57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

इफ्फी मधील 'स्कायलार्क' या किर्गिझ चित्रपटाने उलगडली विस्थापन, स्मृती आणि मानवी लवचिकतेची कथा


ग्रँड प्रिक्स-विजेत्या चित्रपट निर्मात्यांनी बाटकेनच्या सीमेवरील वास्तव, किर्गिझ लोककथा आणि राज कपूर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्या अभिजात चित्रपटांशी संबंधित बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा

Posted On: 26 NOV 2026 2:33PMby PIB MumbaiRelease ID: 2342017Views: 16

गोवा, 26 नोव्‍हेंबर 2026

 

गोव्यामध्ये आयोजित 57 व्या इफ्फी, अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात आज ‘स्कायलार्क’ या चित्रपटाचा इंडिया प्रीमियर पार पडला. त्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक नर्गिझा डोटीवा आणि निर्माती गुलनारा कासमम्बेटोवा यांनी पत्र सूचना कार्यालयाद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत या चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडला. हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा देणारे वास्तविक अनुभव,  मध्य आशियातील सोव्हिएत सीमा निश्चितीनंतर मानवी जीवनावर झालेल्या परिणामांचा शोध, आणि भारतीय चित्रपटसृष्टीबद्दलची आपली दीर्घकालीन ओढ, या विषयावर त्यांनी  भाष्य केले.

85 मिनिटांचा हा किर्गिझ चित्रपट किर्गिझस्तान-ताजिकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष घटना आणि बातम्यांच्या अहवालांवर आधारित आहे, या ठिकाणी नव्याने आखलेल्या सीमांनी शतकानुशतके एकत्र राहणाऱ्या समुदायांना वेगळे केले. हा चित्रपट आयबेक नावाच्या किशोरवयीन मुलाची कथा सांगतो, त्याचा सांभाळ त्याची आजी, 'एने' हिने केला आहे. आजीच्या निधनानंतर तिची अंतिम इच्छा पूर्ण करताना ऐबेकला एका नैतिक आणि भावनिक समस्येचा सामना करावा लागतो, कारण, आपल्या दिवंगत पतीच्या शेजारी आपल्याला दफन करावं अशी तिची इच्छा आहे, मात्र ती दफनभूमी आता सीमेपलीकडे, ताजिकिस्तानमध्ये आहे.

अमूर ऑटम फिल्म फेस्टिव्हल 2026 मधील 'ग्रँड प्रिक्स' जिंकणारा 'स्कायलार्क' हा चित्रपट मध्य आशियातील मौखिक कथाकथनाच्या परंपरेला समकालीन चित्रपटशैलीशी जोडतो. 

डोटिएव्हा यांनी सांगितले की, हा चित्रपट थेट सीमेवरील घटनांतून प्रेरणा घेतो, तर अचानक झालेल्या विभाजनामुळे बाटकेन प्रदेशातील ओळखीची कुरणे आणि पूर्वजांच्या दफनभूमी कशा प्रकारे प्रतिबंधित क्षेत्रांत रूपांतरित झाली, यावर कासमाम्बेतोव्हा यांनी प्रकाश टाकला. किर्गिझ लोककथेनुसार, मेंढीच्या पाठीवर शांतपणे घरटे बांधणारा स्कायलार्क हा पक्षी शांतता आणि संवादाचे प्रतीक आहे, जो संघर्षाच्या काळातील मानवी सहनशक्तीचा संदेश देतो.

भारताशी असलेल्या सांस्कृतिक नात्याबद्दल सांगताना चित्रपट निर्मात्यांनी सोव्हिएत-युगातील किर्गिझस्तानमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीने त्यांच्या बालपणाला कसा आकार दिला, याची आठवण सांगितली. आपल्या कुटुंबाबरोबर ते बॉलीवूडचे चित्रपट पाहायचे आणि शेजारी मुलांबरोबर चित्रपटांची गाणी गायचे, तसेच 'डिस्को डान्सर' चित्रपटातील मिथुन चक्रवर्ती यांच्या नृत्यशैलीची नक्कल करायचे, या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. ते म्हणाले की, ज्या समाजात प्रेमाचे जाहीर प्रदर्शन मर्यादित स्वरुपात होते, त्या ठिकाणी भारतीय चित्रपट भावना व्यक्त करण्यासाठी  “मोकळी खिडकी” उघडून देतात.

दिग्दर्शक म्हणाले की, राज कपूर यांच्या ‘क्लासिक’ चित्रपटांपासून, ते अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांपर्यंत, भारतीय चित्रपटांमधील भावनेचा ओलावा, कथाकथन शैली आणि मानवी नात्यांचा उत्सव, यामुळे किर्गिझस्तानमध्ये अनेक पिढ्यांनी भारतीय चित्रपटांना पसंती दिली. या सत्राचे सूत्रसंचालन वृंदा रणदीप सुदान यांनी केले.

पूर्ण पत्रकार परिषद येथे पाहता येईल:

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/राजश्री आगाशे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2342017
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026