रेल्वे मंत्रालय

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आरोग्य सेवेतील व्यावसायिकांना संरक्षण देण्यासाठी एप्रिल 2020 मध्ये 30,000 कव्हरऑल्सची (पीपीई) निर्मिती करण्याची भारतीय रेल्वेची योजना


मे 2020 मध्ये मिशन मोडवर 1,00,000 कव्हरऑल्सची निर्मिती करण्याची भारतीय रेल्वेची योजना

Posted On: 15 APR 2020 2:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2020

 

कोविड-19 रुग्णावर उपचार करताना संक्रमणाचा धोका असलेल्या वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेच्या उत्पादन केंद्र, विभागीय कार्यशाळा आणि फील्ड युनिट्सने वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) कव्हरऑल्स तयार करण्यास सुरवात केली आहे.

एप्रिल 2020 मध्ये भारतीय रेल्वे अशा 30,000 हून अधिक कव्हरऑल्सचे उत्पादन करेल आणि मे 2020 मध्ये 1,00,000 कव्हरऑल्सची निर्मिती करण्याची रेल्वेची योजना आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या ग्वाल्हेर येथील अधिकृत प्रयोगशाळेत प्रायोगिक तत्त्वावरील कव्हरऑल्सच्या निर्धारित चाचण्या उच्च श्रेयांक मिळवून मंजूर झाल्या आहेत.

भारतीय रेल्वेचे डॉक्टर, वैद्यकीय व्यावसायिक, इतर आरोग्य कर्मचारी आणि काळजी घेणारे लोक कोविड -19 आजाराचा मुकाबला करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. संक्रमित रूग्णांमध्ये काम करताना या सर्व कर्मचाऱ्यांना थेट कोविड -19 या आजाराचा धोका आहे. नवीन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या आरोग्य कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची पहिली पायरी म्हणजे त्यांना विशिष्ट प्रकारचे संरक्षक कवच प्रदान करणे जे विषाणूला आणि हा आजार संक्रमित करणाऱ्या द्रवबिंदुना  अटकाव करेल. अशा प्रकारचे कव्हरऑल्स एकदाच वापरले जाऊ शकतात म्हणून मोठ्या प्रमाणात त्याची निर्मिती करणे आवश्यक आहे. कोविड-19 च्या संक्रमणाचे प्रमाण तुलनेने नियंत्रित असले तरी  पीपीई कव्हरऑल्सची आवश्यकताही वाढत चालली आहे.

पीपीईची उपलब्धता व आवश्‍यकतेमधील अंतर भरुन काढण्यासाठी उत्तर रेल्वेच्या जगधारी कार्यशाळेने पीपीईची प्रायोगिक तत्वावर रचना आणि निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या ग्वाल्हेर येथील अधिकृत प्रयोगशाळेत प्रायोगिक तत्त्वावरील कव्हरऑल्सच्या निर्धारित चाचण्या उच्च श्रेयांक मिळवून मंजूर झाल्या आहेत.

हा पुढाकार घेऊन भारतीय रेल्वे चालू महिन्यात (एप्रिल 2020मध्ये ) 30,000हून अधिक पीपीई कव्हरऑल्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करून तो आपल्या कार्यशाळांमध्ये आणि अन्य युनिटमध्ये वितरित करण्यास सक्षम झाली आहे.

उत्पादन सुरू झाले असून मोठ्या प्रमाणावर या कव्हरऑल्सची निर्मिती होत असल्यामुळे भारतीय रेल्वेचे स्वत: चे डॉक्टर, आणि इतर आरोग्य सेवेतील कर्मचारी त्याचा वापर करून बघत आहेत. वाढती गरज भागविण्यासाठी, भारतीय रेल्वेने मे, २०२० मध्ये आणखी 1,00,000 पीपीई तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि योग्य कच्चा माल त्यासाठी मिळविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पीपीई कव्हरऑल्स तयार करण्यासाठी लागणाऱ्या योग्य त्या कच्च्या मालाचा आणि यंत्रसामुग्रीचा जागतिक स्तरावर तुटवडा असतानासुद्धा रेल्वेने हे उद्दिष्ट साकार केले आहे. या प्रयत्नांच्या मागे जगातील सर्वोत्तम अशा भारतीय रेल्वेच्या कार्यशाळा आणि उत्पादन केंद्रांची वेळेवर परीक्षण करण्याची क्षमता कारणीभूत आहे. फील्ड युनिट्स आणि कार्यशाळेत उच्च दर्जाच्या पीपीई कव्हरऑल्सचे उत्पादन इतक्या वेगाने सुरू करण्यासाठी या क्षमता, कौशल्याचा उपयोग केला आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की याच समर्पण भावनेने भारतीय रेल्वेने अगदी कमी कालावधीत आपल्या 5000 पेक्षा जास्त प्रवासी डब्यांना विलगीकरण/अलगीकरण कक्षात रूपांतरित केले आहे.

B.Gokhale/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 (Release ID: 1614735) Visitor Counter : 197