विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड -19 शी लढण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान विभागाद्वारे मुंबईच्या आय.आय.टी.मध्ये ‘जलद प्रतिसाद केंद्र’ स्थापन

Posted On: 03 APR 2020 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 एप्रिल 2020

 

कोविड -19 शी दोन हात करण्यासाठी भारत सरकारच्या DST अर्थात विज्ञान तंत्रज्ञान विभागाने 56 कोटी रुपये खर्चून मुंबईत IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात 'सेंटर फॉर ऑगमेंटिंग वॉर विथ कोविड -19 हेल्थ क्रायसिस - अर्थात CAWACH (इंग्रजी लघुरूप -कवच ) या केंद्राची स्थापना केली आहे. 'कोविड -19 या आरोग्यविषयक संकटाशी युद्ध करण्यात साथ देण्याचे' काम हे केंद्र करणार असून, कोविड-19 मुळे उद्भवणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अभिनव कल्पना लढविणाऱ्या स्टार्टअप उद्योगांचा शोध, मूल्यमापन व त्यांना पाठबळ देण्याचे काम याद्वारे केले जाणार आहे. विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या पाठबळावर चालणारी, IIT मधील SINE म्हणजेच 'अभिनवता आणि उद्योजकता संस्था' ही 'कवच'ची प्रचालन संस्था म्हणून काम करेल.

कोविड -19 ने जगभरात थैमान घातला असुन, या आपत्तीशी लढा देण्याच्या भारताच्या प्रयत्नांना वेग देण्यात DST चा सिंहाचा वाटा आहे.

देशात आरोग्यविषयक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असता, विविध संशोधन संस्था व प्रयोगशाळांमध्ये या रोगावर तोडगा शोधण्याचे प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. कोविड -19 ची पुढे आणखी वाढ होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी या प्रयत्नांना जोड देण्यासाठी व त्यांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची पावले उचलली आहेत. 

कोविड -19 च्या नियंत्रणासाठी व्हेंटीलेटर्स,निदान व उपचार प्रणाली, माहिती प्रणाली अशा प्रकारच्या उपायांमध्ये अभिनव मार्ग तयार करणाऱ्या संशोधन व विकास प्रयत्नांना पाठबळ देण्याचे काम आता DST करत आहे.

अशा कामी त्या-त्या उत्पादनांची व्यापारी तत्त्वावर जलद निर्मिती व विविध भौगोलिक प्रदेशांत ती उत्पादने पोहोचविण्यासाठीचे प्रयत्न याकरिता स्टार्टअप उद्योगांना पाठबळ दिले जात आहे.

येत्या 6 महिन्यात अशी अभिनव उत्पादने बाजारात आणू शकणाऱ्या सक्षम स्टार्टअप उद्योगांना आर्थिक मदत आणि निधी उपलब्धता देण्याचे 'कवच'चे धोरण आहे.

नवीन प्रकारचे, स्वस्त, सुरक्षित आणि परिणामकारक असे व्हेंटीलेटर्स, श्वसन-सहायक यंत्रणा, व्यक्तिगत सुरक्षा सामग्री, तसेच, सॅनिटायझर्स, जंतुनाशक औषधे, निदान प्रणाली इत्यादींचे नवे पर्याय शोधणारे ५० नवोन्मेषी आणि स्टार्टअप उद्योग 'कवच'द्वारे हेरले जातील.

कोविड -19वर उपाय शोधणाऱ्या व सदर उत्पादनांच्या चाचण्यांपासून ती बाजारात उतरवेपर्यंतची कामे करणाऱ्या देशभरच्या संस्थांच्या नेट्वर्कशी यामुळे संपर्क साधता येईल.

"DST चा 'कवच' कार्यक्रम, कोविड -19 ने ठेवलेल्या निरनिराळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठीची तरुणाईची ऊर्जा, बुद्धिमत्ता, अभिनव क्लृप्त्या लढविणाऱ्या तंत्रज्ञान विषयक उदयोन्मुख कंपन्या आणि स्टार्टअप यांना एकत्र आणू शकेल. आणि त्यांच्या प्रयत्नांना वेग देण्यावर त्याचा भर असेल", असे मत, DST चे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी मांडले.

या लढ्यात देशातील संसाधने एकमेकांशी जोडण्याच्या आणि देशाची गरज ओळखून निष्ठेने काम करणाऱ्या संस्था, संशोधक, तज्ज्ञ, उद्योजक, नवोन्मेषी आणि स्टार्टअप अशा सर्वांसोबत एकत्रित प्रयत्न करण्याच्या कामी DST आघाडीवर आहे.

{अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा-:

टीबीआय. संपर्क-: श्रीम.पोयनी भट्ट, मुख्य अधिकारी,

सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युअरशिप, (SINE)

भारतीय तंत्रज्ञान संस्था-बॉम्बे (IIT- मुंबई)

दूरध्वनी : +91 22 25767072

इ-मेल-: poyni.bhatt@sineiitb.org

संकेतस्थळ -: www.sineiitb.org

DST संपर्क -: डॉ.अनिता गुप्ता, शास्त्रज्ञ Scientist-G

विज्ञान तंत्रज्ञान विभाग

भ्रमणध्वनी -: +91-9811828996

इ-मेल -: anigupta[at]nic[dot]in}

 

B.Gokhale/J.Waishampayan/P.Malandkar


(Release ID: 1610778) Visitor Counter : 286