उपराष्ट्रपती कार्यालय

लॉकडाऊन नंतरच्या कालावधीत अर्थव्यवस्थेपेक्षा आरोग्याच्या मुद्द्यांना अधिक महत्व द्यावे - उपराष्ट्रपती

Posted On: 07 APR 2020 12:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 एप्रिल 2020


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुकारलेला 3 आठवड्यांचा देशव्यापी लॉकडाऊन जेव्हा 14 एप्रिलला संपेल तेव्हा देशाचे नेतृत्व काम करण्यासाठी पुढे झेपावेल आणि या निर्णयावर वाद-विवाद सुरु असतानाच उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांनी, या लॉकडाऊन नंतरच्या कालवधीत अर्थव्यवस्थेला स्थिरता प्रदान करण्याच्या कार्यापेक्षा लोकांच्या आरोग्याच्या मुद्यांकडे प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.

25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनला दोन आठवडे पूर्ण होत आहेत आणि पुढील स्थितीचे मुल्यांकन करताना नायडू म्हणाले की, लॉकडाऊनचे निर्बंध उठवायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी हा तिसरा आठवडा खूप महत्वपूर्ण आहे. ते म्हणाले की, विषाणूच्या संसर्गाच्या प्रसाराचे प्रमाण आणि दर या संदर्भातील आकडेवारी निर्बंधाचे  पुढील धोरण अवलंबून असेल. चालू धोरणाबाबत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या विचारविनिमयाचा संदर्भ देताना नायडू यांनी, 14 एप्रिल नंतरही हा कठीण कालावधी असाच सुरु राहिला तर जे काही निर्णय घेण्यात येतील त्याचे काटेकोरपणे पालन करा आणि आतापर्यंत जसे सहकार्य केले तसेच सहकार्य पुढे देखील करत रहा, असे आवाहन नागरिकांना केले आहे. सरकार पुरवठा साखळ्यांचे कामकाज सुरळीतपणे पार पाडेल आणि समाजातील असुरक्षित घटकांना पुरेशी मदत आणि पाठबळ प्रदान करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

22 मार्च रोजी जनता कर्फ्यूला लोकांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद, 25 मार्च पासून सुरु असलेला देशव्यापी लॉकडाऊन आणि 5 एप्रिल रोजी नागरिकांनी रात्री प्रज्वलित केलेले दिवे या सर्व घटनांचा पुनरुच्चार करताना उपराष्ट्रपतींनी जोर देवून सांगितले की, हे भारतीय रूढी-परंपरांच्या मुळात असलेल्या अध्यात्माचे द्योतक आहे. यावर सविस्तरपणे बोलताना नायडू म्हणाले की आत्मिक मोक्ष म्हणजे स्वार्थीपणाचा नाश करून सर्वांच्या भल्यासाठी प्रयत्न करणे होय आणि देशातील नागरिकांनी संकटाच्या कठीण प्रसंगी या मुलभूत मूल्याचे दर्शन घडवले आहे आणि आपली हीच भावना आपल्याला या आव्हानांवर मात करण्यात मदत करेल.

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करत असतानाच आणि त्याचे सकारात्मक परिणाम हाती येत असतानाच दिल्लीतील तब्लीगी समाजाच्या धार्मिक सभेचे प्रकरण समोर आले. त्याचा उल्लेख करताना नायडू म्हणाले की, या घटनेकडे स्वाभाविकपणे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही आणि इतरांसाठी ही घटना डोळे उघडणारी आहे.  

उपराष्ट्रपतींनी जागतिक समुदायाला आवाहन केले आहे की, त्यांनी संस्था, पायाभूत सुविधा, माहिती सामायिकरण,आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि स्वतंत्र कृती यांच्या प्रभावीपणाच्या संदर्भातील अपुऱ्या बाबींकडे लक्ष वेधून भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी सध्याच्या संकटातून योग्य धडे घ्यावेत.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या संपूर्ण निवेदनासाठी कृपया येथे क्लिक करा

 

 

U.Ujgare/S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1611961) Visitor Counter : 221