ऊर्जा मंत्रालय

दिवे बंद करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद - केंद्रीय ऊर्जा मंत्री

Posted On: 06 APR 2020 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या विरुद्धच्या लढाईमध्ये राष्ट्रीय एकतेचे दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विजेचे दिवे नऊ मिनिटे बंद ठेवून दीप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्व स्तरातून  अगदी अभूतपूर्व म्हणता येईल असा उदंड प्रतिसाद मिळाला. अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंह यांनी काल रात्री उशीरा दिली.दि. 5एप्रिल,2020च्या रात्री 9.00 वाजता दिवे बंद ठेवले जाणार होते, त्याकाळामध्ये विद्युतग्रीड हाताळणीचे कार्य निर्वेधपणे चालते की नाही, याचे निरीक्षण ऊर्जामंत्र्यांनी तिथं हजर राहून केले. यासाठी आर. के. सिंह आपल्या अधिकारी वर्गासमवेत नॅशनल पॉवर मॉनिटरिंग सेंटरमध्ये निरीक्षण करीत होते. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी आशा आणि सकारात्मकता यांचे प्रतीक म्हणून दीप प्रज्वलित केले.

काल रात्री 8.49 मिनिटांनी एकूण 117300 मेगावॅटस् वीजेची मागणी होती. त्यामध्ये काही क्षणातच घट झाली. आणि एकूण 85300 मेगावॅटसची मागणी नोंदवली गेली. रात्री 9वाजून 9 मिनिटांपर्यंत वीजेला मागणी कमी होती. म्हणजेच काही मिनिटांमध्ये 32000 मेगावॅटस् मागणी कमी झाली. यानंतर मागणी वाढू लागली; असे ऊर्जा मंत्री सिंह यांनी आपल्या ‘व्टिट’मध्ये म्हटले आहे. सामान्य बँडमध्ये 49.7 ते 50. 26 हटर्जवर व्होल्टेज स्थिर ठेवण्यात आले. काही मिनिटांसाठी 32000 मेगावॅटसने विजेची मागणी कमी नोंदवली गेली, याचाच अर्थ पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

संपूर्ण देशभरामध्ये विजेचे दिवे बंद करण्याचा कार्यक्रम यशस्वी पार पडल्यानंतर ऊर्जा मंत्री सिंह यांनी संपूर्ण देशाचे आणि राष्ट्रीय ऊर्जा प्रणालीचे सर्व कर्मचारी एक ‘टीम’ म्हणून कार्य करीत असल्याबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार रात्री 9वाजता 9मिनिटांसाठी विजेचे दिवे बंद करण्याच्या प्रक्रियेत चांगली भूमिका पार पाडल्याबद्दलराष्ट्रीय ग्रीड व्यवस्थापक पीओएसओसीओ, आणि ऊर्जा निर्मिती करत असलेल्या संस्था एनटीपीसी, एनएचपीसी, टीएचडीसी, एनईईपीसीओ, एसजेव्हिएनएल, बीबीएमबी आणि पीजीसीआयएल तसेच संबंधित अधिकारी, राज्यांच्या विद्युत विभागाचे अभियंते अशा सर्वांनी एक ‘टीम’ बनून काम केल्याबद्दल सर्वांचे कौतुक केले.  

कोरोनाच्या विरोधात देशाने सुरू केलेल्या लढाईत आम्ही सर्वजण पंतप्रधानांसमवेत एकत्रितपणे उभे आहोत. संपूर्ण भारत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली हा लढा देत आहे, असंही ऊर्जा मंत्री सिंह यांनी अखेरीस म्हटले आहे.

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Bedekar/P.Malandkar



(Release ID: 1611767) Visitor Counter : 185