गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

कोविड-19: स्मार्ट शहरातील वैद्यकीय व्यवसायिकांचा स्थानिक स्वराज्य यंत्रणानां सहयोग

Posted On: 07 APR 2020 1:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020

 

देशभरामध्ये कोविड-19 च्या विषाणूंचा प्रसार वाढल्यामुळे संशयास्पद घटना तसेच वाढते संशयित रूग्ण यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलिस आणि स्थानिक प्रशासन असे सर्वजण संयुक्तपणे प्रयत्न करीत आहेत. यासाठी  स्मार्ट शहर निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या पायाभूत सुविधांचा लाभ घेतला जात आहे. स्मार्ट शहर प्रकल्पांनुसार अनेक शहरांमध्ये ‘जिओ फेन्सिंग’ म्हणजेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून ‘भू-कुंपण’ तयार करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोनाचा कोणत्या भागात जास्त प्रसार होवू शकतो, याचे आडाखे बांधून आधीच खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. तसेच अनेक भागात आढळलेल्या संशयास्पद रुग्णांच्या आरोग्याची ठराविक कालवधीनंतर नेमकी स्थिती काय आहे, हे जाणून घेतले जात आहे. 

कोविड-19च्या विरोधात लढा देण्यासाठी सर्वात प्रभावी अस्त्र आहे, ते म्हणजे सामाजिक अंतर राखणे. विषाणूचा प्रसार कमीतकमी व्हावा, तसेच सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी, यासाठी रुग्णांना घरपोच औषधांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्मार्ट शहरांमध्ये असलेली टेलिमेडिसिनची सुविधा अशा काळात अतिशय उपयोगी ठरत आहे. स्मार्ट शहरांमध्ये असलेले वैद्यकीय व्यावसायिक (प्रमाणित-अधिकृत डॉक्टर्स आणि आरोग्य तज्ञ) यांच्या सहयोगाने ऑनलाइन वैद्यकीय सल्ला देण्याची सुविधा पुरवण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच नीती आयोग आणि इंडियन मेडिकल कौन्सिल यांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सध्याच्या लॉकडाउन काळात रूग्णांच्या घरापर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्षात दूर असतानाही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येत आहे. या मार्गदर्शक तत्वांनुसार डॉक्टरांना  दूरध्वनीच्या मदतीने रूग्णाने आपल्याला होत असलेल्या त्रासाची, आजाराविषयी माहिती लिखित स्वरूपात कळवली, तसेच व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधला -छायाचित्रे, ई-मेल, फॅक्स आणि कोणत्याही पद्धतीने संभाषण केले तर त्याआधारे औषधे लिहून देण्याची डॉक्टरांना परवानगी आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराबाहेर न पडता, अधिकृत, प्रमाणित डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार करता येणार आहेत. यामुळे कोविड-19 चा प्रसार कमी होण्यास मदत होणार आहे. 
संपूर्ण देशभरातल्या स्मार्ट शहरांमध्ये टेलिमेडिसिन सुविधेचा लाभ घेतला जात आहे. 
महाराष्ट्रातल्या नागपूर महानगरपालिकेने ‘कोरोना विषाणू अॅप’ तयार केले आहे. यामध्ये नागपूरच्या कोणत्याही नागरिकाला जर खोकला, तापाची लक्षणे दिसली आणि श्वासोच्छवासाची समस्या उद्भवली तर त्या नागरिकाने या अॅपवर असलेल्या एका अर्जामध्ये लक्षणांविषयी सर्व माहिती भरावी आणि सादर करावी. या मोबाईल अॅप्लिकेशनमध्येच या लक्षणांनुसार तपासणी करण्याची सुविधा आहे. तसेच संबंधित रुग्णाची माहिती नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय पथकापर्यंत पोहोचवलीही जाणार आहे. त्यामुळे त्या रुग्णाची पुढील योग्य ती सर्व काळजी तातडीने घेणे शक्य होणार आहे. 
अशाच प्रकारे देशभरात मध्य प्रदेशातल्या भोपाळ, उज्जैन, जबलपूर, ग्वाल्हेर, सतना आणि सागर या नगरपालिकांमध्ये स्मार्ट वैद्यकीय सुविधा दिल्या आहेत. उत्तर प्रदेशातल्या कानपूर, वाराणसी, कर्नाटकातल्या मेंगलोर, तामिळनाडूतल्या चेन्नई, गुजरातमधल्या गांधीनगर, राजस्थानातल्या कोटा आणि पश्चिम बंगालमधल्या न्यू टाऊन कोलकातामध्ये स्मार्ट वैद्यकीय सुविधा दिल्या आहेत. 

 

देशभरातल्या स्मार्ट शहरांमधील आधुनिक वैद्यकीय सुविधांचा तपशील जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

 

 

G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane


 



(Release ID: 1611985) Visitor Counter : 214