गृह मंत्रालय

जीवनावश्यक वस्तू आणि कामगारांच्या सुरळीत वाहतुकीसाठीच्या मार्गदर्शक सूचनांची सुज्ञपणे अमलबजावणी करा-गृहमंत्रालयाने निर्देश

Posted On: 12 APR 2020 11:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल, 2020

 

देशात कोवीड–19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने भारत सरकारची सर्व मंत्रालये/विभाग, सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील सरकारे आणि राज्ये /केंद्रशासित प्रदेशांतील प्राधिकरणांसाठी समग्र मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

https://mha.gov.in/sites/default/files/PRConsolidated%20Guideline%20of%20MHA28032020%20%281%290.PDF

या मार्गदर्शक सूचना जारी केल्यानंतर, देशभरात जीवनावश्यक वस्तू आणि सेवांच्या उपलब्धतेची खातरजमा करण्यासाठी आणि लोकांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी या मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील स्पष्टीकरण सुद्धा जारी करण्यात आले आहे.

माल, ट्रक आणि कामगारांची अंतर्गत तसेच आंतरराज्यीय वाहतूक तसेच गोदामे आणि शीतगृहांचे परिचालन सुविहितपणे होईल, याची खातरजमा करण्यासाठी, जारी करण्यात आलेल्या या लॉकडाऊन मार्गर्शक सूचनांची सुज्ञपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. मात्र, यापूर्वी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना आणि स्पष्टीकरण यावर देशाच्या काही भागांमध्ये योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जात नसल्याचे, मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे. विशेषतः,अत्यावश्यक असलेल्या आणि नसलेल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक ताब्यात घेतले जात आहेत; अत्यावश्यक बाबींच्या आणि इतर सवलत प्राप्त गटातील उत्पादन एककांच्या परिचालनासाठी आवश्यक कामगारांना ये-जा करण्याची परवानगी/पास प्राप्त होत नाहीत;

वरील दोन गटातील वस्तू आणि लोकांच्या राज्यांतर्गत येण्या-जाण्यावर निर्बंध घातले जात आहेत, कारण एका राज्य/केंद्रशासित प्रदेशातील अधिकाऱ्यांनी जारी केलेले पास/परवानगी दुसऱ्या राज्य/ केंद्रशासित प्रदेशातील अधिकारी मान्य करत नाहीत ; आणि शीतगृहे आणि गोदामांच्या परीचालनाला परवानगी दिली जात नाही.

गृहमंत्रालयातर्फे विशेषत्वाने मंजूर करण्यात आलेल्या बाबींना अशाप्रकारे प्रतिबंधित केल्यामुळे जीवनावश्यक बाबींची कमतरता भासण्याची शक्यता निर्माण होते. अंमलबजावणीच्या बाबतीत अधिक सुस्पष्टता असण्याची आवश्यकता लक्षात घेत, खालील मार्गदर्शक सूचनांचे विविध स्तरावरील अधिकाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, याचा पुनरुच्चार गृह मंत्रालयाने केला आहे.

वैध परवाना असल्यास एक वाहन चालक आणि एका अतिरिक्त व्यक्तीसह सर्व ट्रक आणि इतर मालवाहू वाहनांना राज्याच्या आत आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ये-जा करण्याची परवानगी आहे. वाहनातील माल अत्यावश्यक असला अथवा नसला तरी त्याला ही परवानगी लागू राहील. त्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही परवान्याची अथवा अनुमोदनाची आवश्यकता असणार नाही.

रिकामे ट्रक/मालवाहू वाहनांना सामान आणण्यासाठी अथवा सामान पोहोचते केल्यानंतर परतण्याची परवानगी दिली गेली पाहिजे. त्यामुळे रिकामी असलेले ट्रक रोखण्याचे कारण नाही, मात्र त्यांच्याकडे वाहन चालक परवाना/रस्ता परवाना इ. वैध कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांनी ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर यांना त्यांच्या घरापासून ट्रकच्या स्थानापर्यंत ये-जा करण्याची सुविधा तत्परतेने प्रदान करावी

स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्व परवानाप्राप्त औद्योगिक आणि वाणिज्य कामांशी संबंधित कामगारांना त्यांच्या कामाच्या जागी ये-जा करण्यासाठी सुलभ आणि जलद सुविधा प्रदान केल्या पाहिजे.

रेल्वे, विमानतळ, बंदरे आणि जकात अधिकाऱ्यांना त्यांचे कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना पासेस जारी करण्यासाठी यापूर्वीच प्राधिकृत करण्यात आले आहे. याचीही खातरजमा केली जावी.

कंपन्या आणि संस्थांतर्फे जारी करण्यात आलेल्या प्राधिकारांच्या आधारे परवानाप्राप्त श्रेणीतील उत्पादनात सहभागी कामगारांना पासेस जारी करण्याचा सल्ला, राज्ये/  केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला देण्यात आला आहे.  आपल्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशाच्या क्षेत्रात तसेच इतर राज्यात/केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा क्षेत्रात ये-जा करण्यासाठी हा पास मान्य असेल, याची खबरदारी राज्ये/ केंद्रशासित राज्यांच्या सरकारांनी घ्यावी.

गव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्यतेलासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या उत्पादनात कार्यरत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना कोणत्याही अडथळ्यांशिवाय स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे.

कोणत्याही प्रकारचा माल असो, अत्यावश्यक असो वा नसो, तो वाहून नेणाऱ्या ट्रकना सुविहितपणे ये-जा करता यावी, यासाठी गोदामे आणि शीतगृहांना अनुमती दिली जावी. कंपन्यांच्या गोदामांनाही परिचालनाची परवानगी दिली जावी.

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, राज्य सरकारे/स्थानिक अधिकाऱ्यांनी कोविड-19 च्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ज्या भागात निर्बंध लागू केले आहेत, असे सर्व भाग वगळता, इतर सर्व क्षेत्रांसाठी या अटी लागू असतील, असे निर्देश दिले जात आहेत. 

कोवीड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यक्ती किंवा वाहनांच्या वाहतुकीदरम्यान स्वच्छता आणि सामाजिक अंतर राखण्याच्या सर्व अटींचे काटेकोरपणे पालन केले जावे, याचा पुनरूच्चारही करण्यात आला आहे. या सूचनांचे पालन करण्याबाबत तसेच गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या सर्व कामांच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची संदिग्धता राहू नये, यासाठी सर्व राज्यांनी आपापल्या अधिकार क्षेत्रातील सर्व जिल्हा स्तरावरील सर्व अधिकारी आणि क्षेत्रीय संस्थांना योग्य प्रकारे माहिती द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. 

 

 

U.Ujgare/M.Pange/D.Rane



(Release ID: 1613873) Visitor Counter : 154