रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
लॉकडाऊन कालावधीत रस्ते वाहतूक क्षेत्राद्वारे सामान्य नागरिकांना मदत
Posted On:
17 APR 2020 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2020
कोविड-19 मुळे पुकारलेल्या देशव्यापी लॉकडाऊन कालावधीत रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने रस्त्यावरील लोकांना मदत करण्याची सामाजिक जबाबदारी स्वीकारली आहे. मागील महिन्यात 24 तारखेला पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर लगेचच मंत्रालयाच्या सर्व प्रदेश एककांना देशभरातील त्यांचे कामगार/मजूर आणि सामान्य नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंत्रालयातील सर्व प्रदेश युनिट आणि कार्यालये तसेच संबंधित संस्था एनएचएआय आणि एनएचआयडीसीएलने लोकांच्या अडचणी दूर करून त्यांची मदत करण्यासाठी पुढे यायला सांगितले आहे. लोकांना कशाप्रकारे उत्तम प्रकारे मदत केली गेली याबद्दल देशाच्या कित्येक भागांतून सातत्याने अहवाल येत आहेत.
महाराष्ट्रात, जेव्हा या आठवड्याच्या शेवटी मोठ्या संख्येने लोक आपल्या मुला बाळांसह आणि घरातील इतर सदस्यांसह उन्हा तान्हातुन राजस्थान, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांत आपापल्या मूळ गावी जायला निघाले होते त्यावेळी त्यांना ठाणे युनिटने अन्न आणि पाणी दिले होते. ‘समता विचार प्रसारक संस्था’ हि स्थानिक स्वयंसेवी संस्था देखील अन्नाची पाकिटे वितरीत करण्यात मदत करत होती.
लॉक-डाऊन सुरू झाल्यापासून महाराष्ट्रातील वर्धा येथील एनएचएआयने सुमारे 50 लोकांना आश्रय दिला आहे. रस्त्याच्या कडेला असलेली उपहारगृह बंद झाल्यामुळे वाहनचालक आणि अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना अन्न आणि पाणी मिळण्यास अडचण येत होती. सामाजिक अंतर आणि स्वच्छतेची काळजी घेत या लोकांना नियमितपणे अन्न, पाणी, हात धुण्यासाठी सुविधा पुरविल्या जात आहेत.
तसेच उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे लॉकडाऊनमुळे अनेक मजूर आणि ट्रकचालक अडकले होते. त्यांना अन्न पाणी देखील मिळत नव्हते. अशा स्थितीत प्रकल्प संचालनालयाने स्वतःहून त्यांना जेवण देण्याची जबाबदारी घेतली. संचालनालयाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही जबाबदारी स्वीकारल्यामुळे हे परोपकारी कार्य सुरू आहे. अशाच काही घटना उत्तरप्रदेश मधील फत्तेपूर येथे देखील घडल्या आहेत तिथे मोठ्या संख्येने लोकं आणि ट्रक चालक अडकले होते आणि सर्व रस्ते बंद केल्यामुळे त्यांना अन्न मिळत नव्हते. स्थानिक क्षेत्रीय कार्यालय पुढे आले आणि त्यांनी लोकांच्या अन्न-पाण्याची सोय केली.
तामिळनाडूच्या त्रिची जिल्ह्यात एनएचएआयच्या गस्त पथकाला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 45 वर पलूर येथे पाच लोक आढळले. त्यांना तत्काळ अन्न आणि पाणी देण्यात आले तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना मास्क देखील देण्यात आले. त्यानंतर त्यांना नजीकच्या आश्रयस्थानी नेण्यात आले जिथे त्यांची आजपर्यंत चांगली देखभाल केली जात आहे.
B.Gokhale/S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1615434)
Visitor Counter : 180