रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेच्या नवीन मध्यवर्ती नियंत्रण कक्षाकडून चोख कामगिरी;सव्वा लाखांहून अधिक विचारणांना तत्पर प्रतिसाद

Posted On: 06 APR 2020 2:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

 

देशभरात संपूर्ण संचारबंदी घोषित झाल्यानंतर, रेल्वे प्रवासी तसेच इतर नागरिकांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आणि मालवाहतुकीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भारतीय रेल्वे विभागाने एका विशेष मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाचे कार्य सुरु झाल्यापासूनच अत्यंत यशस्वी व्यवस्थापनाचे दर्शन घडवत रेल्वे कर्मचाऱ्यांनी पहिल्या दहा दिवसांतच विशिष्ट संवाद मंचाद्वारे कक्षाकडे आलेल्या सव्वा लाख विचारणांना प्रतिसाद दिला आहे. यापैकी 87 टक्के म्हणजे 1 लाख 9 हजारांहून अधिक प्रश्नांवर फोनद्वारे प्रत्यक्ष मानवी सहभागाच्या माध्यमातून उत्तरे देण्यात आली.

रेल्वेचे 138 आणि 139 हे हेल्पलाईन क्रमांक, ट्वीटरसारखी अनेक समाज माध्यमे आणि railmadad@rb.railnet.gov.in हा ईमेल आय डी या चार संवाद आणि अभिप्राय मंचांद्वारे विचारण्यात आलेल्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी रेल्वे नियंत्रण कक्ष प्रतिदिन, प्रतिक्षण सतर्क आहे. रेल्वे प्रशासन आणि सामान्य जनता यांच्यादरम्यान माहिती आणि सूचनांचा ओघ सुरु राहील याची दक्षता रेल्वे घेत आहे.

या विशेष नियंत्रण कक्षाच्या सुरळीत चलनवलनाची जबाबदारी संचालक पातळीवरील अधिकाऱ्याला देण्यात आली असून सर्व संवाद मंचांद्वारे मांडण्यात आलेल्या सूचना आणि अभिप्रायांचे परीक्षण करून त्याप्रमाणे तो पुढील कार्यवाही करत आहे.

रेल मदत हेल्पलाईन क्रमांक 139 वरून संपूर्ण संचारबंदीच्या दहा दिवसांत 80 हजारहून जास्त प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. यापैकी बहुतांश प्रश्न रेल्वे सेवा सुरु होण्याबाबत किंवा तिकिटांचा परतावा मिळण्यासंदर्भातील होते. या आपत्कालीन परिस्थितीत केलेली अत्यावश्यक वस्तूंची वाहतुक, वाघिणीवर लावण्यात आलेले विलंब शुल्क माफ, रेल्वेच्या डब्यांचे रुग्णालयात रुपांतर, अन्नाच्या पाकिटांचे वितरण, तसेच कोविड-19 या आजाराशी लढण्यासाठी लागणाऱ्या सॅनिटायझर, वैयक्तिक संरक्षणाची साधने आणि इतर उपकरणांची सुयोग्य माल वाहतूक याबद्दल रेल्वे विभागाचे कौतुक देखील करण्यात आले आहे.

संवाद साधण्यास सोप्या अशा स्थानिक भाषेत रेल्वे विभागाला प्रश्न विचारणे आणि माहिती जाणून घेणे सामान्य जनतेला जास्त सुलभ होईल हे लक्षात घेऊन रेल्वे विभागाने प्रश्नकर्त्याच्या जवळच्या विभागीय रेल्वे नियंत्रण कक्षाशी संवाद साधणारी भौगोलिकदृष्ट्या विभाजित हेल्पलाईन क्रमांक 138 सुरु केली आहे. स्थानिक भाषा आणि स्थानिक प्रश्नांशी परिचित असणारे रेल्वे कर्मचारी या हेल्पलाईनवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत.

 

 

U.Ujgare/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 



(Release ID: 1611648) Visitor Counter : 206