आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ हर्ष वर्धन यांनी झज्जर एम्सला दिली भेट; कोविड-19 वर मात करण्यासाठीच्या सज्जतेचा घेतला आढावा

Posted On: 05 APR 2020 6:07PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 एप्रिल 2020

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज झज्जर इथल्या, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला, एम्सला भेट दिली आणि  कोविड-19 वर मात करण्यासाठीच्या सज्जतेचा आढावा घेतला.

झज्जर एम्स हे कोविड-19 साठी समर्पित रुग्णालय म्हणून काम करेल असे त्यांनी सांगितले. यामध्ये 300 खाटांचा विलगीकरण कक्ष राहणार आहे. त्यामुळे प्रगत वैद्यकीय मदतीची गरज असणाऱ्या रुग्णांकडे, तातडीने लक्ष पुरवणे सुनिश्चित होणार आहे. या भेटीदरम्यान मंत्र्यांनी, रूग्णालयातील  विविध सुविधांचा, विश्राम सदनाचा आणि निवासी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्याच्या निवासांची पाहणी केली. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे काही कोविड-19 रुग्णांची विचारपूस केली. या रूग्णालयातल्या सुविधांबाबत त्यांनी या रुग्णांकडून प्रतिसादही विचारला, यामुळे आवश्यक त्या सुधारणा  करणे शक्य होईल.

डिजिटल  प्लॅटफॉर्म  आणि व्हिडिओ किंवा व्हाइस कॉल द्वारे कोविड-19 चे रुग्ण आणि संशयित रुग्णांवर  अहोरात्र देखरेख  सुनिश्चित करण्याबद्दल डॉ हर्ष वर्धन यांनी या एम्सची प्रशंसा केली. गेल्या काही दिवसात, दिल्ली एम्स,एलएनजेपी,सफदरजंग आणि आता झज्जर एम्सला आपण भेट देऊन कोविड-19 वर मात करण्यासाठीच्या तयारीचा आढावा घेतला.कसोटीच्या या काळात आपल्या या आरोग्य   योद्यांचे   उच्च मनोधैर्य वाखाणण्याजोगे असल्याचे ते म्हणाले.या महामारीशी मुकाबला करण्यासाठीची या रुग्णालयांच्या  तयारीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.कोविड-19विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर असलेल्या डॉक्टर,परिचारिका  आणि इतर आरोग्य  कर्मचाऱ्यांची निष्ठा, कठोर परिश्रम आणि बांधिलकीची त्यांनी प्रशंसा केली.

डॉक्टर आणि आरोग्य  कर्मचाऱ्यांनी  कोणतीही भीती न बाळगता काम करावे शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे, अशा शब्दात त्यांनी या वर्गाला आश्वस्त केले.

देशात, कोविड-19चा संसर्ग रोखणे,यासंदर्भातले व्यवस्थापन याबाबत उच्चस्तरीय देखरेख ठेवली जात आहे. राज्यांच्या सहकार्याने विविध पावले  उचलण्यात येत आहेत.

संबंधित विभागांचे  वरिष्ठ अधिकारी, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश यांच्या समवेत, पंतप्रधान नियमित आढावा घेऊन लक्ष पुरवत आहेत, असे ते म्हणाले.

जनतेने लॉक डाऊनचे काटेकोर पालन करावे असे सांगून  लॉक डाऊन आणि सोशल डीस्टन्सिग  यांचा संयोग हीच कोविड-19 विरोधातली  प्रभावी सामाजिक लस असल्याचे  ते म्हणाले.

देशात  येत्या काळात आवश्यकता वाढल्यास त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने,पीपीई, एन 95, आणि व्हेंटीलेटर यासाठी पुरेशी मागणी नोंदवल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या ऐक्याचे   दर्शन घडवण्यासाठी आणि देशाला कोविडच्या  अंधकारातून तेजाकडे  नेण्यासाठी, पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे जनतेने आज रात्री 9 वाजता दीप प्रज्वलित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1611460) Visitor Counter : 136