पंतप्रधान कार्यालय
विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर 7 नव्या संरक्षण कंपन्यांच्या लोकार्पण समारंभातील पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले संबोधित
“या सात कंपन्यांच्या निर्मितीमुळे डॉ कलाम यांच्या सक्षम भारताच्या स्वप्नाला पाठबळ मिळेल”
“या सात नव्या कंपन्या येत्या काळात भारताच्या सैन्य शक्तीचा मजबूत पाया ठरतील”
“65,000 कोटींपेक्षा जास्त मूल्यांच्या उत्पादनांची मागणी देशाच्या कंपन्यांवर वाढत्या विश्वासाचे द्योतक”
“संरक्षण क्षेत्रात यापूर्वी कधीही न दिसलेली पारदर्शकता, विश्वास आणि तंत्रज्ञान आधारित दृष्टीकोन आज दिसतो आहे.”
“गेल्या पाच वर्षात आपली संरक्षण निर्यात 325 टक्के वाढली आहे”
“स्पर्धात्मक किंमती आपली ताकद आहे तर, गुणवत्ता आणि विश्वासार्हता आपली ओळख बनायला हवी”
Posted On:
15 OCT 2021 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण मंत्रालयाने योजित केलेल्या सात नव्या कंपन्यांच्या लोकार्पण सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आज विजयादशमीच्या शुभ दिवशी शस्त्र पूजनाचे महत्व अधोरेखित केले. ते म्हणाले, शक्ती हे निर्मितीचे माध्यम म्हणून आपण बघतो. याच भावनेतून देश शक्तिशाली होण्याकडे वाटचाल करत आहे. त्यांनी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणाले, डॉ कलामांनी बलवान देश बनविण्यासाठी आपले आयुष्य वेचले होते. आयुध निर्माण कारखान्यांची पुनर्रचना आणि सात नव्या कंपन्यांची निर्मिती, त्यांच्या मजबूत भारत बनविण्याच्या स्वप्नाला बळकटी देईल. भारताच्या स्वातंत्र्याच्या या अमृत काळात देशाचे नवीन भविष्य घडविण्यासाठी जे अनेक संकल्प करण्यात आले आहेत, त्याचाच भाग म्हणून नवीन संरक्षण कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत, असे ते म्हणाले.
या कंपन्या बनविण्याचा निर्णय अनेक वर्षे अडकून पडला होता असे सांगत, येत्या काळात या सात नव्या कंपन्या भारताच्या सैन्य शक्तीची पायाभरणी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतीय आयुध निर्माण कारखान्यांच्या उज्ज्वल वारशाचे स्मरण करत देत पंतप्रधान म्हणाले की, या कंपन्यांच्या अद्ययावतीकरणाकडे स्वातंत्र्यानंतरच्या काळात दुर्लक्ष झाले. यामुळे देशाचे संरक्षण विषयक गरजांसाठी परदेशी आयातीवरचे अवलंबित्व वाढले. “या सात संरक्षण कंपन्या ही परिस्थिती बदलण्यात महत्वाची भूमिका बजावतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आत्मनिर्भर भारताच्या सिद्धांतानुसार, या नवीन कंपन्या आयातीला पर्याय देण्यात महत्वाची भूमिका बजावतील. 65,000 कोटीं रुपयांपेक्षा अधिक मूल्यांच्या उत्पादनांची मागणी असणे हे देशातल्या कंपन्यांवरच्या वाढत्या विश्वासाचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी सरकारने अलिकडच्या काळात केलेल्या विविध सुधारणांचा उल्लेख केला. या सुधारणांमुळे आज संरक्षण क्षेत्रात आधी कधीही नव्हते एवढे विश्वासाचे, पारदर्शक आणि तंत्रज्ञान-प्रणित वातावरण तयार झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आज खाजगी आणि सरकारी क्षेत्रे, राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात,हातात हात घालून एकत्रित काम करत आहेत, असे ते पुढे म्हणाले. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू इथे विकसित होत असलेल्या संरक्षण विषयक मार्गिका याच नव्या दृष्टीकळकोनाचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत धोरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे युवा आणि सूक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योगांसाठी नव्या संधी विकसित होत आहेत." गेल्या पाच वर्षांत, आपली संरक्षण क्षेत्रातील निर्यात 325 टक्क्यांनी वाढली आहे." असे त्यांनी सांगितले.
आपल्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या बाबतीत सर्वोत्तम गुणवत्ता आणि कौशल्य असणाऱ्या असाव्यात, एवढेच नाही, तर जागतिक बाजारपेठेत त्यांना एक ब्रँड म्हणून मान्यता मिळावी, असे आपले उद्दिष्ट असल्याचे मोदी यांनी सांगितले. स्पर्धात्मक मूल्य हे आपले बलस्थान असले तरीही, गुणवत्ता आणि विश्वासार्हता ही आपली ओळख असायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकविसाव्या शतकात, कोणत्याही देशाची किंवा कंपनीच्या विकासाचे तसेच ब्रँड व्हॅल्यूची मापदंड संशोधन आणि विकास तसेच नवोन्मेषी वृत्तीवरुन जोखले जातात, असे पंतप्रधान म्हणाले. त्यामुळेच, संशोधन आणि नवोन्मेष हा नव्या कंपन्यांच्या कार्यसंस्कृतीचाच भाग असावा, जेणेकरुन ते केवळ भविष्यातील तंत्रज्ञान स्वीकारणारे नाही, तर असे तंत्रज्ञान विकसित करण्यात पुढाकार घेणारे उद्योजक ठरतील, असा आग्रह त्यांनी व्यक्त केला. या पुनर्रचनेमुळे नव्या कंपन्यांना नवोन्मेष आणि कौशल्ये यांची जोपासना करण्यास अधिक वाव आणि स्वायत्तता मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे नव्या कंपन्यानी अशा गुणवत्ता आणि कौशल्यांना अधिकाधिक संधी आणि प्रोत्साहन द्यावे असे पंतप्रधान म्हणाले. या नव्या प्रवासाचा भाग होण्याचे आवाहन त्यांनी देशातल्या स्टार्ट अप्सना केले. या कंपन्यांच्या सोबतीने संशोधन आणि तज्ज्ञांच्या सल्लासाठी परस्परांशी समन्वय असावा, असे पंतप्रधान म्हणाले.
केंद्र सरकारने या नव्या कंपन्यांना उत्तम दर्जाच्या उत्पादनांसाठी पोषक वातावरण तर मिळणार आहेच, त्याशिवाय कार्यान्वयानाची संपूर्ण स्वायत्तताही दिली जाणार आहे. या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हितांची पूर्ण काळजी सरकार घेईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.
कार्यान्वयन स्वायत्तता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि नवीन वृद्धीसाठीचा वाव आणि नावोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने आयुधनिर्माणी कारखाना मंडळाची 7 पूर्णपणे सरकारी मालकीच्या कंपन्यांमध्ये रुपांतर केले आहे. देशाला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनविणे हा या मागचा उद्देश आहे. त्यानुसार, म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (MIL), आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI), एडव्हान्स्ड वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड (AWE India); ट्रूप कम्फर्ट लिमिटेड (TCL); यंत्र इंडिया लिमिटेड (YIL); इंडिया ओप्टेल लिमिटेड (IOL); आणि ग्लाईडर्स इंडिया लिमिटेड (GIL) या कंपन्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
* * *
S.Thakur/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
(Release ID: 1764156)
Visitor Counter : 294
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam