माहिती आणि प्रसारण मंत्रालय
18 व्या मिफ्फ मध्ये सिनेमॅटोग्राफर सनी जोसेफ आणि आर.व्ही.रमाणी यांच्यातील संवादात्मक सत्राचे रूपांतर दृश्य आणि बौद्धिक जुगलबंदीमध्ये झाले
सिनेमा म्हणजे सामाजिक गरजा आणि अधुरेपणा प्रतिबिंबित करणारा आरसा: सनी जोसेफ
आधुनिक माहितीपटांमध्ये काल्पनिक घटकांना सर्रास स्थान: आर. व्ही. रमाणी
Posted On:
19 JUN 2024 8:05PM by PIB Mumbai
मुंबई, 19 जून 2024
18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) ‘बियॉन्ड बाऊंडरीज’ नावाच्या संवादात्मक सत्राचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर आर.व्ही. रमाणी आणि सनी जोसेफ यात सहभागी झाले होते. या आकर्षक सत्रात सिनेमॅटोग्राफीच्या कला आणि तत्त्वज्ञान याबाबत प्रगल्भ दृष्टिकोन आणि विचारप्रवर्तक चर्चेने प्रेक्षकांना मोहित केले.
सत्राची सुरुवात करताना, सनी जोसेफ यांनी सिनेमाच्या कथानकातील अखंडता आणि एकतेची भावना जपणाऱ्या मौलिकतेच्या महत्त्वावर भर दिला. समाजसुधारक श्री नारायण गुरूंचा हवाला देत त्यांनी सांगितले, "जो प्रेम करतो, तो जगतो," सिनेमातील उपमा द्यायची झाल्यास "दर सेकंदाला 24 वेळा प्रेम करा." सिनेमा, मग तो फीचर फिल्म किंवा माहितीपट असो, सामाजिक गरजा आणि अधुरेपणा प्रतिबिंबित करणारा आरसा म्हणून तो काम करतो असे त्यांनी निदर्शनास आणले.
चित्रपट निर्माते चित्रण करतात त्या विषयांचा आणि वातावरणाचा आदर करण्याच्या गरजेवर सनी जोसेफ यांनी भर दिला. हा धडा त्यांना त्यांचे मार्गदर्शक, दिग्दर्शक जी. अरविंदन यांच्याकडून मिळाला. त्यांनी माहितीपट चित्रित करताना व्यत्ययाशिवाय करण्याचा सल्ला दिला आणि सुचवले की विषयांची भाषा समजून घेतल्याने खऱ्या भावना आणि लय पकडण्यात मदत होते. सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग यांच्यातील अन्योन्य संबंध उद्धृत करताना, त्यांनी नमूद केले की चांगले एडिटर दोन्ही कलाप्रकारांच्या परस्पर संबंधांवर भर देत शॉट्समधील अंतर्निहित लय जपतात.
(फोटोमध्ये: 18 व्या मिफ्फ मध्ये संवादात्मक सत्रात प्रख्यात चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर सनी जोसेफ)
विषय आणि सेटिंग बाबत जाणून घेण्याच्या कुवतीविषयी बोलताना राष्ट्रीय पुरस्कार विजेते आर.व्ही. रमाणी यांनी सिनेमॅटोग्राफीचा त्यांचा दृष्टिकोन मांडला. चित्रीकरणादरम्यानच्या अनियोजित, उत्स्फूर्त क्षणांमुळे अनेकदा जादुई, परिवर्तनीय दृश्ये कशी चित्रित होतात याचे वर्णन त्यांनी केले. रमाणी यांच्यासाठी चित्रपटाची संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे; जेव्हा शक्यतांचा धांडोळा घेतला जातो तेव्हा शॉटचा शेवट नैसर्गिक भासतो यावर त्यांचा विश्वास आहे.
दोन्ही चित्रपट निर्मात्यांनी सिनेमॅटोग्राफीच्या उदयोन्मुख पटलावर चर्चा केली. सनी जोसेफ यांनी डिजिटल कॅमेरा तंत्रज्ञानातील प्रगतीची प्रशंसा केली, ज्याने काही प्रमाणात कामाचा ताण कमी करून सिनेमॅटोग्राफरना अधिक स्वातंत्र्य दिले आहे. समकालीन चित्रपटांमध्ये प्रायोगिक चित्रपटांच्या अभावावर टिप्पणी करून त्यांनी तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रयोगशीलतेचा स्वीकार करण्यास प्रोत्साहित केले.
(फोटोमध्ये: 18 व्या मिफ्फ मध्ये संवादात्मक सत्रात राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर आर.व्ही. रमाणी)
स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवरच्या आधुनिक माहितीपटांमधील काल्पनिक घटकांच्या सर्रास होत असलेल्या वापराबद्दल आर व्ही रामाणी यांनी विश्लेषण केले. कथेचं स्क्रिप्ट हे निर्माते मिळण्यासाठी उपयोगी पडत असले तरी प्रत्येक वेळी ते तसंच व्हायला हवं हे गरजेचे नाही. सरतेशेवटी संकल्पनेला धरून असलेला चित्रपट बनवणाऱ्यांचा दृष्टिकोन त्यासाठी पुरेसा असतो, असे त्यांनी सांगितले
या सत्रात सनी जोसेफ आणि आर.व्ही. रामाणी यांच्या प्रशंसनीय कामांच्या व्हिडिओ क्लिप दाखवण्यात आल्या. त्यात देवथकल, पिरावी, चिल्ड्रेन ऑफ मिनी जपान, अ स्कूल ऑफ माय ओन, बियॉन्ड द व्हील्स, फेस लाइक अ मॅन, आणि विंडफॉल ऑफ ग्रेस या माहितीपटांचा समावेश होता. दृश्यांचा प्रभाव आणि आणि बुद्धीला खाद्य याच्या मिश्रणमुळे विचार आणि प्रतिमांच्या जुगलबंदीचा आनंद रसिकांना लुटता आला.
सनी जोसेफ
प्रख्यात सिनेमॅटोग्राफर आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) चे पदवीधर सनी जोसेफ यांनी काल्पनिक आणि बिगर-काल्पनिक दोन्ही सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी 65 वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आणि तितकेच माहितीपट आणि लघुपट तयार केले आहेत. त्यांनी काही प्रतिष्ठित दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय काल्पनिक कथांमध्ये पिरावी, वास्तुहारा, निझालकुथू, ट्रेन टू पाकिस्तान आणि कहीनी यांचा समावेश आहे, तर सहज, आयुर्वेद, गॉडेसेस आणि लाइट अप द स्काय या माहितीपटांची फार वाहवा झाली. जोसेफ यांनी इंडियन सोसायटी ऑफ सिनेमॅटोग्राफर्सचे अध्यक्ष आणि सरचिटणीस ही प्रमुख पदे भूषवली आहेत. सध्या ते कोषाध्यक्ष आहेत.
आर.व्ही. रामाणी
प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर रामाणी यांनी माहितीपट निर्मितीच्या जगात स्वत:चे एक वेगळे स्थान तयार केले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते रामाणी यांचे माहितीपट त्यांच्या अनोख्या, प्रभावशाली शैलीसाठी ओळखले जातात. अभिव्यक्तीच्या विविध पैलूंचा वापर त्यांच्या माहितीपटात असतो. मुंबई विद्यापीठातून भौतिकशास्त्रातील पदवीधर असलेल्या रामाणी यांची कारकीर्द छायाचित्र पत्रकार म्हणून सुरू झाली. त्याआधी त्यांनी एफटीआयआय, पुणे येथे मोशन पिक्चर फोटोग्राफी या विषयात 1985 मध्ये पदवी प्राप्त केली. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कलाकृती अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये प्रदर्शित झाल्या. त्यासाठी जगभरातून त्यांची प्रशंसा झाली.
* * *
PIB Team MIFF | M.Chopade/Vasanti/Prajna /D.Rane | 43
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2026708)
Visitor Counter : 68