विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने(डीएसटी) निधी दिलेल्या स्टार्टअपने विकसित केले कोविड-19 महामारीचा मुकाबला करण्यासाठी चांदी आधारित रसायन
Posted On:
04 APR 2020 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि जैवतंत्रज्ञान विभाग यांनी संयुक्तपणे पाठबळ दिलेल्या पुण्याच्या वुईइनोव्हेट बायोसोल्युशन्स या स्टार्टअपने नॉन अल्कोहोलिक जलीय कोलॉईडल सिल्वर द्रावण तयार केले आहे. हात आणि पर्यावरणातील इतर पृष्ठभाग निर्जंतुक करण्यासाठी आपल्या स्वतःच्या नॅनोएजीसाइड या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने हे निर्जंतुकीकरणाचे द्रावण तयार करण्यात आले आहे.
हे द्रावण बिगरज्वलनशील आणि घातक रसायनविरहित आहे आणि महामारी पसरण्याचे प्रमुख कारण असलेल्या संपर्कातून पसरणाऱ्या संसर्गाला रोखण्यामध्ये प्रभावी आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रातले व्यावसायिक आणि इतर बाधित लोकांच्या रक्षणासाठी उपयुक्त आहे.
वीइनोव्हेट बायोसोल्युशन्सचे कोलॉईडल सिल्वर सोल्युशन विषाणूजन्य निगेटिव्ह स्ट्रँड आरएनए आणि विषाणूजन्य बडिंग यांच्यातील संश्लेषणाला प्रतिबंध करण्याच्या चांदीच्या अतिसूक्ष्मकणांच्या क्षमतेवर आधारित असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या घातक रसायनाचा वापर केलेला नाही आणि इतर अल्कोहोलच्या वापराने तयार केलेल्या निर्जंतुकांच्या तुलनेत ज्वलनशील नाही.
या निर्जंतुकाची प्रयोगशाळेतील चाचणी झाली आहे आणि त्याच्या उत्पादकांना चाचणी परवाना मिळाला आहे.
लहान प्रमाणात कोलॉईडल सिल्वरचे संश्लेषण करण्याचे प्राथमिक काम सुरू करण्यात आले असून पाच लिटरची प्रायोगिक तत्वावरची या उत्पादनाची पाच लिटरची पहिली बॅच तयार करण्यात आली.
हॅड सॅनिटायजेशन आणि निर्जंतुकांच्या वाढत्या मागणीला लक्षात घेऊन सुरुवातीला दिवसाला किमान 200 लीटर कोलॉईडल सिल्वर द्रावण तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या द्रावणाच्या मदतीने संसर्ग थांबवण्यामध्ये आणि देशाला संसर्गमुक्त बनवण्यात मदत करण्यामध्ये या द्रावणाचा खूप उपयोग होईल, असा विश्वास वाटत असल्याचे या कंपनीचे संस्थापक मिलिंद चौधरी यांनी सांगितले.

कोविड-19शी संबंधित थेरॉनॉटिक्स (उपचारपद्धती अधिक निदान) पासून निर्जंतुकीकरण आणि इमेजिंगपर्यंतच्या अनेक प्रकारच्या बाबींमध्ये नॅनोपार्टिकल्स एक प्रभावी उपाय असल्याचे दिसून येत आहे. 100 एनएम पेक्षा कमी आकार असल्याने त्याची तुलना कोविड-19 विषाणूसोबत करता येऊ शकते आणि त्याचप्रमाणे एखाद्या औषधाचा शरीरात विशिष्ट जागी पुरवठा करणे यांसारख्या कामांमध्ये त्यांचा उपयोग होऊ शकतो, असे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक आशुतोष शर्मा यांनी सांगितले.
सिल्वर नॅनोपार्टिकल्स अतिशय प्रभावी विषाणू प्रतिबंधक असून एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हर्पेस सिम्प्लेक्स विषाणू, इन्फ्लूएंझा विषाणू आणि असे इतर यांच्या विरोधात काम करत असल्याचे आढळले आहे. अलीकडेच केलेल्या अभ्यासात असे आढळले की ग्लुटॅथिओन असलेल्या एजीटूएस एनसीएसचा विषाणूकारक निगेटिव्ह आरएनए स्ट्रॅन्ड आणि व्हायरल बडिंग संश्लेषण रोखून कोरोना विषाणूचा प्रसार थांबवण्यासाठी मदत होते. जपानमधील साईतामा येथील राष्ट्रीय संरक्षण वैद्यकीय महाविद्यालयाचे वैज्ञानिक शिंगो नाकामुरा यांच्यासारख्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात असे सूचित केले आहे की एजी एनपी आधारित गोष्टींमुळे रुग्णाला होणारा संसर्ग रोखण्याव्यतिरिक्त आरोग्य कर्मचाऱ्यांचेही संसर्गापासून रक्षण होते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर कोविड-19 विषाणूच्या आरएनएच्या स्वप्रतिकृती बनवण्याच्या आणि संसर्गकारक क्षमतेला संपवू शकते. कोलोईडल सिल्वर तयार करण्याच्या प्रक्रियेचे भारतीय स्वामित्व हक्क मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यता आलेला आहे.
(अधिक तपशीलासाठी:
डॉ. मिलिंद चौधरी, सहसंस्थापक
वुईइनोवेट बायोसोल्युशन्स यांच्याशी संपर्क साधावा.
Email: milind.bio[at]gmail[dot]com,
Mob: 9867468149).
U.Ujgare/S.Patil/D.Rane
(Release ID: 1611145)