• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दृश्य प्रतीकात्मकता, प्रतिमांपासून कथनात्मक अर्थापर्यंत: 18व्या मिफ्फ मध्ये मास्टर सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांनी उलगडले मर्म


“गूढ असलेल्या प्रत्येक गोष्टीत अंधार आणि प्रकाश यांचा समतोल साधला पाहिजे. जेव्हा मी काही प्रकाशयोजना करतो तेव्हा हा मिलाफ असल्याची खातरजमा करतो”: संतोष सिवन

Posted On: 18 JUN 2024 10:28PM by PIB Mumbai

मुंबई, 18 जून 2024

 

18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) मास्टर सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांच्यासोबत ‘व्हिज्युअल सिम्बॉलिझम, इमेजेस टू नॅरेटिव्ह मीनिंग’ अर्थात दृश्य प्रतीकात्मकता, प्रतिमांपासून कथनात्मक अर्थापर्यंत या शीर्षकाचे आकर्षक ‘संभाषण’ सत्र आयोजित केले होते. मुंबईतील एनएफडीसी संकुलात हा कार्यक्रम पार पडला. मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटांबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये त्यांच्या कामासाठी ओळखले जाणारे, संतोष सिवन यांनी सिनेमॅटोग्राफीच्या कलेचे मर्म विशद केले. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक नम्रता जोशी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.

संतोष सिवन यांनी एका दृश्यात गूढता निर्माण करताना अंधार आणि प्रकाशाच्या समतोलाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, "गूढ असलेल्या कोणत्याही गोष्टीत गडद आणि फिकट प्रकाशाचे मिश्रण असले पाहिजे. मी जेव्हा कोणतीही प्रकाशयोजना करतो तेव्हा मी हा मिलाफ असल्याची खातरजमा करतो. जर तुम्ही पियानो वाजवत असाल, तर तुम्हाला सर्व स्वरपट्टींचा वापर करावा लागेल. "हे तत्त्वज्ञान त्यांच्या विशिष्ट दृश्य शैलीचा आधार आहे, ज्याने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

संतोष सिवन यांनी आपले वैविध्यपूर्ण अनुभव कथन केले. वेगवेगळ्या चित्रपट शैलींना विशिष्ट निरूपणाची गरज असते आणि आर्ट हाऊसपासून ते व्यावसायिक चित्रपटांपर्यंत वेगवेगळ्या शैलींमध्ये काम करायला आवडते, असे नमूद केले. हॉलिवूडमधील कामाबद्दल अवगत करताना सिवन म्हणाले की, या इंडस्ट्रीत वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन केले जाते. "मी ज्या प्रकल्पावर काम केले आहे, त्यातून मी काही ना काही बोध घेतला आहे" असेही त्यांनी सांगितले. 

सत्रादरम्यान, सिवन यांनी प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शकांसोबत त्यांच्या सहयोगाच्या कथा उद्धृत केल्या. मणिरत्नम यांच्यासोबत आपले ऋणानुबंध दीर्घकाळ असून सहा चित्रपटांसाठी त्यांनी एकत्र काम केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 'दिल से' चित्रपटात प्रीती झिंटाला मल्याळी मुलीचे पात्र साकारण्यास आपण मणिरत्नम यांना कसे राजी केले आणि 'छैय्या छैय्या' गाण्यात शाहरुख खानने चालत्या ट्रेनमध्ये संरक्षक कवच न वापरता मारलेल्या उडीचे संस्मरणीय चित्रीकरण याविषयी सिवन यांनी आठवणी सांगितल्या. हे संपूर्ण चित्रीकरण निसर्गरम्य रेल्वे मार्गावर अडीच दिवसांत पूर्ण झाले होते.

सिवन यांनी विविध दिग्दर्शकांच्या अनोख्या कार्यशैलीचे कौतुक केले. यामध्ये प्रियदर्शन यांची एडिटिंगमधील अचूकता, राज कुमार संतोषी यांचे सेटवरील व्यापक नियंत्रण आणि शाजी एन. करुण यांच्या दृश्याभिमुखतेचा समावेश आहे. सध्या ते राजकुमार संतोषी यांच्या सोबत सनी देओल आणि प्रीती झिंटा हे कलाकार असलेल्या 'लाहोर- 1947' या चित्रपटावर काम करत आहेत.

दिग्दर्शनाच्या तणावपूर्ण स्वरूपाच्या तुलनेत सिनेमॅटोग्राफी हा चिंतनशील अनुभव असल्याचे वर्णन करताना, सिवन यांनी एनरिक चेडियाक, अशोक मेहता, सुब्रतो मित्रा, के. के. महाजन, व्हिन्सेंट मास्टर आणि व्हिटोरियो स्टोरारो यासारख्या सिनेमॅटोग्राफरचा प्रभाव नमूद केला. "विविध लोक वेगवेगळ्या कारणांसाठी प्रशंसनीय आहेत," असा उल्लेख त्यांनी केला.

कथानक हा जैविक घटक आहे, जो निरंतर विकसित होत असतो, यावर सिवन यांनी भर दिला. कथानकाला नवा आयाम देणाऱ्या तरुण आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. 

सिनेमॅटोग्राफीमधील पियरे एंजेनीक्स एक्सेलन्स, बारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार केरळ राज्य चित्रपट पुरस्कार आणि तीन तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारांसह असंख्य पुरस्कारांचे मानकरी असलेले संतोष सिवन आपल्या अनोख्या संकल्पनेतून सिनेजगताला प्रेरणा देत आहेत आणि आपली छाप पाडत आहेत.

 

* * *

PIB Team MIFF | S.Nilkanth/V.Joshi/D.Rane | 39

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2026430) Visitor Counter : 79


Link mygov.in