वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची उद्योग आणि व्यापारी संघटनांशी चर्चा; त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालय प्रयत्नशील असल्याची दिली ग्वाही
Posted On:
09 APR 2020 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020
कोविड -19 प्रादुर्भाव आणि त्यानंतरच्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर व्यापारी आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांची वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील विविध उद्योग व व्यापार संघटनांशी संवाद साधला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री सोमप्रकाश तसेच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
लॉकडाउनच्या घोषणेनंतर झालेल्या अशा प्रकारच्या बैठकांनंतर उद्योग संघटनांची गेल्या काही दिवसातील परिस्थिती आणि प्रगतीचे मूल्यांकन यावेळी करण्यात आले. तरलतेचे संकट, ऑर्डर रद्द होणे, कामगार टंचाई, राज्य आणि जिल्हा प्राधिकरणांनी केंद्र सरकारच्या आदेशांचे काढलेले विविध अन्वयार्थ, ट्रक अडकून पडणे, सुटे भाग मिळविण्यात येणाऱ्या अडचणी इत्यादी मुद्दे उद्योग संघटनांनी उपस्थित केले. त्याच वेळी त्यांनी माहिती दिली की मागील पंधरवड्यात परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे, त्यामुळे माहिती-तंत्रज्ञान उद्योग 95 टक्के क्षेत्र व्यापू शकला आहे. उद्योग आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक उत्तरदायित्वाविषयी, चांगल्या उपक्रमांविषयी आणि सामुदायिक स्वयंपाकघराविषयी माहिती दिली.
अर्थव्यवस्था आणि रोजीरोटीवर पडला जाणारा ताण दूर करणे गरजेचे आहे.परंतु देशातील जनतेचे प्राण वाचवायला प्राधान्य दिले गेले पाहिजे. योग्य मूल्यांकन करून लॉकडाउनवर उचित वेळी निर्णय घेतला जाईल मात्र या काळात जे काही कमावले आहे ते घाईघाईत निर्णय घेऊन गमावू शकत नाही, असे गोयल यांनी सांगितले. काही राज्ये त्यांचा लॉकडाउनचा कार्यकाळ वाढविण्याचे नियोजन करीत आहेत याकडे त्यांनी उद्योग आणि व्यापार जगताचे लक्ष वेधले. उद्योजकांनी तर्कसंगत दृष्टीकोन ठेवून त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी जेणेकरून कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेशी तडजोड न करता त्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल असे गोयल यांनी सांगितले. ते म्हणाले, “मला वाटतं आपण मागण्यांची यादी बनवण्याऐवजी अधिक व्यावहारिक बोलणे सुरू करायला हवे.”
मंत्रालय आधीच वाहतूक आणि निर्यात-आयात संबंधित समस्यांचे निराकरण करण्याचे काम करीत आहे, तसेच विविध मंत्रालयांसोबत उद्योग व व्यापाऱ्यांच्या इतर समस्यांबाबतही विचार करीत आहे. कोविडची प्रकरणे घटू लागल्यानंतर नुकतेच स्थलांतरीत झालेले कामगार परत येतील, असे गोयल यांनी सांगितले. उद्योगांसाठी मदत पॅकेजची लवकरच घोषणा करावी या काही बैठकीतील सहभागींच्या मागणीवर ते म्हणाले की, प्राप्त झालेला अभिप्राय वित्त मंत्रालयाकडे विचारार्थ पाठविला जात असून त्यावर संतुलित, संवेदनशील निर्णय होण्याची शक्यता आहे. संघटनेच्या सदस्यांनी केलेल्या मानवतावादी उपक्रमांचे कौतुक गोयल यांनी केले. कोविड-19 चा प्रभावी मुकाबला करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून संघटनांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करण्याकरिता त्यांच्या सदस्यांना आणि इतरांना प्रवृत्त करण्याचे आवाहन गोयल यांनी केले.
या बैठकीस सीआयआय, फिक्की, असोचॅम, आयसीसी, लघु उद्योग भारती, फिस्मी, नॅसकॉम, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, सियाम, एसीएमए, आयएमटीएमए, आयईएमए, सीएआयटी आणि फेम चे प्रतिनिधी उपस्थित होते.
G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar
(Release ID: 1612730)
Visitor Counter : 255