विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून आरोग्यसेवा स्टार्टअप तयार करण्यात पाठिंबा, कोविड-19 च्या निदानासाठी झटपट चाचणी

Posted On: 06 APR 2020 3:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणारी पुण्यातील 'मोड्यूल इनोव्हेशन्स' नावाची स्टार्टअप कंपनी कोविड -19 च्या निदानासाठी 10 ते 15 मिनिटांची चाचणी तयार करत असून त्याला विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून अर्थसहाय्य मिळत आहे. 

यूसेन्स (USense) नावाचे याच कंपनीचे प्रमुख उत्पादन असून त्यातील पूर्वसिद्ध संकल्पनेचा वापर करून आता ही कंपनी nCoVSENSEs (TM) तयार करत आहे. कोविड-19 चा सामना करताना मानवी शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज म्हणजेच, प्रतिपिंडांचा झटपट शोध घेण्यासाठी याचा उपयोग होईल.

सध्या भारत ज्या टप्प्यावर आहे, त्याचा विचार करता बहुसंख्यांच्या चाचण्या करणे, आता आत्यंतिक महत्त्वाचे आहे. या झटपट चाचणी साधनामुळे, रुग्णांमधील संसर्गाची खात्रीशीर निश्चिती करता येईल. तसेच, एखादा संसर्गित रुग्ण बरा झाला का, किंवा कसे, त्याचप्रमाणे, संसर्गाची स्थितीही समजू शकेल.

सध्याची रिअल टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पोलीमेरास चेन रिऍक्शन (RT-PCR) ही पद्धत सर्वोत्कृष्ट असली तरी ती महागडी व वेळखाऊ आहे, तसेच त्यासाठी विशिष्ट प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. तर या नवीन झटपट चाचणीमुळे या अडचणीवर कार्यक्षम पद्धतीने व कमी खर्चात तोडगा निघू शकतो.

या चाचण्या म्हणजे, PCR वर आधारित खात्रीलायक तंत्राला पर्याय ठरू शकत नाहीत, हे खरे, मात्र प्रतिपिंडे शोधून काढण्यावर आधारित असणाऱ्या या चाचण्या बहुसंख्य लोकांच्या झटपट तपासण्या करण्यासाठी जगभर वापरात आहेत. संख्येने मर्यादित असणाऱ्या PCR यंत्रांवरील भार हलका होण्यास यामुळे मदत होते. तसेच, धोरणे ठरवणे, निर्णय घेणे अशा कामांनाही हे तंत्र सहाय्य्यभूत ठरते.- असे मत, विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले आहे.

मानवी शरीरात विषाणूजन्य संसर्गाचा शिरकाव होताच तयार होणाऱ्या IgG आणि IgM या प्रतिपिंडांचा शोध घेण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेली ही nCoVSENSe चाचणी, स्पाईक प्रथिनांविरोधात काम करते. त्यामुळे ती खासकरून कोविड-19 च्या निदानासाठी उपयुक्त ठरते.

येत्या 2 ते 3 महिन्यांत राष्ट्रीय पातळीवरील संस्थांकडून आवश्यक त्या परवानग्या मिळाल्यावर ही चाचणी प्रत्यक्षात उपयोगात आणण्याचा या कंपनीचा विचार आहे. या आजारातून लोक बरे झाले का, हे ठरवण्यासाठी भविष्यातही याचा उपयोग होऊ शकतो. विमानतळ, रेल्वेस्थानके, रुग्णालये, अशा अनेक ठिकाणी प्रवासी आणि रुग्णांच्या तपासणीसाठी हे वापरल्यास, भविष्यात पुन्हा संसर्ग उफाळण्याचा धोका आपण टाळू शकतो.

सदर तंत्रज्ञानाची व्यवहार्यता सिद्ध झाली आहे, तथापि, त्या उत्पादनाची उपयोगिता आणि स्पष्टीकरण देणारा प्रोटोटाईप अद्यापि बाकी आहे. 

 

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 



(Release ID: 1611689) Visitor Counter : 185