आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

मंत्रिगटाकडून कोविड-19 ची सद्यस्थिती आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी केलेल्या कामांचा आढावा


कोविड-19 संदर्भातल्या चुकीच्या बातम्या आणि अफवा टाळण्यासाठी केवळ आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती देण्याचे डॉ हर्षवर्धन यांचे आवाहन

Posted On: 09 APR 2020 5:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2020

 

कोविड-19 चा सामना करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या उच्चस्तरीय मंत्रिगटाची आज नवी दिल्लीत बैठक झाली. डॉ हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध विभांगांचे मंत्री, राज्यमंत्री यांच्यासह, नीती आयोगाचे आरोग्य विभाग सदस्य विनोद पॉल आणि संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत हे ही उपस्थित होते.

यावेळी देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि व्यवस्थापन याविषयी सविस्तर चर्चा झाली. त्याशिवाय, आतापर्यंत यासंदर्भात करण्यात आलेली कामे, सामाजिक अंतर राखण्यासाठीची सध्याची आव्हाने आणि कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या कठोर उपाययोजना यावर चर्चा झाली.

कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी आकस्मिकता योजना तयार करावी असे निर्देश जिल्हाप्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याशिवाय, कोविडसाठी समर्पित रुग्णालये, PPE सह सर्व सुविधायुक्त वैद्यकीय संस्था, व्हेंटीलेटर्स आणि उपकरणे अशी सर्व सज्जता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, कोविड उपचार केंद्र आणि रुग्णालये तयार ठेवावी, से निर्देशही सर्व राज्यांना देण्यात आले आहेत.

देशभरात कोविड चाचण्या कीट्स उपलब्ध करुन देण्यासाठीचे धोरण देखील या बैठकीत निश्चित करण्यात आले. देशभरात, PPE ची उपलब्धता, मास्क, व्हेंटीलेटर्स, औषधे आणि इतर आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत मंत्रिगटाला माहिती देण्यात आली. PPE आणि इतर वस्तूंचे देशांतर्गत उत्पादन जलद गतीने सुरु असून गरजेनुसार त्याची ऑर्डर देखील देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. सध्या किती सरकारी आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये कोरोनाची चाचणी सुरु आहे, याबद्दलही यावेळी चर्चा झाली.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती सर्व मंत्र्यांनी जाणून घेतली.

देशाच्या या वैद्यकीय आणीबाणीत आपले प्राण पणाला लावून पहिल्या फळीत काम करणारे डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्रास देणे, बहिष्कृत करणे असे प्रकार अत्यंत निंदनीय असून, असे कोणीही करु नये, असे आवाहन डॉ हर्षवर्धन यांनी आज पुन्हा केले. तसेच कोविड संदर्भात, कोणतीही चुकीची माहिती, अफवा पसरवू नये, असेही त्यांनी सांगितले. खऱ्या आणि योग्य बातम्या तसेच माहितीसाठी केवळ आरोग्य मंत्रालय (www.mohfw.gov.in) आयसीएमआर (www.icmr.nic.in), किंवा पत्रसूचना कार्यालय (www.pib.gov.in) च्या अधिकृत संकेतस्थळावरचा अवलंबून राहावं, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

कोणत्या स्वरूपाचे मास्क किंवा PPE किट्स कोणी वापरावेत याचीही स्पष्ट माहिती आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यानुसारच या सर्व गोष्टींचा वापर केला जावा, असे त्यांनी सांगितले. सामाजिक अंतर आणि अलगीकरण हीच या आजारावरची लस आहे, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. सर्वांनी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला, सर्व विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

 

 

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1612711) Visitor Counter : 200