उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संविधान दिनानिमित्त उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सर्व 22 अनुसूचित भाषांमधील भारतीय संविधानाच्या अद्ययावत आवृत्त्यांचे केले प्रकाशन


भाषिक विविधता ही भारताची ताकद आहे; प्रत्येक भाषेचा आदर करा आणि प्रत्येक मातृभाषेचा उत्सव साजरा करा : उपराष्ट्रपती

Posted On: 26 NOV 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सर्व 22 अनुसूचित भाषांमधील भारतीय संविधानाच्या अद्ययावत आवृत्त्यांचे प्रकाशन करण्यात आले.

भारताच्या लोकशाही प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा असे या प्रसंगाचे वर्णन करताना, उपराष्ट्रपती म्हणाले की, सर्व अनुसूचित भाषांमध्ये संविधान उपलब्ध करून देणे, हा भारताच्या भाषिक विविधतेचा आणि लोकशाही समावेशकतेचा उत्सव आहे. आपल्या मातृभाषेत संविधान उपलब्ध झाल्यामुळे शासनव्यवस्था नागरिकांच्या अधिक जवळ येईल आणि नागरिकांना आपले घटनात्मक हक्क, कर्तव्ये आणि मूल्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील, असे ते म्हणाले.

संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या इतर सदस्यांना आदरांजली वाहताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, संविधान केवळ एक कायदेशीर चौकट नसून राष्ट्राचा आत्मा आहे. संविधान सामान्य जनतेच्या अधिकाधिक जवळ नेण्यासाठी केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले. हे प्रयत्न भारताचा भाषिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची आपली वचनबद्धता दर्शवतात, असेही ते म्हणाले.

भारताच्या भाषा आणि ज्ञान परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

भारताची खरी ताकद त्याच्या विविधतेत आहे आणि भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून त्या संस्कृती, परंपरा आणि अस्मितेच्या वाहकही आहेत, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले. सर्व भारतीय भाषांबद्दल परस्पर आदर व्यक्त करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीचे आपल्या मातृभाषेशी एक विशेष नाते असले तरी, इतरांच्या भाषा आणि मातृभाषांचा आदर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनी आपापल्या मातृभाषांचा आदर राखावा तसेच भारताला एक सुसंवादी राष्ट्र बनवणाऱ्या समृद्ध भाषिक विविधतेचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सर्व 22 अनुसूचित भाषांमध्ये संविधानाचे प्रकाशन हे 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेचे प्रतीक आहे आणि ते देशाच्या 'विकसित भारत@2047' च्या दिशेने होणाऱ्या प्रवासाला अधिक बळकट करेल, असेही ते म्हणाले.

सर्वांनी 'राष्ट्र प्रथम' या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करावे असे आवाहन त्यांनी केले. देशातील सर्व भाषांच्या जतन आणि भरभराटीसाठी एक मजबूत आणि एकसंध राष्ट्र आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 

 
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2342171) अभ्यागत कक्ष : 8