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी वर्ग आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची वैयक्तिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा विशेष पेहराव वापरता येणार आहे.

सीएसआयआर- एनएएल या संस्थांमधील संशोधक आणि एम.ए.एफ.क्लोदिंग यांच्या कर्मचारीवर्गाने संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या घटक पदार्थांपासून आणि नाविन्यपूर्ण उत्पादन प्रक्रिया वापरून कोविड-19 विषाणू संसर्गाशी प्रखर लढा देणाऱ्या पहिल्या फळीतील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षेच्या समस्येवर अत्यंत कमी कालावधीत उपाय शोधून काढला आहे.

सिट्रा अर्थात दक्षिण भारतीय वस्त्र संशोधन संघटनेच्या कोइम्बतुर येथील प्रयोगशाळेत या नव्या पेहेरावाच्या उपयोगितेसंदर्भात अत्यंत कडक चाचण्या झाल्या असून त्यांतून हा पेहराव कोविड-19 विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी काम करणाऱ्यांना वापरण्यास योग्य ठरला आहे.

अशा शरीराच्छादक पेहेरावांचे उत्पादन येत्या चार आठवड्यांच्या कालावधीत प्रतिदिन 30,000 पेहेरावांपर्यंत वाढवण्याची योजना सीएसआयआर- एनएएल आणि एम.ए.एफ.क्लोदिंग यांनी आखली आहे.

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी तयार केलेला हा पेहेराव इतर उत्पादक कंपन्यांपेक्षा अत्यंत कमी किंमतीत तयार होतो, अशी माहिती सीएसआयआर- एनएएल चे संचालक जितेंद्र जे.जाधव यांनी दिली हे. देशाच्या सुरक्षिततेसाठी चोविस तास अविरत काम करीत या पेहेरावांचे संशोधन, विकास आणि प्रमाणीकरण प्रक्रिया जलदगतीने पूर्ण केल्याबद्दल सीएसआयआर- एनएएल या संस्थांमधील संशोधक आणि एम.ए.एफ.क्लोदिंग यांच्या कर्मचारीवर्गाचे तसेच सिट्रा संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे जाधव यांनी कौतुक केले आहे.

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1615678) आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Gujarati , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Punjabi , Odia , Tamil , Telugu