आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 संदर्भात ताजी स्थिती

Posted On: 15 APR 2020 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संदेशात ज्या सूचना केल्या, त्या अनुषंगाने आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सविस्तर मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत.

कोविड19 च्या व्यवस्थापनासाठी देशातील सर्व जिल्हे तीन प्रकारात विभाजित करण्यात आले आहेत :

  • हॉट स्पॉट जिल्हे
  • रुग्ण असलेले मात्र हॉट स्पॉट न ठरलेले जिल्हे
  • हरित क्षेत्र जिल्हे

हॉट स्पॉट जिल्हे म्हणजे असे जिल्हे जिथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या सध्या अधिक आहे किंवा जिथे कोरोनाचा प्रसार होण्याचे प्रमाण अधिक आहे किंवा इतर शब्दात सांगायचे झाल्यास, जिथे रुग्णसंख्या दुप्पट होण्याचे प्रमाण  आहे.

कॅबिनेट सचिवांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून सर्व राज्यांचे सचिव, आरोग्य सचिव, पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी. महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, मुख्य आरोग्य अधिकारी आणि राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट म्हणजे परीबंधित क्षेत्रांविषयीच्या धोरणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याशिवाय. ज्या ठिकाणी विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे, अशा आणि समूह कन्टेनमेंट धोरणांविषयी अधिक सविस्तर चर्चा झाली. विषाणूचा संसर्ग जास्त असलेले क्षेत्र तसेच बफर झोन कसे हाताळायचे यावर धोरण ठरवण्यात आले. या परीबंधित क्षेत्रात, जीवनावश्यक वस्तू वगळता, इतर सर्व वाहतूक आणि कामे बंद केली जातील. रुग्णांवर सक्रीयतेने देखरेख ठेवली जाईल आणि नमून्यांच्या निकषांच्या आधारावर, विशेष पथके नेमून त्यांच्यामार्फत सर्वेक्षण केले जाईल. नमूने संकलित केले जातीलआणि तपासले जातील.  त्याशिवाय, फ्लू सदृश आजार किंवा सारी SARI (Severe Acute Respiratory Illness) च्या आजाराचे रुग्ण आढळले तर त्यांची तपासणी केली जाईल. या संदर्भात, बफर झोनमध्ये सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याबद्दल नीट माहिती दिली जाईल.

सर्व संशयित रुग्ण शोधण्यासाठी तसेच घरोघरी सर्वेक्षणासाठी विशेष पथके नेमली जातील. या पथकांमध्ये आरोग्य कर्मचारी, महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी, महापालिका कर्मचारी, रेड क्रॉस, एनएसएस, एनवायके आणि इतर स्वयंसेवकांचा समावेश असेल.  

सर्व जिल्ह्यांना रुग्णालयांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत:

  • सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड केअर सेन्टर्स
  • मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन सुविधा असलेली कोविड हेल्थ सेन्टर्स
  • गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी व्हेंटीलेटर्स ची सुविधा असलेली कोविड समर्पित रुग्णालये

कोविड19 च्या पॉझिटिव्ह रूग्णांच्या वैद्यकीय व्यवस्थापनावर भर देण्याचे स्पष्ट आदेश, सर्व राज्ये आणि जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. एम्स च्या कॉल सेंटरचा वापर करुन रुग्णांचे वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉल नुसार होईल, याकडे लक्ष द्यावे आणि कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, यावर भर देण्यास सर्व जिल्ह्यांना सांगितले आहे. वैद्यकीय उपचारांसोबतच, जिल्हा प्रशासनाला सामाजिक अंतर, स्वच्छता, हात धुण्याची पध्दत  याविषयी देखील जनजागृती करण्यास सांगितले आहे.

ज्या जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही, त्यानांही समूह कंटेनमेंट योजनेनुसार काम करण्यास सांगितले आहे. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी, संपर्कशोध, देखरेख आणि वैद्यकीय व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. देशातील सर्व जिल्ह्यात एकसमान कंटेनमेंट योजना राबवण्याची सूचना सर्व जिल्ह्यांना देण्यात आली आहे.

आयगॉट प्लेटफॉर्मवर सर्व ऑनलाईन प्रशिक्षण माहिती आणि साधने उपलब्ध आहेत, त्यांच्या मदतीने कोविडविरोधात लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवली जाऊ शकेल.

गेल्या 24 तासातील कोविडचे 1076 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून  आतापर्यंत कोविड19 च्या रुग्णांची एकूण संख्या 11,439 झाली आहे. तर, आतापर्यंत देशात एकूण 377  जणांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेले एकूण रुग्ण  1306 इतके आहेत.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19[at]gov[dot]in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019[at]gov[dot]in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. 

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1614840) Visitor Counter : 208