आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सरकारने सद्यस्थिती आणि उपाययोजनांचा घेतला आढावा
उपाय वेळेवर उपलब्ध होणे महत्वाचे - मंत्रिगट
डॉ. हर्ष वर्धन यांनी कोविड -19 संदर्भातील आरोग्यविषयक आव्हानांची पूर्तता करण्यासाठी त्वरित उपाय देण्यावर भर दिला; उत्पादनांचा दर्जा आणि गुणवत्ता राखण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे केले आवाहन
Posted On:
17 APR 2020 7:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड-19 वरील मंत्रिगटाची 12 वी बैठक आज निर्माण भवन नवी दिल्ली येथे झाली. नागरी उड्डाण मंत्री हरदीप एस. पुरी, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, नौवहन, रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय, आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांच्यासह डॉ विनोद के. पॉल, सदस्य (आरोग्य),नीती आयोग आणि संरक्षण दलांचे प्रमुख बिपिन रावत उपस्थित होते.
मंत्रिगटाने (जीओएम) कोविड -19 वर नियंत्रण आणि व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा केली. कोविड-19चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आतापर्यंत केलेल्या उपाययोजना , प्रतिबंधात्मक धोरण म्हणून सामाजिक अंतर पाळण्याबाबत उपायांची सद्यस्थिती आणि कठोर कारवाई बाबतही चर्चा केली. कोविड -19 चा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्यांना त्यांची आकस्मिक योजना आखायला आणि ती बळकट करायला सांगण्यात आल्याची माहिती मंत्रिगटाला देण्यात आली. समर्पित कोविड -१९ रुग्णालये निर्माण करण्यासाठी पुरेशा संसाधनांचा वापर, पीपीई, व्हेंटिलेटर आणि इतर आवश्यक उपकरणांसह वैद्यकीय संस्था सुसज्ज करण्याबरोबरच राज्यांची क्षमता बळकट करण्याच्या इतर अनेक उपायांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यांना यापूर्वीच जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड-19 केंद्रे/रुग्णालये निश्चित करायला सांगण्यात आले.
आतापर्यंत मृत्यूचा दर साधारण 3% आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर 12% च्या आसपास आहे आणि तो बहुतांश देशांपेक्षा तुलनेने चांगला आहे आणि समूह व्यवस्थापनासह देशातील लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम म्हणून याकडे पाहिले जावे असे मंत्रिगटाला सांगण्यात आले. मंत्रिगटाने हॉटस्पॉट आणि समूह व्यवस्थापन संबंधी धोरण तसेच देशभरातील चाचणी किट्सच्या उपलब्धतेचा आणि चाचणी संबंधी धोरणाचा आढावा घेतला. 170 जिल्हे रेड झोनमध्ये (हॉटस्पॉट)ठेवण्यात आले असून 123 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आहे तर 47 जिल्हे क्लस्टर्ससह आहेत. क्लस्टरसह 207 नॉन-हॉटस्पॉट जिल्हे आहेत आणि 353 जिल्हे संसर्ग नसल्यामुळे ग्रीन झोनमध्ये आहेत. गेल्या 14 दिवसांत रुग्ण आढळला नाही तर रेड झोन जिल्हा केशरी झोन अंतर्गत ठेवला जाईल आणि पुढील 14 दिवसात पुन्हा एकही रुग्ण आढळला नाही तर तो जिल्हा ग्रीन झोन अंतर्गत येईल,असे धोरण ठरवण्यात आले आहे.
पीपीई, मास्क, व्हेन्टिलेटर, औषधे आणि अन्य आवश्यक उपकरणांच्या पुरेशा उपलब्धतेसंदर्भात मंत्रिगटाला माहिती देण्यात आली. पीपीईच्या निर्मितीसाठी देशांतर्गत उत्पादकांची निवड करण्यात आली असून त्यांना ऑर्डर देण्यात आल्याची माहिती मंत्रिगटाला देण्यात आली. याव्यतिरिक्त, व्हेंटिलेटरसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. सध्या कोविड-19 ची चाचणी घेणार्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांची संख्या तसेच या प्रयोगशाळांच्या माध्यमातून दररोज घेण्यात येणार्या चाचण्यांच्या संख्येबद्दल मंत्रिगटाला अवगत करण्यात आले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी), जैव-तंत्रज्ञान विभाग (डीबीटी) आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ने मंत्रिगटाला कोविड -19 चे निदान, औषधे आणि लस विकसित करण्याबाबत सविस्तर सादरीकरण केले आणि सांगितले की ते आयसीएमआर आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासह कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी उपाय आणि मदत शोधण्यासाठी एकत्र काम करत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अलिकडेच सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर सी. मंडे आणि सीएसआयआर प्रयोगशाळेचे संचालक यांच्याबरोबर सीएसआयआर आणि त्यांच्या 38 प्रयोगशाळांनी कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तांत्रिक उपाययोजना विकसित करण्याच्या दिशेने. केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. वेळेवर उपाय उपलब्ध होणे महत्वाचे असल्याचे मत मंत्रिगटाने व्यक्त केले.
मंत्रिगटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी पीपीई, मास्क, व्हेंटिलेटर आणि इतर उपकरणाच्या उत्पादनात गुणवत्ता आणि मानकांशी कोणतीही तडजोड करू नये असे निर्देश दिले. पीपीई, मास्क आणि व्हेंटिलेटर तयार करताना दर्जेदार मानके/प्रोटोकॉलपासून काही हलगर्जी आढळल्यास उत्पादकांना कठोर शिक्षा व्हावी अशी सूचनाही त्यांनी केली.
कोणी कोणत्या प्रकारचा मास्क वापरायचा आणि कुणी पीपीई वापरावे यासंबंधी सविस्तर सल्ला आणि मार्गदर्शक तत्वे मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आय.ई.सी. अभियानांच्या माध्यमातून या संदर्भात जनजागृतीही केली जात आहे याचा डॉ. हर्षवर्धन यांनी पुनरुच्चार केला. कोविड -19 विरोधात सामाजिक अंतर आणि अलगीकरण या सर्वात प्रभावी सामाजिक लस आहेत आणि लॉकडाऊन कालावधी दरम्यान प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता आणि श्वसन संबंधी प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रीती सुदान, सचिव, (आरोग्य आणि कुटुंब कल्याण), रवी कपूर, सचिव (वस्त्रोद्योग), प्रदीपसिंग खरोला, सचिव (नागरी उड्डाण), पी. डी. वाघेला, सचिव (फार्मास्यूटिकल्स), डॉ. रेणु स्वरूप , सचिव, जैव-तंत्रज्ञान , प्रा. आशुतोष शर्मा, सचिव, विज्ञान आणि तंत्रज्ञान, डॉ. शेखर सी. मंडे, महासंचालक, सीएसआयआर आणि सचिव डीएसआयआर, संजीव कुमार, विशेष सचिव (आरोग्य), अनिल मलिक, अतिरिक्त सचिव (गृह मंत्रालय ), आयटीबीपीचे महासंचालक आनंद स्वरूप, डॉ राजीव गर्ग, डीजीएचएस, डॉ. रमन आर गंगाखेडकर, प्रमुख, एपिडेमिओलॉजी अँड कम्युनिकेशनल डिसीज, आयसीएमआर आणि लव अगरवाल , संयुक्त सचिव (आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय) यांच्यासह लष्कर, आयटीबीपी, फार्मा, डीजीसीए आणि वस्त्रोद्योग विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.
कोविड -19 संबंधी काही प्रश्न असल्यास कृपया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संपर्क साधा. हेल्पलाईन क्र . + 91-11-23978046 किंवा 1075 (टोल फ्री) कोविड -19 संबंधी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाइन क्रमांकाची यादी https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf वर उपलब्ध आहे.
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
(Release ID: 1615458)
Visitor Counter : 266
Read this release in:
English
,
Gujarati
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam