संरक्षण मंत्रालय

आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 रुग्णांसाठी दोन खाटांच्या तंबुंचा पुरवठा

Posted On: 11 APR 2020 12:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2020

 

ओएफबी अर्थात आयुध निर्माण मंडळाच्या वतीने कोविड-19 महामारीच्या विरोधात लढा देण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावण्यात येत आहे. या आठवड्यात आयुध निर्माण मंडळाने कोरोनाशी लढा देण्यासाठी केलेल्या मदतीची माहिती पुढील प्रमाणे आहे.

 

दोन खाटांचे तंबू

कोरोनाग्रस्ताला सर्वांपासून वेगळे ठेवण्यासाठी वैद्यकीय उपकरणांनी सज्ज अशा दोन खाटांच्या तंबूंचा पुरवठा ओएफबीच्या वतीने करण्यात आला आहे. या वैद्यकीय तंबूंमध्ये वैद्यकीय आणीबाणी परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णाची तपासणी, इतर आवश्यक असणारे उपचार करणे, त्यासाठी वैद्यकीय उपकरणे जोडणे यांची सुविधा आहे. हे तंबू 9.55 चैरस मीटरचे असून वॉटरफ्रूफ कापडापासून बनवले आहेत. त्यासाठी कमी वजनाचे परंतु मजबूत लोखंड आणि अॅल्यूमिनियम सळया वापरल्या आहेत.

या तंबूंची उभारणी देशात कोणत्याही भू-प्रदेशात करता येवू शकते. ज्याठिकाणी पारंपरिक रुग्णालयांची सुविधा अपुरी पडत असेल त्याठिकाणी अगदी कमी अवधीमध्ये हे तंबू उभारून रुग्णांवर उपचार सुरू करता येतात. कानपूरच्या आयुध उपकरणे निर्माण संस्थेने हे तंबू तयार केले आहेत. असे पन्नास तंबू अरुणाचल प्रदेश सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.

 

हात निर्जंतूक करण्यासाठी रसायने आणि चेह-यावर बांधण्यासाठी मास्क

आयुध निर्माण मंडळाच्या देहराडून इथल्या ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स फॅक्टरीच्या वतीने उत्तराखंडच्या राज्यपालांकडे दि. 6 एप्रिल, 2020 रोजी हात  निर्जंतूक करण्यासाठी असलेल्या प्रत्येकी 100 मि.ली.च्या 2,500 बाटल्या दिल्या आहेत. तर चेह-यावर बांधण्यासाठी  1,000 मास्क दिले आहेत.

तामिळनाडूतल्या अरूवनकडू इथल्या कोर्डाईट फॅक्टरीच्या वतीने 10 एप्रिल रोजी नीलगिरी जिल्हा पोलिस अधिका-यांना 100 लीटर्स सॅनिटायझर्स दिले आहे.

पुण्यातील एचईएफ म्हणजेच हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीच्या वतीने 9 एप्रिल 2020 रोजी एचएलएल बेळगावी यांना पहिल्या टप्प्यात 2,500 लीटर सॅनिटायझर्स पाठवण्यात आले.

 

रासायनिक द्रव्यांचा धूर कक्ष

नागपूरच्या अंबाझरी इथल्या आयुध कारखान्याच्यावतीने स्वच्छता करण्यासाठी रासायनिक द्रव्यांचा धूर करण्याचे कक्ष विकसित केले आहेत. हे कक्ष एका स्थानावरून दुसरीकडे अगदी सहजपणे नेता येवू शकतात. असा कक्ष अंबाझरी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशव्दारावर उभारण्यात आला आहे.

 

हात धुण्यासाठी यंत्रणा

देहराडूनच्या आयुध निर्माण कारखान्याने दि. 7 एप्रिल,2020रोजी स्वेदशी बनावटीचे पायाने चालवता येणारी हात धुण्यासाठी यंत्रणा पोलिसांना दिली. या यंत्रणेमध्ये साबणही ठेवण्यात आले आहे.

पुण्याच्या देहूरोड इथल्या आयुध निर्माण कारखान्याने देहूगावातल्या कामगारांना दि. 6 एप्रिल, 2020 रोजी अन्नाच्या पाकिटांचे वितरण केले.

 

 

U.Ujgare/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1613214) Visitor Counter : 266