आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 वर मात करण्यासाठीच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी डॉ. हर्ष वर्धन यांनी आज एलएनजेपी रुग्णालयाला दिली भेट


कोविड-19 रुग्णालय म्हणून एलएनजेपी समर्पित आणि कार्यरत

Posted On: 04 APR 2020 4:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2020

 

कोविड-19 वर मात करण्यासाठीच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लोक नारायण जयप्रकाश रुग्णालयाला भेट दिली.  

केंद्रीय मंत्र्यांनी फिव्हर (ज्वर) वॉर्ड, नवीन शस्त्रक्रिया वॉर्ड, आहारयोजना (डायेटरी) विभाग. विशेष वॉर्ड, कोरोना स्क्रीनिंग केंद्र, कोरोना केअर युनिट आणि अति दक्षता विभागाला भेट दिली. रुग्णालयाचे विविध वॉर्ड आणि परिसराची सखोल पाहणी केल्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व विभागांच्या कामाची प्रशंसा केली तसेच आणि तेथे नियुक्त असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि परिश्रमाचे कौतुक केले. “अशावेळी तुम्ही केलेल्या सेवेसाठी देश तुमचा आभारी आहे”, असं ते म्हणाले. रुग्णालयात संक्रमण नियंत्रणाच्या योग्य शिष्टाचाराचे पालन केल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. अलगीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या खाटांची आवश्यकता लक्षात घेऊन डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, एलएनजेपी रुग्णालय पुरेसे अलगाव वॉर्ड्स आणि खाटा असलेले समर्पित कोविड-19 रुग्णालय म्हणून काम करेल. 

डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले की, सरकारने कोविड-19 रुग्णांसाठी एलएनजेपी रुग्णालयात 1500 आणि जी. बी. पंत रुग्णालयात 500 खाटांची सोय केली आहे. या वॉर्डमध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा त्रास होऊ नये म्हणून रुग्णालयाच्या आवारातच परिचारिका वसतीगृहा मध्ये आणि जवळपासच्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णासाठी टेली-मेडिसिन/ टेली- सल्ला मसलत यंत्रणा बसवण्याची सूचना देखील त्यांनी केली. असाच सेटअप एम्स, नवी दिल्ली येथे सुरु करण्यात आला आहे. 

पीपीईएस, एन 95 मास्क आणि व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेबद्दल आरोग्य मंत्री म्हणाले की, “भविष्यात आवशक्यता भासल्यास देशाची वाढती गरज भागविण्यासाठी आम्ही पुरेशा प्रमाणात या गोष्टींची मागणी केली आहे.”

डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्‍यांना त्रास देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की गृह मंत्रालयाने अशा घटनांची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांनी सामान्य नागरिक आणि रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना, कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला करू नये असे आवाहन केले आहे. 

त्यांनी लोकांना देशातील कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सूचनांचे आणि सामाजिक अंतर राखण्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याची विनंती केली.


 

B.Gokhale/ S.Mhatre/D.Rane



(Release ID: 1611129) Visitor Counter : 177