रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय औषधनिर्मिती सचिवांनी औषध आणि औषधनिर्मिती उद्योग आणि त्यांच्या मंडळांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला


औषधे आणि उपकरणांचे पुरेसे उत्पादन आणि उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली

Posted On: 13 APR 2020 9:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2020


भारतीय औषधनिर्मिती उद्योग देशांतर्गत मागणी आणि निर्यातीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक औषधांचा विशेषतः हार्डड्राक्सीक्लोरोक्वीनचे (एचसीक्यू)  पुरेसे उत्पादन करत आहे. राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या सहाय्याने विभाग संपूर्ण देशभरात उत्पादन आणि वाहतूक सुनिश्चित करत आहे. औषधनिर्मिती आणि वैद्यकीय उपकरण उद्योगाच्या कार्यांचा आणि समस्यांचा आढावा घेण्यासाठी आज औषधनिर्मिती विभागाचे सचिव डॉ, पी डी वाघेला यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स (व्ही सी)  नंतर या बाबी समोर आल्या. संयुक्त सचिव (धोरण) नवदीप रिणवा आणि आयपीए, आयडीएमए, ओपीपीआय, बीडीएमए, एआयएमईडी, एमटीएआय, फर्मेक्सिल, सीआयआय, फिक्की आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ केमिस्ट एंड ड्रगिस्ट यांच्यासह औषध आणि वैद्यकीय उपकरण निर्मात्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी या व्हिडीओ कॉन्फरन्सला उपस्थितीत होते. 
बद्दी (हिमाचल प्रदेश), झिरकपूर (पंजाब), दमण आणि सिल्वासा येथील आणि ईशान्येकडील उद्योगांना भेडसावणाऱ्या काही ठराविक बाबींवर उद्योगांनी आपला अभिप्राय दिला. झिरकपूर हे मुख्य वितरण केंद्र आहे जिथून संपूर्ण पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये औषधे पुरविली जातात. त्याचप्रमाणे बद्दी, दमण आणि सिल्वासा ही औषधनिर्मिती उत्पादनाची महत्त्वपूर्ण केंद्रे आहेत. ईशान्येकडील राज्यांमध्ये औषधांचा पुरवठा करताना समोर येणाऱ्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सचिवांनी उद्योग प्रतिनिधींना सांगितले की औषधनिर्मिती विभाग त्यांचे प्रश्न समजून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्याचे त्वरित निराकरण करण्यासाठी उद्योग, राज्ये आणि अन्य विभागांशी ईमेल, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्स, डीओपी तसेच एनपीपीए मधील नियंत्रण कक्ष आणि व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सतत संपर्कात आहे.
या कठीण काळात औषधनिर्मिती क्षेत्राच्या सुविधेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने 12 एप्रिल 2020 रोजी जारी केलेल्या सल्ल्याबद्दल उद्योग प्रतिनिधींनी आनंद व्यक्त केला. तथापि, त्यांनी मधुमेह, कर्करोग प्रतिबंधक आणि इतर उच्च मूल्याच्या औषधांसह इतर औषधांच्या वितरणात  महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कुरिअर सेवेला आवश्यक सेवा म्हणून घोषित करण्याची आवश्यकता आहे अशा काही सूचना देखील केल्या. औषधनिर्मिती उद्योग सुरळीत चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सहाय्यक सेवा आणि उत्पादनांना देखील परवानगी देण्याची गरज असण्यावर जोर देण्यात आला. जेएनपीटी बंदर आणि मुंबई विमानतळ वाहतुकीच्या समस्येचा देखील विशेष उल्लेख करण्यात आला. डॉ. वाघेला यांनी देशातील सर्व भागात औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा अखंड पुरवठा व्हावा यासाठी सर्वांनी त्यांचे प्रयत्न करत रहावे असे आवाहन केले. एआयओसीडीने देशातील सर्व वितरक आणि रसायनशास्त्रज्ञांना  सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. लॉकडाऊन दरम्यान औषधांचा पुरवठा कायम ठेवण्याच्या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी सचिवांनी सर्व संघटनांचे आभार मानले आणि त्यांच्या खऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

 

G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1614137) Visitor Counter : 158