शिक्षण मंत्रालय

कोविड -19 च्या पृष्ठभूमीवर देशभरातल्या केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी साधला संवाद


स्वयं आणि इतर डिजिटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्‍यांना शिकवण्यावर भर देण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे आवाहन

ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देणे तसेच ऑनलाइल परीक्षांविषयी शिफारसी, सल्ले देण्यासाठी ‘इग्नू’चे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केल्याची घोषणा

Posted On: 04 APR 2020 9:39PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020

 

कोविड-19च्या पृष्ठभूमीवर देशभरातल्या केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी संवाद साधला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये पुढील मुद्यांवर चर्चा झाली.

1. विद्यापीठांच्या वसतिगृहांमध्ये वास्तव्य करीत असलेले विद्यार्थी त्याचबरोबर विद्यापीठांचा अध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या आरोग्याविषयी कोणती काळजी घेण्यात आली आहे, कोणते उपाय योजले आहेत.

2. विद्यापीठांमध्ये सामाजिक अंतर आणि विलगीकरणविषयीच्या निर्देशांचे योग्य पद्धतीने काटेकोर पालन करण्यासंबंधी

3.  कोविड-19 संशयितांच्या चाचणीसाठी विद्यापीठांकडे असलेली सुविधा

4.  विद्यार्थी वर्गाला शिकवण्यासाठी केलेली व्यवस्था 

5.  अशा संकट काळात सर्वांचे मानसिक स्वास्थ टिकून राहण्यासाठी केलेले व्यवस्थापन

6.    सर्व कर्मचारी वर्गाच्या (स्थायी, अस्थायी आणि दैनिक वेतनभोगी) वेतनासंबंधीच्या समस्यांचे निकारण.

 

7.  नवाचार, नवसंकल्पना आणि संशोधन यांच्याविषयी समाज माध्यमांव्दारे सर्वांना माहिती देण्याविषयी चर्चा

8. कोविड-19 संबंधित संशोधन

देशभरामध्ये कोरोना महामारीचे संकट निर्माण झाले आहे, अशा आपत्काळामध्ये सर्वजण मिळून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तत्पर आहे, असा विश्वास यावेळी सर्व विद्यापीठांनी व्यक्त केला. विद्यापीठांच्या वसतिगृहांमध्ये जे विद्यार्थी सध्या वास्तव्य करीत आहेत, त्या सर्वांच्या खाण्या-पिण्याची चांगली सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मानसिक आरोग्याचीही योग्य पद्धतीने काळजी घेण्यात येत आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठ यांनी 40 खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. बहुतांश विद्यापीठांमध्ये डिजिटल माध्यमांच्या मदतीने शिकवले जात आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्राला विलंब होणार नाही, असं यावेळी सांगण्यात आलं. केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री पोखरियाल यांनी याविषयी निर्देश दिले की, सर्व कुलगुरूंनी यासाठी आपल्या अध्यापकांना आणि विद्यार्थ्‍यांना ‘स्वयं’ आणि ‘स्वयं प्रभा’ यांचा मिशन मोडवर वापर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्याचबरोबर इतर ऑनलाइन डिजिटल माध्यमांचा वापर करून शिक्षकांनी आपला अभ्यासक्रम शिकवणे सुरू ठेवावे. ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देणे त्याचबरोबर ऑनलाइन परीक्षा घेणे याविषयी सर्वांनी शिफारसी, मते नोंदवावीत यासाठी इग्नूचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणाही निशंक यांनी यावेळी केली.

देशभरातल्या सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या विद्यार्थ्‍यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नेतृत्वाखाली एक शैक्षणिक वार्षिक वेळापत्रक समिती बनवण्याचा निर्णयही मंत्री निशंक यांनी यावेळी घेतला. ही समिती शैक्षणिक सत्रांना विलंब होवू नये, यासाठी शिफारसी, सल्ले सुचवू शकेल.

सद्यस्थितीमध्ये विद्यार्थी वर्गाचे मानसिक आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे. यासाठी मनुष्य बळ विकास मंत्रालयातल्या संयुक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्याची घोषणा यावेळी मंत्री निशंक यांनी केली. या समितीमार्फत शालेय विद्यार्थी वर्गाबरोबरच महाविद्यालयीन आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्‍यांचे मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी विविध केंद्रीय विद्यालये आणि केंद्रीय विद्यापीठांबरोबर समन्वय साधेल.

बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठ यांच्यावतीने जी रुग्णालये चालवली जातात, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता असू नये, यासंबंधी विशेष निर्देश निशंक यांनी या दोन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना दिले. काही विद्यापीठांमध्ये कोविड-19 विषयी संशोधन केले जात आहे. त्या संशोधनाला अधिकृत संस्थांच्यावतीने अनुमोदन, मान्यता दिल्यानंतरच त्याविषयी माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. असं यावेळी सांगण्यात आलं. ज्या विद्यापीठांमध्ये कोविड-19 विषयी संशोधन सुरू आहे, ते कार्य वेगाने करावे तसेच त्यासाठी कोणत्याही प्रकारे मदत लागणार असेल तर त्याची पूर्तता तातडीने केली जाईल, असं आश्वासन मनुष्य बळ विकास मंत्री निशंक यांनी यावेळी दिले. ईशान्येकडील राज्यांमध्ये तिथल्या स्थानिक परंपरा आणि पूर्वापार चालत आलेल्या उपचार पद्धती यामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते- अशा संबंधीच्या काही प्रणाली, पद्धती असतील तर त्यावरही संशोधन करावे, असे निर्देश यावेळी निशंक यांनी केली.

सध्याच्या काळाचा विचार करून सर्व स्थायी, अस्थायी आणि दैनिक वेतनभोगी कर्मचारी वर्गाला वेतन आणि भत्ते वेळेवर देण्यात येत आहेत. तसेच यावेळी अनुपस्थित असलेल्या दिवसांचाही पगार देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी यावेळी दिली.

सर्व कुलगुरूंनी आपल्या कार्यक्षेत्रातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्यावतीने ‘पीएम- केअर्स’ निधीमध्ये जास्तीत जास्त योगदान देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केले. त्याचबरोबर दि. 5 एप्रिल, 2020 रोजी रात्री 9 वाजता, 9 मिनिटे आपल्या घरासमोर दीवा, मेणबत्ती किंवा मोबाइलचा फ्लॅशलाइट लावून कोविड-19 चा अंधःकार दूर व्हावा, यासाठी आपण सर्व भारतीय एकजूट आहोत, हे प्रकट करण्याचे आवाहन पोखरियाल यांनी केले.

भारत सरकारने विकसित केलेल्या आरोग्य सेतू अॅपचा वापर सर्वांनी मोठ्या प्रमाणावर करावा. त्याचबरोबर कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आयुष मंत्रालय वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निशंक यांनी केले.

सर्व कुलगुरूंनी पुढील गोष्टींवर तातडीने पावले उचलावीत असे निर्देश  मनुष्य बळ विकास मंत्री निशंक यांनी अखेरीस दिले.

1.   समग्र ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून जीईआर म्हणजे सकल नावनोंदणी गुणोत्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे

2.  वाचन - वाचनाचा दर्जा आणि मानक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करणे

3.  विद्यापीठाच्या परिसरामध्ये शिस्त आणि इतर व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी उपाय

4.  केंदीय विद्यापीठांनी ज्ञान आणि उत्कृष्टता केंद्र विकसित करण्यासाठी योग्य धोरण तयार करणे.

5.  सध्या आलेल्या संकटाची परिस्थिती निवळल्यानंतर सामान्य काळामध्ये करावयाची कामे सुरळीत पार पडावीत यासाठी निश्चित योजना करणे आणि समग्र कार्य योजनेवर विचार करणे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor



(Release ID: 1611316) Visitor Counter : 160