सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आयातीला पर्याय शोधण्याबरोबरच उद्योग जगताने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या गरजेवर नितीन गडकरी यांनी दिला भर
20 एप्रिलपासून काही भागात लॉकडाउन कमी होत असल्याने आर्थिक जगतातील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी गडकरी यांनी साधला उद्योग संघटनांशी संवाद
Posted On:
17 APR 2020 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020
परदेशातून माल आयात करण्याऐवजी देशांतर्गत उत्पादनांच्या पर्यायावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे उद्योजकांना त्यांनी आवाहन केले आणि संशोधन, नवोन्मेष आणि गुणवत्तेत सुधारणा हे घटक औद्योगिक विकासात मोठी भूमिका बजावू शकतात असेही त्यांनी नमूद केले. ते आज यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन (वायपीओ), इंडिया एसएमई फोरम (आयएसएफ) आणि नागपुरातील विविध क्षेत्रातील उद्योजक प्रतिनिधींच्या बैठकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करीत होते.
लॉकडाउन जसजसा कमी होत जाईल आणि आर्थिक उलाढालींकडे लक्ष दिले जाईल तसतशी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होण्यासाठी आणि शाश्वत आर्थिक वाढीसाठी या क्षेत्राचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे.
एमएसएमई क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाच्या संदर्भात गडकरी म्हणाले की, जागतिक बाजारात स्पर्धात्मक होण्यासाठी उर्जा खर्च, वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उद्योगांनी निर्यात वाढीकडे विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे.
सरकारने काही उद्योग क्षेत्रांना काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत हे उद्योगांनी देखील सुनिश्चित केले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी पीपीई (मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज इ) वापरण्यावर भर दिला आणि कार्यालये / व्यवसाय पुन्हा सुरू करताना सामाजिक अंतराचे नियम पाळण्याचा सल्ला दिला.
जपान सरकारने चीनमधून जपानी गुंतवणूक काढून इतरत्र हलविण्यासाठी त्यांच्या उद्योगधंद्यांना खास पॅकेज दिल्याचेही गडकरी यांनी अधोरेखित केले. भारतासाठी ही संधी असून आपण ती स्वीकारली पाहिजे असंही ते म्हणाले.
दिल्ली - मुंबई एक्स्प्रेस वेचे काम सुरू झाले असून भविष्यात औद्योगिक क्लस्टर, औद्योगिक पार्क, स्मार्ट खेड्यांमध्ये गुंतवणूक करण्याची उद्योगांना संधी आहे; याबाबतचे प्रस्ताव एनएचएआयला (भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) सादर करावेत, असे आवाहन गडकरी यांनी केले.
सूक्ष्म, लघु, माध्यम उद्योग एमएसएमईची देणी त्वरित देण्याचे सर्व प्रयत्न केले पाहिजेत अशी विनंती गडकरी यांनी केली आणि याबाबत सर्व शासकीय विभागांना निर्देश देण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर विजय मिळविण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही त्यांनी दिली.
कोविड -19 महामारीच्या पार्शवभूमीवर एमएसएमई क्षेत्रासमोर असणार्या विविध आव्हानांबद्दल या बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी चिंता व्यक्त केली, सुधारणा सुचविल्या आणि एमएसएमई क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून पाठिंबा मागितला.
किमान सहा महिने मुदतवाढ वाढविणे, एमएसएमईसाठी कार्यशील भांडवली कर्जाची मर्यादा वाढविणे, युटिलिटी बिलावर शुल्क माफी द्यावी, संगणक हार्डवेअर क्षेत्रासह काही वस्तूंचा आवश्यक वस्तूंच्या श्रेणीत समावेश करावा, कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) आणि भविष्य निर्वाह निधीतून लॉकडाऊन दरम्यान कामगारांचा पगार देता यावा, शिक्षण आणि आरोग्य संस्थांवर झालेल्या सर्व खर्चावर शून्य कर आकारावा इत्यादी मुद्दे आणि सूचना या उद्योग प्रतिनिधींनी या बैठकीदरम्यान केल्या.
केंद्रीय मंत्री आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडे उद्योगजगताचे हे मुद्दे मांडु असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.
कोविड -19 चे संकट संपेल तेव्हा उद्योगांनी एकत्र काम केले पाहिजे आणि निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घ्यावा असे गडकरी यांनी म्हटले आहे.
B.Gokhale/V.Joshi/P.Kor
(Release ID: 1615562)
Visitor Counter : 243