आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 सद्यस्थिती

Posted On: 04 APR 2020 7:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020


देशामध्ये कोविड-19 प्रतिबंधासाठी, त्याचा फैलाव थांबवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी सरकारने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश यांच्यासोबत अनेक उपाययोजना केल्या आहेत.त्यावर अतिशय उच्च स्तरावरून देखरेख केली जात आहे.

कोविड-19 चा फैलाव रोखण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी देशात विविध पातळ्यांवर डॉक्टर, परिचारक व्यावसायिक,संबंधित आरोग्य निगा व्यावसायिक आणि इतर यांच्यासह आरोग्य व्यावसायिक उपलब्ध आहेत.

सुमारे 9.70 लाख आशा सेवक, एक लाख आयुष व्यावसायिक, एनसीसी कॅडेट्स, माजी सैनिक, रेड क्रॉस/एनएसएस/ एनवायके स्वयंसेवक, ग्राम पंचायती आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, स्वयंसेवी संघटना यांना त्यांची गरज भासल्यास सहभागी करण्यात येऊ शकेल. निवासी/ पदव्युत्तर विद्यार्थी आणि परिचारकशास्त्राचे विद्यार्थी यांना रुग्णालय व्यवस्थापनाचा भाग म्हणून त्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी एसओपी अर्थात आदर्श कार्यान्वयन नियमावली तयार करण्यात आली आहे.त्या व्यतिरिक्त सरकारी सेवा, लष्कराच्या वैद्यकीय  सेवा, सार्वजनिक उपक्रम यातील निवृत्त डॉक्टर आणि खाजगी डॉक्टरांसह 31,000 हून जास्त डॉक्टरांनी स्वेच्छेने कोविड-19 विरोधातील लढ्यात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. 

चेहरा आणि तोंड याच्यासाठी घरगुती बनावटीचे संरक्षक आच्छादन वापरण्याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. या सूचना

https://www.mohfw.gov.in/pdf/Advisory&ManualonuseofHomemadeProtectiveCoverforFace&Mouth.pdf 

येथे उपलब्ध आहेत.

वैद्यकीय व्यवस्थापन, व्हेंटिलेटर सपोर्ट, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण, विलगीकरण व्यवस्थापन इत्यादींसह विविध विषयांवरील प्रशिक्षणाची 30 मॉड्युल्स तयार करण्यात आली आहेत आणि एकत्रित करण्यात आली आहेत. ही मॉड्युल्स आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  https://www.mohfw.gov.in/ उपलब्ध आहेत.

असे दिसून आले आहे की आतापर्यंत दगावलेल्या बहुसंख्य रुग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, हृदयरोग यांसारख्या समस्या असलेल्या नागरिकांचा समावेश आहे.  त्यामुळे उच्च जोखीम श्रेणीत समाविष्ट होणाऱ्या नागरिकांना खालील काळजी घेणे आवश्यक आहे. सर्व बाधित रुग्णांचे  वयोमानानुसार केलेले विश्लेषण असे दाखवत आहे की

  • 8.61% प्रकरणे 0-20 वर्षे या वयोगटातील
  • 41.88% प्रकरणे 21 ते 40 वर्षे या वयोगटातील
  • 32.82% प्रकरणे 41-60 वर्षे या वयोगटातील
  • 16.69% प्रकरणे 60 वर्षांवरील

लाईफलाईन उडान योजनेंतर्गत मालवाहतूक करणाऱ्या विमानांनी आतापर्यंत ईशान्येकडील प्रदेश आणि दुर्गम भागांवर भर देत विविध राज्यांमध्ये सुमारे 119 टन सामग्री पोहोचवली आहे. यामध्ये कोविड-19 संबंधित रिएजंट्स, एन्झाइम्ससृ, वैद्यकीय उपकरणे, टेस्टिंग किट्स, पीपीई अर्थात वैयक्तिक संरक्षक सामग्री, मास्क, ग्लोव्हज इत्यादींचा समावेश आहे. 

आतापर्यंत 2902 पुष्टी झालेल्या रुग्णांची  आणि 68 मृत्यूंची नोंद झाली आहे. 183 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. पुष्टी झालेल्या एकूण 2902 रुग्णांपैकी 1023 रुग्ण 17 राज्यातील तबलिघी जमातशी संबंधित आहेत. या राज्यांमध्ये तामिळनाडू, दिल्ली, आंध्र प्रदेश, आसाम, जम्मू-काश्मीर,

राजस्थान, तेलंगणा, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, हिमाचल, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक मुद्दे, मार्गदर्शक सूचना आणि नियमावली संदर्भात अधिकृत आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी नियमितपणे पुढील संकेतस्थळाला भेट द्या. https://www.mohfw.gov.in/ 

कोविड-19 शी सबंधित तांत्रिक प्रश्न  technicalquery.covid19[at]gov[dot]in  या ईमेलवर आणि इतर प्रश्न ncov2019[at]gov[dot]in या ईमेलवर पाठवता येतील.

कोविड-19 बाबत कोणतीही शंका दूर करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाला फोन करा. हेल्पलाईन क्रमांक: +91-11-23978046 or 1075 (टोल फ्री).

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील क्रमांकाची यादी  https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf या ठिकाणी देखील उपलब्ध आहे.

 

 


G.Chippalkatti/S.Patil/D.Rane

  


 



(Release ID: 1611215) Visitor Counter : 189